माहिती आणि प्रसारण मंत्रालय
'53-तासांचे आव्हान' उपक्रमात गेल्या पाच दिवसांत जे घडले ते भारतातील चित्रपट उद्योगासाठी महत्त्वपूर्ण आहे: सीईओ, शॉर्ट्स टीव्ही
"पाचही चित्रपट अत्यंत गुणवत्तापूर्ण"
सर्व 5 चित्रपट शॉर्ट्स टीव्हीवर रविवारी, 27 नोव्हेंबर 2022 रोजी रात्री 9 वाजता प्रसारित केले जातील
गोवा/मुंबई, 24 नोव्हेंबर 2022
गोव्यातील 53व्या इफ्फी दरम्यान आयोजित “उद्याची 75 सृजनशील व्यक्तिमत्वे” कार्यक्रमाचा भाग म्हणून सुरू करण्यात आलेल्या '53-तासांचे आव्हान' उपक्रमातील विजेते आज घोषित करण्यात आले. 1,000 हून अधिक अर्जदारांमधून निवडलेल्या 75 सृजनशील व्यक्तींना प्रत्येकी 15 जणांच्या 5 टीममध्ये विभागण्यात आले होते. त्यापैकी प्रत्येकाने केवळ 53 तासात भारत@100 या संकल्पनेवर एक लघुपट तयार केला होता. 53 व्या इफ्फीमधील हा उपक्रम राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळाने शॉर्ट्स टीव्हीच्या सहकार्याने राबवला.
शॉर्ट्स टीव्हीचे सीईओ कार्टर पिल्चर यांनी सृजनशील व्यक्तिमत्त्वांचे कौतुक केले : “गेल्या 5 दिवसांत जे घडले ते भारतातील संपूर्ण चित्रपट उद्योगासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. उद्याची 75 सृजनशील व्यक्तिमत्त्वेसाठी 4 नोव्हेंबर रोजी नावांची घोषणा करण्यात आली आणि गेल्या 20 दिवसात त्यांनी विचारमंथन केले, झूमवर संपर्क साधला आणि संपूर्ण चित्रपट चित्रित केला.
वर्ष 2047 मधील भारत पाहण्याच्या आव्हानाचा 5 टीम्सनी वेगवेगळ्या पद्धतीने कसा अर्थ लावला हे पिल्चर यांनी प्रेक्षकांना उलगडून सांगितले. “एक भविष्यातील तंत्रज्ञानाबद्दल असून त्यामुळे दुभंगणारी नाती आणि नातेसंबंधांचे महत्त्व याबद्दल होता. दुसरा नवभारताबद्दल होता. यात एका महिलेची गोष्ट आहे, तिने साखरपुड्याच्या वेळी नथ घालावी अशी तिच्या सासरच्यांची इच्छा आहे. एक छान आणि आशादायक संदेश यात आहे. तिसरा चित्रपटही चित्तवेधक होता. यात सर्व पालक एकल पालक आहेत आणि मुलाला हे उमजते की फक्त आई किंवा फक्त बाबा,असे कुटुंबही असू शकते. कागदी चलन नाहीसे झालेल्या जगाबद्दलचा एक सुंदर चित्रपटही होता.''
![](https://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/75minds-1M44K.jpg)
चित्रपट अत्यंत सुंदर झाले असल्याचे पिल्चर यांनी सांगितले. “यातील प्रत्येक असे काहीतरी होते जे अत्यंत आश्चर्यकारक होते. अनेक दिग्दर्शक देशाच्या अशा भागातून आहेत जे प्रसिद्ध नाहीत.”
चित्रपट पाहण्यापूर्वी आपण साशंक होतो, असे पिल्चर यांनी सांगितले. “पाच चित्रपटांवर माझे नाव असणे आणि ते कसे असतील, याची कल्पना नसणे माझ्यासाठी खूप भीतीदायक होते. ते सर्व निकृष्ट असण्याचीही शक्यता होती. ” तरीही आज सकाळी, जेव्हा हे 5 अप्रतिम चित्रपट दाखवण्यात आले तेव्हा ज्युरी भारावून गेले, कारण त्यातील प्रत्येक चित्रपटात काहीतरी वैशिष्ठ्यपूर्ण होते.
