माहिती आणि प्रसारण मंत्रालय

आप्तस्वकीयतेमुळे तुम्हाला पहिला चित्रपट मिळू शकतो, पण तुमचं काम, हीच तुमची ओळख असते: दिग्दर्शक लव रंजन


चित्रपट हे सर्वात शक्तिशाली माध्यम: दिग्दर्शक कबीर खान

नवोदितांना चित्रपट निर्मात्यांपर्यंत पोहोचवणारे एक अॅप लवकरच येणार: निर्माता महावीर जैन

आप्तस्वकीयतेचा शिक्का पुसून टाकायला मला चार वर्षे लागली: गायिका अनन्या बिर्ला

सर्व मोठे चित्रपट निर्माते देखील कधीतरी नवोदित होते: दिग्दर्शक आनंद एल. राय

Posted On: 23 NOV 2022 11:15PM by PIB Mumbai

गोवा/मुंबई, 23 नोव्‍हेंबर 2022

 

इफ्फी 53 मधील 'मनोरंजन उद्योगाचा बदलता टप्पा आणि या उद्योगात कसे प्रवेश करावे' या विषयावरील संभाषण सत्र, 'इन-काॅनव्हरसेशन'

गोव्यामध्ये सुरु असलेल्या 53 व्या इफ्फी महोत्सवामधील, 'मनोरंजन उद्योगाचा बदलता टप्पा आणि या उद्योगात कसे प्रवेश करावे' या विषयावरील 'इन-काॅनव्हरसेशन' या  संभाषण सत्रात दिग्दर्शक लव रंजन म्हणाले, “मला वाटतं की नेपोटिझम (आप्तस्वकीय शाही) हा कौटुंबिक नात्यांचा वारसा आहे. पण इंडस्ट्रीत (चित्रपट क्षेत्रात) तो कटू विषय बनतो. तुमचे आई-वडील इंडस्ट्रीमधले असले तरी, त्यामुळे तुम्हाला फक्त तुमचा पहिला चित्रपट किंवा कदाचित दुसरा चित्रपट मिळतो. पण त्यानंतर, तुमचं कामच तुम्हाला स्वतःची ओळख मिळवून देतं. अनेक नवोदित कलाकारांना “व्हिक्टिम सिंड्रोम” असतो, ते या आप्तस्वकीयशाहीचे बळी ठरतात.

इफ्फी 53 मधील 'इन-काॅनव्हरसेशन' सत्रात दिग्दर्शक लव रंजन  

दिग्दर्शक कबीर खान यांनी ते डॉक्युमेंटरी फिल्म बनवायचे त्या दिवसातील एक प्रसंग सांगितला, जो नंतर 'काबुल एक्सप्रेस' या त्यांच्या पहिल्या चित्रपटाचा ओपनिंग शॉट बनला. ते म्हणाले, “बॉलिवुडने मला वाचवलं आणि तेव्हाच मी ठरवलं की चित्रपटांपेक्षा शक्तिशाली दुसरं कोणतंही माध्यम नाही. आणि मला माझ्या गोष्टी सांगण्यासाठी त्या तिथेच असायला हवं. मी युवा कलाकारांना नेहमी सांगतो की तुमच्या आवाजात एक वेगळेपण असायला हवं. मी माझ्या विद्यार्थ्यांना सांगतो की जेव्हा मी एखादा चित्रपट पाहतो तेव्हा मला असं म्हणता आलं पाहिजे की हे फक्त त्यालाच/तिलाच बनवता येऊ शकतं.”

इफ्फी 53 'इन-काॅनव्हरसेशन' सत्रात दिग्दर्शक कबीर खान

चित्रपट निर्माते महावीर जैन यांनी अनेक चित्रपट निर्मात्यांना एकत्र आणलं आहे आणि नवीन कला गुणांना वाव देणं हा त्यांचा संकल्प आहे. नवोदितांसाठी काहीतरी करण्याची इच्छा व्यक्त करणाऱ्या विविध चित्रपट निर्मात्यांना भेटल्यावर ही कल्पना सुचल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. त्यांनी हे देखील सांगितलं, “"आम्ही लवकरच एक अॅप सुरु करणार आहोत, ज्याच्या मदतीने नवोदितांना चित्रपट निर्मात्यांपर्यंत पोहोचता येईल."

इफ्फी 53 'इन-काॅनव्हरसेशन' सत्रात अनन्या बिर्ला

अनन्या बिर्ला यांना गायिका आणि अभिनेत्री म्हणून त्यांच्या प्रवासाबद्दल विचारले असता त्या म्हणाल्या, “मी  उद्योजकांच्या परंपरावादी कुटुंबातून आले आहे, त्यामुळे अभिनेत्री होणं हा माझ्यासाठी मोठा कलंक होता. सुरुवातीला माझ्या वाट्याला मोठा तिरस्कार आला कारण लोकांना वाटलं की माझ्या वडिलांनी माझ्या गाण्याच्या कारकि‍र्दीसाठी पैसे मोजले असावेत. पण मला स्वतःला सिद्ध करायला आणि मी जी काही आहे, त्याला लोकांचं प्रेम मिळवायला चार वर्षांचा काळ लागला.

दिग्दर्शक आनंद एल. राय यांना, नवोदितांना संधी मिळणे किती कठीण आहे, हे विचारले असता ते म्हणाले, “या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व मोठे चित्रपट निर्माते देखील कधीतरी नवोदित होते. माझ्या मते हा उद्योग नेहमीच नवोदितांसाठी खुला राहिला आहे. मल्टिप्लेक्सच्या आगमनामुळे निर्माते आणि नवोदित यांच्यातील नातेसंबंधावर परिणाम झाला आहे, असं मला वाटत नाही.”

दिग्दर्शक आनंद एल. राय म्हणाले, “आपण सतत नवीन प्रतिभेचा शोध घेणं अत्यंत महत्वाचं आहे. दर 5-10 वर्षांनी आम्हाला नवीन अभिनेते, पटकथा लेखक, दिग्दर्शक आदींची  कमतरता जाणवते.”

प्रॉडक्शन हाऊसच्या तुलनेत ओटीटी प्लॅटफॉर्म नवोदितांना संधी देण्यासाठी अधिक खुले आहेत का, यावर त्यानंतर चर्चा झाली. दिग्दर्शक कबीर खान यांनी उत्तर दिले, "मला वाटतं की ओटीटी प्लॅटफॉर्म नवोदितांबरोबर काम करण्याचं अधिक धाडस दाखवतात."

दिग्दर्शक लव रंजन पुढे म्हणाले, “सदस्यत्व शुल्क भरल्यावर प्रेक्षक नवीन कलाकारांना पाहायला अधिक उत्सुक असतात. पण खरं सांगायचं तर, 20 वर्षांपूर्वीच्या तुलनेत आताची परिस्थिती खूपच चांगली आहे.    

चित्रपट विश्लेषक कोमल नहाटा यांनी संभाषण सत्राचे सूत्रसंचालन केले.

* * *

PIB Mumbai | G.Chippalkatti/R.Agashe/D.Rane

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1878544) Visitor Counter : 184


Read this release in: English , Urdu , Hindi , Tamil