माहिती आणि प्रसारण मंत्रालय
लोकांपर्यंत आमचे काम पोहचवणे हे आज आमच्यासारख्या सर्जनशील कलाकारांसाठी सर्वात मोठे आव्हान आहे: आर बाल्की
उत्तम मार्केटिंगच्या अभावी आपण सर्जनशील अभिव्यक्ती गमावत आहोत
गोवा/मुंबई, 22 नोव्हेंबर 2022
सर्जनशील कलाकारांचे काम लोकांपर्यंत पोहचवणे हे आजचे सर्वात मोठे आव्हान आहे असे दिग्दर्शक आर बाल्की यांनी म्हटले आहे. गोव्यात पणजी येथे 53 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवादरम्यान ‘निगोशिएटिंग एस्थेटिक्स अँड इकॉनॉमिक्स’ या विषयावर मयंक शेखर यांच्याशी संवादादरम्यान बाल्की यांनी हे मत व्यक्त केले.
चिनी कम, पा, पॅड मॅन, चूप यांसारख्या अनेक गाजलेल्या चित्रपटांचे दिग्दर्शक आर. बाल्की यांनी सांगितले की चित्रपट निर्मिती म्हणजे आपल्या भावना व्यक्त करणे आहे. जेव्हा तुमची स्वतःची अभिव्यक्ती अनेक लोकांना आवडते , तेव्हा तो चित्रपट बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरतो. “काही गोष्टी ज्या तुम्हाला भावतात आणि नंतर त्या मोठ्या संख्येने लोकांच्या पसंतीस उतरल्या , तर तुम्ही नशीबवान आहात. तुम्हाला जे आवडते , त्यात फेरफार करणे अशक्य आहे” असे ते म्हणाले.
या मुद्द्याच्या अधिक खोलात जात आर. बाल्की म्हणाले की, तुमच्या कारकीर्दीच्या सुरुवातीपासूनच, तुम्हाला जे हवे आहे ते योग्यरित्या व्यक्त करणे तुम्हाला शक्य झाले नसेल तर कलाकार म्हणून तुम्ही संघर्ष करत राहता. “प्रेक्षक तुमची अभिव्यक्ती पाहण्यासाठी येतात. काही वेळा त्यांना तुमच्या कामाबद्दल फारशी माहिती नसते आणि त्यामुळे बॉक्स ऑफिसवर चित्रपट अपयशी ठरू शकतो”, असे त्यांनी सांगितले.
जाहिरात करण्याबाबत बोलताना आर. बाल्की म्हणाले की, एखाद्या उत्पादनाशी एखाद्या प्रसिद्ध व्यक्तीचे नाव जोडले तर त्याची विक्री चांगली होते. सिनेमा करण्यापेक्षा त्याची प्रसिद्धी करणे सोपे आहे कारण प्रसिद्धी करतेवेळी ते लोक तुमच्या कल्पनेवर भरपूर पैसे लावायला तयार असतात, मात्र सिनेमासाठी तुमचे विचार, तुमच्या कल्पना लोकांना पटवून देण्यासाठी तुम्हाला खूप प्रयत्न करावे लागतात.
चित्रपटांच्या मार्केटिंग बाबत आपले मत मांडताना ते म्हणाले की, चित्रपटासाठी प्रभावी प्रसिद्धी साधन विकसित करण्यासाठी पुरेसे संशोधन केले जात नाही. चित्रपटांची जाहिरात करण्याच्या प्रकारांमध्ये वर्षानुवर्षे अनेक बदल होत गेले. “सादरीकरणाचे अपेक्षित परिणाम मिळत नाहीत असे ते म्हणाले. चित्रपटांप्रमाणेच जाहिरातदार देखील लोकांपर्यंत कसे पोहोचायचे आणि त्यांचे मन कसे वळवायचे हे समजून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. “100 चित्रपटांपैकी 90 चित्रपट चांगली कमाई करत नाहीत कारण ते लोकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचत नाहीत. चित्रपटांचे उत्तम प्रकारे मार्केटिंग करण्याचे विज्ञान आपल्याला कधीच सापडले नाही,” असे त्यांनी सांगितले.
चित्रपटांच्या मार्केटिंगचे महत्त्व पटवून देताना ते म्हणाले की उत्तम मार्केटिंगच्या अभावी आपण अनेक सर्जनशील अभिव्यक्ती गमावत आहोत “हा चित्रपट उद्योग चालवणारी अनेक तज्ञ मंडळी आहेत,मात्र त्यांना चित्रपटांचे मार्केटिंग कसे करायचे याची कल्पना नाही. माहितीचे विश्लेषण (डेटा एनालिटिक्स) आणि मार्केटिंग या बाबी पुरेशा मजबूत नाहीत” अशी खंत त्यांनी व्यक्त केली.
आर. बाल्की म्हणाले की, मोठ्या नावाजलेल्या कलाकारांशिवाय चित्रपट करणे खूप कठीण असेल. अनेक छोट्या कल्पना मांडण्यासाठी जर नावाजलेले कलाकार असतील तर त्या मोठी कमाई करू शकतील. जर मोठ्या कलाकारांनी उत्तम आशय असलेले चित्रपट केले असते तर चित्र वेगळे दिसले असते , सिनेमा अधिक जलद गतीने प्रगती करू शकला असता. त्यांनी कमल हासनचे उदाहरण दिले , ज्यांनी 80 च्या दशकात नवीन विचार असलेले चित्रपट करून उत्तम यश मिळवले.
मोठ्या कंपनीच्या सीईओबरोबरची व्यावसायिक बैठक आणि एखाद्या प्रसिद्ध अभिनेत्याला भेटणे यात फारसा फरक नाही, असे मत आर. बाल्की यांनी व्यक्त केले. या दोन्ही प्रकरणांमध्ये तुम्हाला त्यांचे मन वळवावे लागेल आणि कंपनीचे मन वळवणे अधिक सोपे आहे.
'चूप' या आपल्या नव्या चित्रपटाविषयी बोलताना आर. बाल्की म्हणाले की, हा चित्रपट खूपच वैयक्तिक आहे आणि त्यांचा अतिशय जिव्हाळ्याचा आहे. . ते पुढे म्हणाले की या चित्रपटाबद्दल लोकांना जागरूक करणे महत्वाचे आहे जेणेकरून जास्तीत जास्त लोक तो पाहतील आणि तो यशस्वी होईल.
तुम्ही तुमची कल्पना लोकांना कशी पटवून देण्याचा प्रयत्न करता या प्रश्नावर ते म्हणाले की, मी इतरांना पटवून देण्याचा फारसा प्रयत्न करत नाही. "मी इतरांना पटवून देण्याचा प्रयत्न करत नाही, तर मी माझे विचार आणि ते चित्रित करण्याच्या पद्धती स्वतःला पटवून देण्याचा प्रयत्न करतो",असे ते म्हणाले. चित्रपट विषयक पत्रकार मयंक शेखर यांनी हा संवाद साधला.
* * *
PIB Mumbai | Jaydevi PS/S.Kane/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1878482)
Visitor Counter : 216