'डिअर डायरी' या विजेत्या चित्रपटाविषयी बोलताना पिल्चर म्हणाले की, ही एका मुलीची कथा आहे जिच्यावर अत्याचार झाला होता आणि 2047 मध्ये तिची बहीण घरी येते आणि त्याच ठिकाणी जाते आणि तिच्या बहिणीला समजते की भारत आता महिलांसाठी चांगले ठिकाण आहे. "चित्रपटाचे सौंदर्य हे आहे की तो गहिरे सत्ये मांडू शकतो आणि मनात खोलवर भिडतो आणि विचारप्रवृत्त करू शकतो आणि मने दुभंगण्याऐवजी आम्हाला एकत्र आणतो. "
पाच टीम्सनी पैसे खर्च करण्याची निवडही वेगवेगळ्या प्रकारे केली होती, अशी माहिती पिल्चर यांनी दिली. एका टीमने स्थानिक प्रतिभांवर, एकाने उपकरणे भाड्याने घेण्यावर आणि एकाने तंत्रज्ञानावर खर्च केले होते. 53 तास जसजसे पुढे सरकले, दबाव वाढला, संघसहकाऱ्यांमधील संबंध अधिक घट्ट होत गेले. त्या सर्वांना स्वतःच्या कौशल्यांबद्दल तसेच त्यांच्या सहकाऱ्यांच्या कौशल्याबद्दल नव्याने जाणीव झाली. गेल्या 53 तासांमध्ये सहभागींना भेडसावणाऱ्या आव्हानांबद्दल त्यांनी सांगितले - जागवलेल्या रात्री, मर्यादित सूर्यप्रकाशात चित्रीकरण, काम करताना एकमेकांसोबत नाते जुळवून घेणे आणि प्रत्येकी $1,000 चे बजेट.''
पिल्चर यांनी 53 तासांचे आव्हान या उपक्रमाच्या कल्पनेचे श्रेय केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग सिंह ठाकूर यांना दिले. "ही पूर्णपणे त्यांची संकल्पना होती आणि या आव्हानात ज्या प्रकारे गोष्टी घडल्या त्यावरून ही एक अद्भूत कल्पना असल्याचे दिसून आले."
'75 क्रिएटिव्ह माइंड्स ऑफ टुमारो' कार्यक्रम हा एक उत्कृष्ट कार्यक्रम आहे, असे पिल्चर यांनी सांगितले. "आम्ही भारत आणि जगाला एकत्र आणण्यासाठी पाच दिवसात बरेच काही केले आहे, जे कदाचित यापूर्वी कधीही केले गेले नव्हते."
75 सृजनशील व्यक्तिमत्त्वासाठी एक वाट खुली करताना त्यांनी जाहीर केले की सर्व 5 चित्रपट शॉर्ट्स टीव्हीवर रविवार, 27 नोव्हेंबर 2022 रोजी रात्री 9 वाजता प्रसारित केले जातील. अकादमीसोबत भारतातील लघुपट महोत्सव प्रवेशिकांना मान्यता देण्यात शॉर्ट्स टीव्हीचा कसा मोलाचा वाटा आहे, हेही त्यांनी सांगितले. यात हे 5 चित्रपट असून ते ऑस्कर नामांकनासाठी पात्र ठरतील. सर्व 75 सृजनशील व्यक्तिमत्त्वे 35 वर्षांपेक्षा कमी वयाची असून त्यापैकी बहुतेक आधीच चित्रपट निर्माते होते ज्यांना अद्याप मोठी संधी मिळाली नव्हती. शॉर्ट्स टीव्हीचे उद्दिष्ट 75 क्रिएटिव्ह माइंड्स ऑफ टुमारो कार्यक्रमासारखेच आहे, ते म्हणजे प्रतिभांना संधी देणे, व्यासपीठ देणे आणि चित्रपट उद्योगात मदत करणे आहे, अशी माहिती त्यांनी दिली.
* * *
PIB Mumbai | S.Tupe/S.Kakade/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1878812)
Visitor Counter : 207