माहिती आणि प्रसारण मंत्रालय
इफ्फी 53 मध्ये सर्वोत्कृष्ट पदार्पण चित्रपट श्रेणी अंतर्गत द आयलंड ऑफ लॉस्ट गर्ल्स या एका आगळ्यावेगळ्या कौटुंबिक थ्रिलरपटाचे प्रदर्शन
बॅकपॅकमध्ये बाळासह चित्रपटात काम करणे ग्लॅमरस नाही: दिग्दर्शक अॅन मेरी श्मिट
गोवा/मुंबई, 22 नोव्हेंबर 2022
पालकत्व हे वाटतं तेवढं सोपं आणि लहान काम नाही. किमान एक मूल असलेल्या कोणत्याही पालकांना विचारा, तुम्हाला पालकत्वावरचं- मग त्यात चढ-उतार, तणाव आले आणि आव्हानं आली- यावर किमान तासाभराचं व्याख्यान मिळेल. आता कल्पना करा की, सहा मनमौजी मुलांसह एक जोडपं बाजा मेक्सिकोच्या समुद्राच्या गुहांमध्ये एक फीचर फिल्म करत आहे. अक्षरशः कोणाच्याही मदतीशिवाय ते अनेकदा समुद्री सिंह आणि महाकाय हत्ती सीलना चुकवत आहेत आणि तेही त्यांच्या दहा, सहा आणि चार वर्षांच्या सर्वात लहान तीन मुलींसह, मुख्य कलाकार म्हणून. कोरोनाडो येथील श्मिट कुटुंब त्यांच्या ‘फॅमिली’ थ्रिलर द आयलँड ऑफ लॉस्ट गर्ल्ससह ५३ व्या IFFI मध्ये दाखल झाले आहेत ते त्यांचा अनोखा चित्रपट उपक्रम पूर्ण करण्याचा अनुभव चित्रपट रसिकांसोबत शेअर करण्यासाठी.
प्रसारमाध्यमं आणि इफ्फी प्रतिनिधींसह पीआयबीने फिल्म क्रूसाठी आयोजित केलेल्या इफ्फी 'टेबल टॉक' या संवादात चित्रपटाच्या दिग्दर्शिका आणि सहा मुलांची आई अॅन मेरी श्मिट सहभागी झाल्या. सर्वसाधारणपणे मुलांसोबत आणि विशेषतः स्वतःच्या मुलांसोबत काम करणे मनोरंजक आहे, असं त्यांनी सांगितलं. “बॅकपॅकमध्ये बाळासह चित्रपटात काम करणं मात्र अजिबात मोहक नाही; हे खूप कष्टाचे आहे. आम्ही मुलांची क्षमता हेरल्या आणि त्या क्षमता जगासमोर मांडण्यासाठी चित्रपटात दाखवल्या”, असे त्यांनी नमूद केले.
संभाषणात सामील होताना, चित्रपटाचे निर्माते आणि मुलांचे वडील, ब्रायन श्मिट म्हणाले की, स्वतःच्या मुलांसोबत चित्रपट बनवणे हा एक अनोखा अनुभव होता.
कोविड साथीच्या आजारापूर्वीच चित्रपटाचे चित्रीकरण झाले असले तरी, या जोडप्याने चित्रपट प्रदर्शित होण्यासाठी सर्वात वाईट महामारी संपेपर्यंत वाट पाहिली. “चित्रपट बनवण्याचा एक आनंद म्हणजे जगभरात फिरण्याची आणि विविध प्रेक्षकांना चित्रपट दाखवण्याची संधी मिळणे. आमच्या मुलींना ते करण्याची संधी मिळेल याची खातरजमा करायची आहे,” ब्रायन पुढे म्हणाले.
चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान आलेल्या आव्हानांची आठवण करून देताना अॅन मेरी यांनी उदाहरणं दिली. त्या म्हणाल्या “ चित्रपटात आम्ही केलेल्या गोष्टी करण्यासाठी चित्रपटाचा सेट तयार करणे जवळपास अशक्य होते. योग्य जागा शोधणे खरोखरच एक आव्हान होते. सर्वात कठीण गोष्ट म्हणजे वेळ आणि नैसर्गिक प्रकाशाचा सामना करणे. काही दृश्यात पुरेसा प्रकाश मिळाला नाही आणि नंतर पोस्ट-प्रॉडक्शनमध्ये ते प्रकाशासह करून घ्यावे लागले. नैसर्गिक सेटमध्ये खूप वेगवेगळी साहसे करता आली. ब्रायनलाही एक प्रसंग आठवला- पाण्यात चित्रीकरण सुरू असताना शेकडो टूना खेकडे आले आणि मुलांना झोंबू लागले.
सारांश
महाकाय लाटा, शेकडो सागरी सिंह आणि महाकाय हत्ती सील यांच्यात अडकून तीन मुली सागरी गुहेत एकत्र राहतात. बाजा मेक्सिकोच्या समुद्राच्या गुहांमधील लोकेशनवर शूट केलेला, हा इफ्फी महोत्सवातला सर्वात आ वासायला लावणारा तणावपूर्ण चित्रपट आहे.
* * *
PIB Mumbai | G.Chippalkatti/P.Jambhekar/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1878079)
Visitor Counter : 189