माहिती आणि प्रसारण मंत्रालय
53व्या इफ्फीमध्ये एरहार्ट या झेक चित्रपटाचा आशियातील प्रीमियर
देशातील राजकीय परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर फुलणारी प्रेमकथा :दिग्दर्शक जान ब्रेझिना
गोवा/मुंबई, 22 नोव्हेंबर 2022
‘देशातील राजकीय परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर फुलणारी प्रेमकथा’ अशा शब्दात दिग्दर्शक जान ब्रेझिना यांनी त्यांच्या फिक्शन प्रकारातील एरहार्ट या पहिल्या चित्रपटाचे वर्णन केले आहे. सध्या गोवा येथे सुरु असलेल्या 53 व्या इफ्फी अर्थात भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात आशियाई चित्रपट विभागात झेक प्रजासत्ताक या देशाच्या चित्रपटाचा प्रीमियर सादर करण्यात आला.
आईला घेण्यासाठी स्वतःच्या शहरात आलेल्या 23 वर्षीय तरुण मुलाला त्याच्या कुटुंबाच्या भूतकाळाबद्दल आणि स्थानिक समुदायाच्या काळ्या वारशाबद्दल माहिती समजल्यानंतर काय घडते हे या चित्रपटात दर्शविण्यात आले आहे.
पत्रकार परिषदेत झेकोस्लावीया देशाच्या इतिहासाबद्दल बोलताना जान ब्रेझिना म्हणाले, “30 वर्षांपूर्वी झेक प्रजासत्ताकाचे समाजवादी राज्यपद्धतीकडून भांडवलशाहीकडे स्थित्यंतर झाले. हा बराच गोंधळाचा काळ होता. देशाच्या मालकीच्या सर्व मालमत्तेचे खासगीकरण करण्यात आले. आणि या घडामोडीशी संबंधित अनेक गुन्हे त्यावेळी घडले. हे सर्व 30 वर्षांपूर्वी घडले पण त्याचा प्रभाव काही प्रमाणात आजही जाणवतो. म्हणून, आजच्या झेक प्रजासत्ताकातील तरुण पिढी या सगळ्याकडे कोणत्या दृष्टीकोनातून बघते याचे चित्रण करणे हा माझा चित्रपट निर्मितीमागील उद्देश होता.”
झेक प्रजासत्ताकमध्ये पुढच्या वर्षी वसंत किंवा ग्रीष्म ऋतूमध्ये हा चित्रपट प्रदर्शित होईल अशी माहिती निर्माता मॅरेक नोवाक यांनी दिली. झेक देशातील चित्रपट बाजाराविषयी बोलताना ते म्हणाले, “चित्रपटाच्या बाजाराच्या आकाराचा विचार करता, भारत आणि झेक प्रजासत्ताक यांची तुलना होऊ शकत नाही. आम्ही केवळ 10 दशलक्ष लोकसंख्येचा देश आहोत आणि आमच्याकडे दर वर्षी 30 ते 35 फिक्शन प्रकारचे चित्रपट तयार होतात.” प्रत्येक आठवड्यात त्याच्या देशात पाच ते सहा चित्रपट प्रदर्शित होत असल्यामुळे, महामारी पश्चात काळात आमच्या देशात प्रदर्शनाची प्रतीक्षा करणाऱ्या चित्रपटांची संख्या खूप मोठी होती अशी माहिती निर्माता मॅरेक नोवाक यांनी दिली. “ही गर्दी संपेपर्यंत एरहार्ट प्रतीक्षा करेल,”ते पुढे म्हणाले.
32 च्या कॉटबस चित्रपट महोत्सवात एरहार्ट हा चित्रपट प्रदर्शित करण्यात आला आहे.
या चित्रपटाविषयीचे टेबल टॉक ऐकण्यासाठी कृपया येथे क्लिक करा:
* * *
PIB Mumbai | G.Chippalkatti/S.Chitnis/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1878151)
Visitor Counter : 207