माहिती आणि प्रसारण मंत्रालय

‘थ्री ऑफ अस’ ही कोकणातील पार्श्वभूमीवर असलेली नात्यांची नाट्यकथा: अविनाश अरुण, दिग्दर्शक


हा चित्रपट निसर्गसंपन्न कोकण प्रदेशाच्या पर्यटनाची प्रभावी जाहिरात करणारा ठरेल: शेफाली शहा

Posted On: 24 NOV 2022 10:27PM by PIB Mumbai

गोवा/मुंबई, 24 नोव्‍हेंबर 2022

 

“थ्री ऑफ अस”हा महाराष्ट्रातील कोकण प्रदेशाच्या पार्श्वभूमीवर चित्रित नाट्यमय नातेसंबंधांची कथा आहे. अविनाश अरुण यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले असून, त्यात शेफाली शाह, जयदीप अहलावत आणि कलाकार-संगीतकार स्वानंद किरकिरे यांच्या प्रमुख भूमिका आहेत. गोव्यात सुरु असलेल्या 53 व्या इफ्फीमध्ये ‘टेबल टॉक्स’ सत्रात बोलतांना चित्रपटाचे दिग्दर्शक अविनाश अरुण म्हणाले, “ मी माझ्या बालपणीची तीन चार वर्षे कोकणात होतो. निसर्गाशी माझी पहिली ओळख कोकणच्या भूमीतच झाली. माझ्या चित्रपटातून मी नेहमीच माझ्यातलं मूल शोधण्याचा प्रयत्न करत असतो. विशेषतः या चित्रपटातही मी तसा प्रयत्न केला आहे. या भागाविषयी मला माझ्या बालपणापासून आकर्षण आहे. “याआधी, मी मराठी चित्रपट ‘किल्ला’बनवला होता, त्यानंतर आठ वर्षांनी मी हा चित्रपट बनवला आहे.”

यावेळी, चित्रपटातील कलाकार,जयदीप अहलावत म्हणाले, “हा चित्रपटात अभिव्यक्त करण्यात आलेल्या भावना, शब्दांत मांडणं अशक्य आहे. अविनाश आणि मी फिल्म स्कूलमध्ये एकत्र शिक्षण घेतले आहे. आणि याआधी आम्ही 'पाताल लोक' मध्ये आम्ही एकत्र कामही केले आहे. त्यामुळे आम्हाला एकमेकांची कार्यशैली दीर्घकाळापासून माहीत आहे. आणि या चित्रपटाविषयी बोलायचं झाल्यास, मी इथे त्याबद्दल सगळं काही सांगू शकत नाही, हा चित्रपट पडद्यावर अनुभवण्याचा विषय आहे,” असे ते पुढे म्हणाले.

जलसा, ह्यूमन, डार्लिंग्स किंवा दिल्ली क्राइम 2 मधील आपल्या अप्रतिम बॅक टू बॅक परफॉर्मन्सने वर्षभर चित्रपटप्रेमींना गुंतवून ठेवणारी अभिनेत्री शेफाली शाह म्हणाली की हा चित्रपट जितका विवाहाविषयी आहे तितकाच तो जीवनावरही आहे. “मला पटकथा मुळात वन लाइनर म्हणून सांगण्यात आली होती. आतापर्यंत मी अतिशय सशक्त व्यक्तिरेखा साकारल्या आहेत.यावेळी बदल म्हणून मी एका असुरक्षित आणि दुर्बळ स्त्रीचे पात्र रंगवले आहे. आणि खरं तर हेच त्या पात्राचे सौंदर्य आहे. पण मी समर्थ आहे याचा अर्थ मी असुरक्षित पात्र साकारु शकत नाही, असा नाही. दोन्ही व्यक्तिरेखा  सुंदर असतात दोघांपैकी एकाची निवड का करावी? सामर्थ्य आणि असुरक्षितता  अशा दोन्ही भावना आपल्या प्रत्येकामध्ये असतात,” असे शेफाली शहा यांनी सांगितले.

चित्रपटाचे छायाचित्रण अप्रतिम आहे, असे त्या पुढे म्हणाल्या. अविनाश अरुण यांनी दिग्दर्शक आणि छायादिग्दर्शक म्हणून अप्रतिम काम केले आहे. हा चित्रपट आपल्याला एखाद्या पेंटिगसारखा दिसेल, ‘निसर्गसंपन्न कोकणाच्या पर्यटनाची एक उत्तम जाहिरात या चित्रपटातून होईल, असेही शेफाली शाह म्हणाल्या.

“या चित्रपटात, शेफालीची अत्यंत दुर्बल अशी व्यक्तिरेखा आहे, जयदीप ने एका हसऱ्या आनंदी व्यक्तिची भूमिका केली आहे, तर मी गीतकार, ज्याला गाता येत नाही, अशा व्यक्तीचा अभिनय केला आहे. आम्ही जसे नाही, तसे या सिनेमात दिसणार आहोत, त्यामुळे प्रत्येकाला अशीभूमिका मिळावी असे स्वप्न असते, ते आमचे स्वप्न या सिनेमामुळे साकार झाले.” असे, अभिनेता गीतकार स्वानंद किरकिरे यांनी यावेळी सांगितले.

भारतीय पॅनोरामा विभागात या चित्रपटाची निवड करण्यात आली आहे.  

 

* * *

PIB Mumbai | G.Chippalkatti/R.Aghor/D.Rane

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1878701) Visitor Counter : 202


Read this release in: English , Tamil , Urdu , Hindi