माहिती आणि प्रसारण मंत्रालय
शहरी समाजातील किशोरवयीनांना सध्या भेडसावणाऱ्या संवेदनशील समस्या ‘हदीनेलन्तु’ मांडतो: दिग्दर्शक पृथ्वी कोनानूर
53 व्या इफ्फीत इंडियन पॅनोरमा कथापट विभागाअंतर्गत या चित्रपटाने शुभारंभ झाला
गोवा/मुंबई, 21 नोव्हेंबर 2022
एका निष्काळजी कृत्यामुळे संभ्रमाच्या गर्तेत फेकल्या गेलेल्या दोन किशोरवयीन विद्यार्थ्यांच्या जीवनावरील ‘हदीनेलन्तु’ हे मार्मिक भाष्य आहे.
गोव्यात 53 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात पीआयबीने आयोजित केलेल्या 'टेबल टॉक्स' कार्यक्रमात दिग्दर्शक पृथ्वी कोनानूर यांनी आज संवाद साधला.
हा चित्रपट दोन विद्यार्थ्यांभोवती फिरतो. एका भयंकर अनुभवामुळे त्यांच्यासाठी जीवन एक दुःस्वप्न बनते. त्यांच्यामागचे शुक्लकाष्ठ संपतच नाही असे कोनानूर यांनी सांगितले.
53 व्या इफ्फीत इंडियन पॅनोरमा कथापट विभागाअंतर्गत या कन्नड चित्रपटाने शुभारंभ झाला.

‘हदीनेलन्तु’ ही दीपा आणि हरीची गोष्ट आहे. महाविद्यालयाची वेळ संपल्यावर वर्गात ते आपले उत्कट क्षण चित्रित करतात. ते चित्रीकरण ऑनलाईन पसरते. या प्रकरणात जात आणि आर्थिक दरी त्यांच्या आयुष्यात खलनायक म्हणून उभे ठाकतात, आणि आटोक्यात न येणारी आग भडकतच जाते.
पृथ्वी कोनानूर यांच्या मते, पुरुषसत्ताक मानसिकता, जातीभेद, आर्थिक भेद, सामाजिक दायित्वे आणि गुंतागुंत यासह विविध विषयांवर चित्रपट भाष्य करतो, त्यातून 'आहे रे' आणि 'नाहिरे' यातील भेद स्पष्टपणे उघड होतो. “सामान्य लोकांना अनपेक्षित परिस्थितीत काय काय सहन करावे लागते याचा यात शोध घेतला जातो” असेही त्यांनी सांगितले.

चित्रपट कोणतीही बाजू घेत नाही किंवा मत मांडत नाही. प्रेक्षकांनीच यावर विचार करावा अशी यासंदर्भात मोकळीक दिल्याचे त्यांनी चित्रपटाच्या शेवटाबद्दल सांगितले.
दिग्दर्शकाच्या म्हणण्यानुसार, हदीनेलन्तु हे शीर्षक नायकाच्या किशोरवयीन वयाचे चित्रण करण्यासाठी सतरा आणि अठरा या कन्नड शब्दांच्या संयोजनातून आले आहे.
शर्लिन भोसले आणि नीरज मॅथ्यू यांनी अनुक्रमे नायिका दीपा आणि नायक हरीची भूमिका साकारली आहे. इतर कलाकार आणि तंत्रज्ञांसह ते ‘टेबल टॉक्स’ मध्ये सहभागी झाले.
विविध आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये दिग्दर्शक पृथ्वी कोनानूर यांचे चित्रपट प्रदर्शित झाले असून, त्यांनी नामांकने, पुरस्कार मिळवले आहेत. हदीनेलन्तु हा त्यांचा चौथा चित्रपट असून, बुसान आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव 20 मधे त्याचा वर्ल्ड प्रीमियर झाला होता.
चित्रपटाबद्दल:
दिग्दर्शक: पृथ्वी कोनानूर
निर्माता: कोनानूर प्रॉडक्शन
पटकथा : पृथ्वी कोनानूर, अनुपमा हेगडे
छायाचित्रण : अर्जुन राजा
संकलक: शिवकुमार स्वामी
कलाकार: शर्लिन भोसले, नीरज मॅथ्यू, रेखा कुडलिगी, भवानी प्रकाश, रवी हेब्बाली
सारांश:
दीपा आणि हरी हे इयत्ता 12वीतले विद्यार्थी शनिवारी दुपारी महाविद्यालयाची वेळ संपल्यावर वर्गात दीपाच्या फोनवर त्यांचे उत्कट क्षण चित्रित करतात. मुख्याध्यापक त्यांना सोमवारी बोलावून घेतात आणि त्यांचा व्हिडीओ आता इंटरनेटवर असल्याचे सांगतात. त्यांची कुटुंबे उध्वस्त होतात. ते अनभिज्ञ असतानाच महाविद्यालय प्रशासन त्यांच्या भवितव्याचा निर्णय घेते. पण जेव्हा त्यांच्या जातीचा प्रश्न समोर येतो तेव्हा गोष्टी नियंत्रणाबाहेर जाऊ लागतात.
* * *
PIB Mumbai | U.Ujgare/V.Ghode/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1877963)