कृषी मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

आंतरराष्ट्रीय भरड धान्य वर्ष (आयवायओएम ) -2023 आपल्याला जागतिक पातळीवर भरड धान्यांना पोषक तृणधान्ये म्हणून प्रोत्साहन देण्याची संधी देईल - केंद्रीय मंत्री नरेंद्र सिंह तोमर


आयवायओएम 23 च्या उद्‌घाटनपूर्व सोहोळ्यात दिल्लीस्थित उच्चायुक्त आणि राजदूतांना दिलेल्या मेजवानीच्या वेळी केंद्रीय कृषी मंत्र्यांनी उपस्थितांना संबोधित केले

Posted On: 24 NOV 2022 6:25PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 24 नोव्हेंबर 2022

आयवायओएम अर्थात आंतरराष्ट्रीय भरड धान्य वर्ष 2023 साजरे करण्याच्या निर्णयामुळे जागतिक पातळीवर या धान्यांच्या उत्पादनात वाढ, कार्यक्षम प्रक्रिया  तसेच आंतरपीक पद्धतीचा उत्तम वापर करून भरड धान्यांना आपल्या जेवणातील मुख्य घटक म्हणून समाविष्ट करण्यासाठी प्रोत्साहन देण्याची उत्तम संधी उपलब्ध करून देईल असे प्रतिपादन केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री नरेंद्र सिंह  तोमर यांनी केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुढाकारामुळे संयुक्त राष्ट्रांनी 2023 हे आगामी वर्ष आंतरराष्ट्रीय भरड धान्य वर्ष म्हणून साजरे करण्याची घोषणा केली आहे.

या उपक्रमाच्या माध्यमातून देशांतर्गत तसेच जागतिक पातळीवर भरड धान्यांचा वापर वाढविणे हे आपले उद्दिष्ट आहे, केंद्रीय मंत्री म्हणाले. आयवायओएम 23 च्या उद्घाटनपूर्व सोहोळ्यानिमित्त केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण विभाग आणि केंद्रीय परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने संयुक्तपणे दिल्लीस्थित उच्चायुक्त तसेच राजदूतांसाठी आयोजित केलेल्या मेजवानीप्रसंगी ते बोलत होते.

सार्वजनिक वितरण व्यवस्थेने त्यांच्या वितरण कार्यक्रमाचे लक्ष मुलभूत उष्मांकांवरून कमी करून शालेयपूर्व वयातील मुले आणि प्रजननक्षम वयातील महिला  यांची पोषणविषयक स्थिती सुधारण्यासाठी भरड धान्यांचा समावेश असलेले अधिक वैविध्यपूर्ण अन्नपदार्थ पुरविण्याकडे वळवण्याची वेळ आली आहे, ते म्हणाले.

भरड धान्यांच्या पोषणमूल्यांचा विचार करून केंद्र सरकारने भरड धान्यांना एप्रिल – 2018 मध्ये पोषक तृणधान्यांचा अधिकृत दर्जा दिला आणि पोषण अभियानात देखील भरड धान्यांचा समावेश करण्यात आला, असे तोमर यांनी सांगितले.

 शाश्वत उत्पादन, भरड धान्यांच्या अधिक वापरासाठी जागरूकता निर्माण करणे, बाजार आणि मूल्य साखळी तसेच संशोधन विकास विषयक उपक्रम विकसित करणे यासाठी केंद्रीय कृषी मंत्रालयातर्फे निधी देण्यात येत आहे.

केंद्रीय कृषीमंत्री म्हणाले की, 66 हून अधिक स्टार्ट अप कंपन्यांना सव्वा सहा कोटी रुपयांचा निधी देण्यात आला असून 25 स्टार्ट अप कंपन्यांना आणखी निधी देण्यास मंजुरी देण्यात आली आहे. भरड धान्यांचा जेवणात समावेश करण्यास प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीने नवीन पाककृती तसेच मूल्यवर्धित उत्पादने तयार करण्यासाठी केंद्र सरकार स्टार्ट अप उद्योजकांना पाठबळ पुरवीत आहे, ते म्हणाले.

भारतात सध्या 500 स्टार्ट अप उद्योग, भरड धान्यांच्या मूल्यवर्धन साखळीबाबत काम करत आहेत तर भारतीय भरड धान्ये संशोधन संस्थेने राष्ट्रीय कृषी विकास योजना- रफ्तार अंतर्गत अडीचशे स्टार्ट अप उद्योगांना या संदर्भातील विकासविषयक चिंतन सुरु करण्यास मदत केली आहे.

पोषण विषयक आव्हाने पध्दतशीर आणि परिणामकारक पद्धतीने निश्चित करुन ती सोडविण्याची नीती आयोग तसेच जागतिक अन्न कार्यक्रम यांची इच्छा आहे असे केंद्रीय मंत्री तोमर यांनी सांगितले. ही भागीदारी भरड धान्यांना मुख्य प्रवाहात आणण्यावर लक्ष केंद्रीत करेल तसेच आंतरराष्ट्रीय भरड धान्य वर्षाच्या स्वरुपात प्राप्त झालेल्या संधींचा वापर करून माहितीच्या आदानप्रदानात आघाडी घेण्यात भारताला साहाय्यभूत ठरेल, ते म्हणाले.

दिल्लीतील उच्चायुक्त तसेच राजदूत यांना संबोधित करताना केंद्रीय परराष्ट्र व्यवहार मंत्री एस.जयशंकर म्हणाले की कोविड, हवामान बदल आणि संघर्ष यांच्या पार्श्वभूमीवर आज जगात भरड धान्यांची समर्पकता वाढत आहे.

भरड धान्ये अन्न सुरक्षा तसेच आंतरराष्ट्रीय संबंध या दोन्हींसाठी महत्त्वाचे आहेत यावर त्यांनी भर दिला. कोविड कालावधी हा, अन्न सुरक्षेच्या संदर्भात महामारी काय भीषण परिस्थिती निर्माण करू शकते याची जगाला आठवण करून देणारा कालावधी होता, असे त्यांनी सांगितले.  हवामान बदल उत्पादन कमी करु शकते आणि व्यापारात अडथळा निर्माण करू शकते असे जयशंकर यांनी सांगितले. आंतरराष्ट्रीय संबंधांमध्ये अन्न सुरक्षेकडे अधिक लक्ष देणे गरजेचे आहे अशी सूचना त्यांनी केली.

केंद्रीय परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री मीनाक्षी लेखीदिल्लीतील सुमारे 100 उच्चायुक्त आणि राजदूत तसेच दोन्ही मंत्रालयाचे वरिष्ठ अधिकारी या कार्यक्रमाला उपस्थित होते.

 

S.Kakade/S.Chitnis/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 

 

 

 

 

 

 


(Release ID: 1878617) Visitor Counter : 5322


Read this release in: English , Urdu , Hindi , Tamil , Telugu