माहिती आणि प्रसारण मंत्रालय
लोकांच्या चेहेऱ्यावर स्मितहास्य आणणे आणि त्यांना हसायला लावणे यातूनच मला काम करत राहण्याची प्रेरणा मिळते: अभिनेता वरुण शर्मा
चित्रपटांना मिळालेले यश म्हणजे चित्रपट क्षेत्रातील माझ्या आतापर्यंतच्या प्रवासाला आकार देणाऱ्या अनेक अपयश आणि पराभवांसारखाच शिकण्याचा एक अनुभव आहे : दिग्दर्शक मृगदीपसिंग लांबा
गोवा/मुंबई, 23 नोव्हेंबर 2022
“रोज सकाळी उठणे आणि मला जे काम करायला आवडते आणि जे करायची इच्छा मला नेहमीच होती ते काम करणे म्हणजे माझ्यासाठी यश आहे,” असे ‘फुकरे’ चित्रपटांच्या मालिकेत भूमिका करणारे अत्यंत लोकप्रिय अभिनेता वरुण शर्मा म्हणाले. गोवा येथे सध्या सुरु असलेल्या 53 इफ्फी मध्ये “यशाच्या पाटीवर तुमचे नाव कसे कोराल” या विषयासंदर्भात आयोजित केलेल्या “संभाषणात्मक” सत्रामध्ये उपस्थित प्रेक्षकांन उद्देशून ते बोलत होते. ‘फुकरे’ चित्रपटांच्या मालिकेचे दिग्दर्शक मृगदीपसिंग लांबा हे देखील या चर्चासत्रात उपस्थित होते.
वरुण शर्मा म्हणाले की, त्यांना थरारक किंवा थोड्या गडद छटा असलेल्या इतर शैलीतील चित्रपटांमध्ये काम करून बघायला आवडेल पण तरीही विनोदी चित्रपटात काम करणे त्यांच्या आवडीचे काम आहे. विविध चित्रपटांतून त्यांनी साकारलेल्या भूमिकांना प्रेक्षकांनी दिलेल्या प्रतिसादाबाबत वरुण यांनी कृतज्ञता व्यक्त केली. ते पुढे म्हणाले की कदाचित त्यांच्या पसंतीचा प्रकार असलेले विनोदी चित्रपट त्यांना प्रेक्षकांच्या चेहेऱ्यावर स्मितहास्य आणता आल्याबद्दल आणि त्यांना हसायला लावल्याबद्दल समाधान मिळवून देते आणि त्यातूनच पुढे काम करत राहण्याची प्रेरणा मिळत जाते.
![](https://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/Vs-17VDL.jpg)
अभिनेता म्हणून आपल्या कारकिर्दीबद्दल मत व्यक्त करताना वरुण शर्मा म्हणाले, “अभिनेते त्यांच्या कारकीर्दीच्या सुरुवातीलाच विशिष्ट शैली किंवा प्रकार निर्माण करण्याबद्दल विचार करत नाहीत तर एक अभिनेता म्हणून नंतरच्या काळातील प्रवासात, विविध प्रकारच्या भूमिका साकारताना, किंवा इतर काही कार्य करत असताना ती शैली त्यांना सापडत जाते.चित्रपटांतील भूमिकांसाठी मी अनेक वर्षे योग्य व्यक्तींची निवड करण्याचे काम करत होतो, अशा कामांतून देखील आपल्याला आपल्या आवडीचा चित्रपट प्रकार सापडायला मदत होते.”
चित्रपटसृष्टीतील स्वतःच्या प्रवासाचे स्मरण करताना वरुण शर्मा यांनी ‘बाजीगर’ हा चित्रपट पाहिल्यानंतर आपल्यामध्ये अभिनेता होण्याची इच्छा कशी निर्माण झाली आणि ‘दिलवाले’ या चित्रपटातील भूमिकेसह याचे एक वर्तुळ कसे पूर्ण झाले हे सांगितले. येत्या नाताळच्या सुमारास प्रदर्शित होणाऱ्या त्यांच्या ‘सर्कस’ या चित्रपटातील काही किस्से त्यांनी उपस्थितांशी सामायिक केले.
![](https://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/Vs-2TN5T.jpg)
दिग्दर्शक मृगदीपसिंग लांबा त्यांच्या चित्रपटांविषयी चर्चा करताना म्हणाले की ते त्यांच्या चित्रपटांचे यश साजरे करण्याबाबत फारसे उत्सुक नसतात, तसेच ते कोणत्याही चित्रपटांमध्ये सुरु असलेल्या जीवघेण्या स्पर्धेत सहभागी होत नाहीत. त्याऐवजी असे यश म्हणजे चित्रपट क्षेत्रातील आतापर्यंतच्या प्रवासाला आकार देणाऱ्या अनेक अपयश आणि पराभवांसारखाच शिकण्याचा एक अनुभव आहे.
