माहिती आणि प्रसारण मंत्रालय
इफ्फी 53 मधील ‘एक्सप्लोर बिहार’ पॅव्हेलियनमध्ये बिहारचे दर्शन
गोवा/मुंबई, 24 नोव्हेंबर 2022
53 व्या इफ्फी मधील बिहार पॅव्हेलियनने नवोदित चित्रपट निर्मात्यांना बुद्ध आणि महावीरांच्या या भूमीतील ऐतिहासिक, पुरातत्वीय, सांस्कृतिक आणि नैसर्गिक वारशाचा धांडोळा घेण्यासाठी आमंत्रित केले आहे.
यावर्षी इफ्फी मध्ये अनेक राज्य सरकारांनी एक उपक्रम म्हणून आपापल्या राज्यात चित्रपट निर्मिती उद्योगाला प्रोत्साहन देण्यासाठी फिल्म बाजार मध्ये त्यांचे मंडप उभारले आहेत. मणिपूर, पंजाब, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, महाराष्ट्र, तामिळनाडू, झारखंड, मध्य प्रदेश, गुजरात, छत्तीसगड, दिल्ली आणि पुद्दुचेरी या राज्यांनी याठिकाणी आपापले मंडप उभारले आहेत. महोत्सवाच्या उद्घाटन समारंभा दरम्यान केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी बिहार पॅव्हेलियनला भेट दिली होती.
तत्पूर्वी, प्रसिद्ध अभिनेते पंकज त्रिपाठी यांनी बिहारच्या पॅव्हेलियनचे उद्घाटन केले, त्यावेळी त्यांना इफ्फीमध्ये आपलं राज्य प्रतिनिधित्व करत आहे, याबद्दल आनंद वाटला. ते म्हणाले की, आपल्या राज्यात चित्रपट निर्मितीची अफाट क्षमता असून त्याचा उपयोग करून घेण्याची आवश्यकता आहे.
बिहार सरकारच्या अधिकारी बंदना प्रेयशी यांनी सांगितले की, बिहारमध्ये चित्रिकरणासाठी चित्रपट निर्मात्यांना आकर्षित करण्यासाठी राज्य सरकारने अनेक प्रयत्न केले आहेत. बिहारमधील सुधारलेली सुरक्षा स्थिती, जलद संपर्क-सक्षमता आणि मजबूत पायाभूत सुविधांची उपलब्धता याबद्दल त्यांनी माहिती दिली.
‘एक्सप्लोर बिहार’ पॅव्हेलियनमध्ये उपस्थित राज्य सरकारच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, बिहारचा ‘गरिबीग्रस्त राज्य’ म्हणून असलेला रूढीवाद मोडण्याची गरज आहे. खरे तर, रेल्वे, रस्ते किंवा हवाई संपर्क आणि इतर प्रकारच्या पायाभूत सुविधांच्या स्वरुपात, बिहारमधील पायाभूत सुविधा अनेक पटींनी वाढल्या आहेत. ‘एक्सप्लोर बिहार’ पॅव्हेलियन, चित्रपट उद्योगाच्या मुख्य प्रवाहातील अनेक नामवंत अभिनेते, दिग्दर्शक, तंत्रज्ञ यांचे मूळ बिहारमध्ये असल्याची वस्तुस्थिती अधोरेखित करते. बिहारमधून स्थलांतरित होऊन बॉलीवूड उद्योगात किंवा इतर प्रादेशिक चित्रपट उद्योगात प्रस्थापित झालेले कुशल चित्रपट निर्माते, अभिनेत्यांना त्यांच्या मायदेशी परतण्यासाठी आणि भक्कम चित्रपट निर्मिती उद्योगाच्या स्थापनेत योगदान देण्याची प्रेरणा मिळणे अपेक्षित आहे. हे पॅव्हेलियन, सोनपूर पशु मेळा जो आशियातील सर्वात मोठा पशु मेळा आहे आणि हरमंदिर तख्त श्री पटना साहिब जे शीख समुदायासाठी सर्वात पवित्र तीर्थस्थानांपैकी एक आहे, यासारख्या सांस्कृतिक, नैसर्गिक आणि पुरातत्वीय वारशावर आणि बिहारमधील चित्रपट निर्मितीच्या वारशावरही प्रकाश टाकते. रिचर्ड अॅटनबरोच्या ऑस्कर विजेत्या 'गांधी' मधील काही सर्वात महत्वाची दृश्ये शतकभरापूर्वी बांधलेल्या जुन्या पाटणा जिल्हाधिकारी कार्यालयात चित्रित करण्यात आली होती. 'जॉनी मेरा नाम (1970)' चित्रपटातील 'ओ मेरे राजा' हे लोकप्रिय गाणे राजगीर इथल्या विविध स्थळांवर चित्रित करण्यात आले.
‘मांझी-द माउंटन मॅन (2015)’, हा समीक्षकांनी प्रशंसा केलेला हिंदी भाषेतील चरित्रात्मक चित्रपट दशरथ मांझी यांच्यावर आधारित आहे, जो बिहारमधील गया इथला एक गरीब मजूर होता.
‘इंडियाज मोस्ट वॉन्टेड’ ची अनेक दृश्ये पटना येथे चित्रित करण्यात आली आहेत. हा 2019 मधील हिंदी भाषेतील अॅक्शन थ्रिलर चित्रपट आहे, ज्याचे दिग्दर्शन राज कुमार गुप्ता यांनी केले आहे आणि त्यात अर्जुन कपूरची भूमिका आहे.
अलीकडेच ‘ग्राइंडिंग ह्युमॅनिटी’ या चित्रपटाचे संपूर्ण चित्रीकरण बिहारमध्ये झाले आहे. रुचिन वीणा चैनपुरी दिग्दर्शित ‘ग्राइंडिंग ह्युमॅनिटी’ हा 2022 मधील हिंदी भाषेतील चित्रपट आहे.
बिहार सरकारचा कला, सांस्कृतिक आणि युवा विभाग, बिहार राज्याचे चित्रपट निर्मितीबाबतचे धोरण लवकरच प्रकाशित करेल. या धोरणामध्ये इतर गोष्टींबरोबरच, 'सिंगल विंडो क्लिअरन्स मेकॅनिझम'चा (एक खिडकी प्रणाली) समावेश असेल, ज्यामुळे चित्रपट निर्मात्यांना कमी वेळात विविध परवानग्या मिळवायला मदत होईल.
* * *
PIB Mumbai | G.Chippalkatti/R.Agashe/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1878678)
Visitor Counter : 219