माहिती आणि प्रसारण मंत्रालय

अभिनय माझं सर्वस्व, अभिनय माझं जीवन: इफ्फी महोत्सवात संवाद साधताना अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी

Posted On: 22 NOV 2022 10:10PM by PIB Mumbai

गोवा/मुंबई, 22 नोव्‍हेंबर 2022

 

जर तुम्हाला शून्यापासून सुरुवात करायची असेल, तर तुम्ही जे शिकलात ते आधी तुम्हाला मनातून काढून टाकावे लागेल,”

असे आज आयकॉनिक अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी यांनी सांगितलं. 53 व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवादरम्यान (इफ्फी) ‘अभिनेता म्हणून प्रवास’ या विषयावरील संवाद सत्रात मार्गदर्शन करताना सिद्दीकी बोलत होते. ब्लॅक फ्रायडे, न्यू यॉर्क, पीपली लाइव्ह, कहानी आणि गँग्स ऑफ वासेपूर यांसारख्या बॉलीवूडच्या काही प्रमुख चित्रपटांमध्ये त्यांनी एक अभिनेता म्हणून मोठे नाव कमावले आहे.

अभिनेता होण्याच्या आपल्या प्रवासाबद्दल त्यांनी भरभरून सांगितलं. स्थानिक महाविद्यालयातून पदवी घेतल्यानंतर काही काळासाठी त्यांनी पेट्रोकेमिकल कंपनीत केमिस्ट म्हणून काम केलं. मात्र, अभिनेता होण्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी ते रंगभूमीशी जोडले गेले. अखेरीस त्यांनी दिल्लीच्या नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा (एनएसडी) मध्ये प्रवेश घेतला.

कारकिर्दीच्या सुरुवातीच्या दिवसांमध्ये केलेल्या संघर्ष आणि आव्हानांबद्दल विचारलं असता त्यांनी सांगितलं की दुसरा कुठला पर्याय नसल्यामुळे छोट्या भूमिकांची ऑफर स्वीकारावी लागली, टिकून राहावे लागले. कठीण वेळ तुम्हाला मजबूत बनवते.

“गँग्स ऑफ वासेपूर हा चित्रपट त्यांच्या अभिनय कारकिर्दीला कलाटणी देणारा कसा ठरला या प्रश्नाला त्यांनी उत्तर दिलं, " या चित्रपटामुळे माझा स्वतःवर विश्वास बसला. मला विश्वास होता की यानंतर माझा संघर्ष संपेल आणि लोक या चित्रपटाला दाद देतील"

नेटफ्लिक्स आणि इतर ओटीटी प्लॅटफॉर्मवर वेब सीरिजमध्ये काम करण्याचा अनुभवही त्यांनी शेअर केला. सुरुवातीला ओटीटी प्लॅटफॉर्मवर मालिकांमध्ये काम करण्यास आपल्याला संकोच वाटत होता कारण त्याबद्दल काहीच माहिती नव्हती, असं त्यांनी सांगितलं. या प्लॅटफॉर्मवर काम करण्यासाठी अनुराग कश्यपनं त्यांचं मन वळवलं. सेक्रेड गेम्स वेब-सिरीज नेटफ्लिक्सवर खूप हिट ठरली हे लक्षात घेण्यासारखे आहे.

मंटोच्या बायोपिकमध्ये त्यांनी प्रख्यात उर्दू लेखक सआदत हसन मंटो यांची आणि ठाकरे चित्रपटात  शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची भूमिका साकारली. या दोन अष्टपैलू भूमिका साकारताना आलेले अनुभव त्यांनी सांगितले. काम करण्याची प्रेरणा कुठून मिळते असं विचारलं असता, नवाजुद्दीन म्हणाले, “अभिनय हा माझा छंद आहे आणि तो करताना मी दमत नाही. अभिनय हे माझं सर्वस्व आहे, माझे जीवन आहे. माझी अभिनयाची तहान भागवण्यासाठी एक आयुष्यही पुरेसं नाही” 

आगामी चित्रपट हड्डीमध्ये त्यांनी साकारलेल्या ट्रान्सजेंडरच्या भूमिकेबद्दलचे काही किस्सेदेखील त्यांनी सांगितले.


* * *

PIB Mumbai | G.Chippalkatti/P.Jambhekar/D.Rane

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1878143) Visitor Counter : 150


Read this release in: Urdu , English , Hindi , Tamil