चित्रपट सृष्टीतील कारकीर्दीच्या सुरुवातीला आपण राम गोपाल वर्मा यांचे भयपट पाहून भयपटांच्या क्षेत्रात रमलो होतो याचा उल्लेख करून दिग्दर्शक लांबा म्हणाले की, त्या प्रवासात मध्येच केव्हातरी, त्यांच्या स्वतःच्या कथाकथन शैलीशी सुसंगत असलेली एक कथा त्यांच्या हाती आली. विनोदी चित्रपट हा निर्माण करण्यास अत्यंत कठीण प्रकार आहे हे मान्य करून ते म्हणाले की यात विनोदाच्या वस्तुनिष्ठ संकल्पना, योग्य वेळ आणि आवाजातील चढ उतार जमण्याचे महत्त्व तसेच प्रेक्षक या विनोदाला कशा प्रकारे स्वीकारतील ही भीती या सर्वांचा विचार करावा लागतो. मात्र, हेच सतत बदलते घटक, विशिष्ट दिग्दर्शकांना चित्रपटांमध्ये आपापली शैली निर्माण करण्यास सहाय्यक ठरतात असे त्यांनी सांगितले. हा मुद्दा स्पष्ट करण्यासाठी त्यांनी गेल्या दोन तीन वर्षांत विशिष्ट शैलीसह अनेक सुपरहिट चित्रपटांची निर्मिती करणाऱ्या प्रियदर्शन, अनिस बज्मी तसेच डेव्हिड धवन यांच्या चित्रपटांचा उल्लेख केला.
‘फुकरे’ मालिकेतील चित्रपटांना मिळालेल्या लोकप्रियतेचा विचार करता, यासंदर्भात उपस्थितांशी झालेली चर्चा आणि प्रश्नोत्तरे या चित्रपटाची निर्मिती प्रक्रिया, लोकांचा प्रतिसाद आणि भूमिकांची घडण यावर केंद्रित असणे अपेक्षितच होते. या चित्रपटात दाखविण्यात आलेली पात्रे दिल्लीच्या आसपासच्या परिसरातील सामान्य लोकांवर आधारलेली होती ही बाब वरुण आणि मृगदीप या दोघांनी मान्य केली. प्रेक्षकांनी या पात्रांवर प्रेम केले आणि ते त्यांच्याशी इतक्या मोठ्या प्रमाणात जोडले गेले की, याच चित्रपटाचा पुढचा भाग लिहिताना आता या नव्या चित्रपटातील पात्रे कशी वागली पाहिजेत आणि ठराविक मापदंडात या विनोदी चित्रपटात ती समर्पकपणे कशा प्रकारे सामावली जातील याबद्दल प्रेक्षकांच्या काय अपेक्षा असतील इत्यादी अनेक गोष्टींचा विचार करावा लागला.
‘दिलवाले’ ‘छिछोरे’ या चित्रपटांतील भूमिकांशिवाय,वरुण शर्मा यांची ‘फुकरे मालिकेच्या चित्रपटांत सर्वसामान्य घरातील असामान्य शक्ती असलेल्या मुलाची भूमिका देखील मोठ्या प्रमाणात गाजली. ‘फुकरे’ चित्रपट मालिकेतील तिसरा चित्रपट 2023 मध्ये प्रदर्शित होत असून या प्रदर्शनासह ‘फुकरे’ या चित्रपट मालिकेतील पहिल्या चित्रपटाला एक दशक पूर्ण होत आहे. विनोदी चित्रपटांच्या क्षेत्रात पदार्पण करून ‘फुकरे’ चित्रपटाची सुरुवात करण्यापूर्वी दिग्दर्शक मृगदीप सिंग लांबा यांनी डॉन (फरहान अख्तर निर्मित) आणि युवराज (सुभाष घई निर्मित) या चित्रपटांसाठी सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केले आहे. गोवा येथे सुरु असलेल्या 53 व्या इफ्फीमध्ये सत्यजित रे फिल्म अँड टेलीव्हिजन इन्स्टिटयूट (एसआरएफटीआय), एनएफडीसी,फिल्म अँड टेलीव्हिजन इंस्टीटयूट ऑफ इंडिया (एफटीआयआय) तसेच ईएसजी यांच्या संयुक्त विद्यमाने तज्ञांचे मार्गदर्शनपर मास्टरक्लासेस आणि संभाषणात्मक सत्रांचे आयोजन करण्यात येत आहे. या वर्षीच्या इफ्फीदरम्यान या दोन्ही कार्यक्रमांची एकूण 23 सत्रे घेण्यात येणार आहेत. या विषयाचे विद्यार्थी तसेच चित्रपटाबाबत अधिक माहिती जाणून घेण्यास उत्सुक असलेले रसिक यांना चित्रपट निर्मिती प्रक्रियेच्या प्रत्येक पैलूची माहिती मिळावी या उद्देशाने इफ्फीमध्ये हे मास्टरक्लासेस आणि संभाषणात्मक सत्रे घेण्यात येत आहेत.
* * *
PIB Mumbai | Jaydevi PS/S.Chitnis/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1878442)
Visitor Counter : 245