माहिती आणि प्रसारण मंत्रालय
iffi banner

पुरुषसत्ताक मानसिकता, महिलांना कशी वर्चस्वाखाली ठेवते हे 'लिटिल विंग्स' विशेषत्वाने मांडते


"हा चित्रपट, पुरुषसत्ताकतेचा दंश मुक्याने, परंतु कर्तव्यनिष्ठेने सोसणाऱ्या प्रत्येक महिलेचा प्रतिनिधी": दिग्दर्शक नवीन कुमार मुथैया

गोवा/मुंबई, 23 नोव्‍हेंबर 2022

'शब्द नवे असायलाच हवेत

अर्थ नवे असायलाच हवेत

आणि तुम्ही जेव्हा कविता वाचता

तेव्हा, चव नवी असायलाच हवी'

महान तामिळ कवी सुब्रमण्यम भारती यांच्या या काव्यपंक्तीचा दाखला देत, हा चित्रपट का करावासा वाटला याबद्दल  'लिटिल विंग्स' चे दिग्दर्शक नवीन कुमार मुथैया यांनी सांगितले. वारंवार मांडूनही समाजात त्याची घातक आणि अपरिहार्य उपस्थिती आहे, परिणामी प्रासंगिकताही कायम आहे अशा विषयावर आपला चित्रपट असल्याचे त्यांनी सांगितले.

"हजारदा सांगितली गेलेली गोष्ट जेव्हा तुम्ही मांडू पाहता, तेव्हा तुम्ही ती अनोख्या पद्धतीने मांडायचा प्रयत्न करायला हवा" असे नवीन कुमार म्हणाले. गोव्यात  53 व्या भारतीय आंतराराष्ट्रीय चित्रपट महोत्‍सवात पीआयबीने आयोजित केलेल्या 'टेबल टॉक्‍स' सत्रात, चित्रपट आणि माध्यम प्रतिनिधींबरोबर ते बोलत होते.  

“समाजात खोलवर रुजलेल्या पुरुषसत्ताक मानसिकतेच्या सामाजिक कुप्रवृत्तीशी माझा चित्रपट संबंधित आहे. मला हे वेगळ्या पद्धतीने मांडायचे होते, असे नवीन कुमार मुथैया म्हणाले. त्यांचा चित्रपट, एका पुरुषाच्या नजरेतून आपले म्हणणे मांडत असला तरी पुरुषसत्ताकतेचा दंश मुक्याने, परंतु कर्तव्यनिष्ठेने सोसणाऱ्या प्रत्येक महिलेचा हा प्रतिनिधी आहे असेही ते म्हणाले.

सामाजिक रुढी परंपरांच्या जोखडात अडकले असल्याने, अभावाचे जीणे जगणाऱ्या खेड्यातील एका दांपत्याची 'लिटिल विंग्स' ही गोष्ट आहे.

चित्रपटात, नात्यातली कटूता तीव्र झालेली वृद्ध महिला आहे. तिचा नवरा जेव्हा तिने पाळलेला कोंबडा खाण्यावर अडून बसतो तेव्हा मात्र तिची उलाघाल टोकाला पोहचते.

महिला नेहमी अपल्या भावना आणि समाजात प्रचलित धारणा यातील लढाई हारतात. याकडेच लक्ष वेधत नवीनकुमार म्हणतात, “ग्रामीण भागात काही चालीरिती अशा असतात, जिथे, जेव्हा एखादी व्यक्ती भुकेने मरते, तेव्हा एका प्राण्याचा बळी देऊन त्याला मृतासोबत पुरले जाते. पुरुषसत्ताक समाजात राहात असल्याने, माझ्या नायिकेला प्रथेचे पालन करण्यासाठी आपला संकल्प सोडून द्यावा लागतो.”

चित्रपटात नायकाची भूमिका साकारणारे अभिनेते कालिदास सी यांनी सिनेमॅटोग्राफर सरवणा मारुथु यांच्यासह सत्रात भाग घेतला.मणिमेघलाई यांनी चित्रपटात नायिकेची भूमिका वठवली आहे.

इंडियन पॅनोरमाच्या कथाबाह्य श्रेणी अंतर्गत 'लिटिल विंग्स' प्रदर्शित करण्यात आला.

Jaydevi PS/Vinayak/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

iffi reel

(Release ID: 1878520) Visitor Counter : 196


Read this release in: English , Urdu , Hindi , Tamil