माहिती आणि प्रसारण मंत्रालय

चित्रपट निर्मिती ही फुटबॉलसारखी आहे, प्रत्येक सदस्य महत्वाचा असतो: इफ्फी 53 मध्ये मास्टर क्लास


चुकीचे प्रेक्षक येऊन माझा चित्रपट पाहतील याची भीती वाटते: शुजित सरकार

चाचणी प्रदर्शन, प्रेक्षकांचे मत जाणून घेण्याचा चांगला मंच: अद्वैत चंदन

Posted On: 21 NOV 2022 7:56PM by PIB Mumbai

गोवा/मुंबई, 21 नोव्‍हेंबर 2022

 

चित्रपट निर्मिती म्हणजे चित्रकारिता किंवा टेनिसचा खेळ नाही, ज्यात एकच व्यक्ती असते किंवा एकाच व्यक्तीच्या मेहनतीवर यश अवलंबून असते. चित्रपट निर्मिती म्हणजे फुटबॉल किंवा क्रिकेटचा खेळ आहे, ज्यात चमूचा प्रत्येक सदस्य महत्वाचा असतो. पणजी, गोवा इथे सुरु असलेल्या 53 व्या भारताच्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवादरम्यान आज आयोजित मास्टर क्लासमध्ये हे विचार व्यक्त करण्यात आले. राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार विजेता दिग्दर्शक शुजित सरकार आणि दिग्दर्शक/लेखक अद्वैत चंदन ‘चित्रपट निर्मिती सांघिक कार्य आहे’ या विषयावर आयोजित मास्टर क्लासमध्ये सहभागी झाले होते. सुरवातीच्या सत्रात, विकी डोनर, पिंक, सरदार उधम या सारख्या अनेक लोकप्रिय चित्रपटांचे दिग्दर्शक शुजित सरकार म्हणाले, मी चित्रपटातील कलाकार आणि सहायकांची निवड करताना त्यांचे कौशल्य यापेक्षा त्यांना चित्रपटांची समज किती आहे, याला प्राधान्य देतो. “आपण कुणासोबत काम करत आहोत याबद्दल प्रत्येकाने जागरूक असायला पाहिजे. लेखक आणि दिग्दर्शक यांच्यात होणारा संवाद हा सर्वात महत्वाचा असतो. फुटबॉल ही माझी आवड आहे, छंद आहे. मला चित्रपट दिग्दर्शनापेक्षा जास्त फुटबॉल आवडतो. चित्रपट बनवताना एक चमू म्हणून काम करताना माझा फुटबॉलचा अनुभव मला खूप मदत करतो,” असे सरकार म्हणाले.

सांघिक प्रयत्नांबद्दल आपले मत दृढपणे मांडताना ‘लाल सिंघ चढ्ढा’ आणि ‘सिक्रेट सुपरस्टार’ चित्रपटांचे दिग्दर्शक अद्वैत चंदन म्हणाले, की कलाकार आणि सहायक निवडताना मी त्या खोलीतला सर्वात अज्ञानी माणूस असणे मला आवडते. “माझा चित्रपट दिग्दर्शनाचा अनुभव फारसा दीर्घ नसल्याने, ज्यांच्यावर मी विसंबून राहू शकेन असे लोक माझ्या चमूत असलेले मला आवडते,” असे ते म्हणाले. कलाकार आणि दिग्दर्शक यांच्यात चित्रपट निर्मिती दरम्यान होणाऱ्या संवादाविषयी सखोल चर्चा करताना शुजित सरकार म्हणाले, कुठल्याही कलाकारासोबत काम करताना सर्वात महत्वाची गोष्ट असते ती म्हणजे त्या कलाकाराची समज. “काही कलाकार अभिनयात उत्तम असतात, पण त्यांची समज फारच कमी असते. काही लोकांची समज इतकी जास्त असते की संहिता वाचताना त्यांच्या मनात येणाऱ्या प्रश्नांची उत्तरं देताना आमच्याच नाकी नऊ येतात. वेगळ्या वेगळ्या कलाकारांसाठी वेगवेगळ्या पद्धती वापराव्या लागतात जेणेकरून संहितेला आणि चित्रपटाच्या संकल्पनेला न्याय दिला जाऊ शकेल. तुमचे विचार प्रत्यक्षात उतरविण्यासाठी तुम्हाला प्रत्येक दृश्य आणि प्रत्येक संहितेअनुरूप काम करावे लागते.” 

प्रत्येक कलाकारासोबत वेगळ्या पद्धतीने काम करावे लागते, असे मत अद्वैत चंदन यांनी व्यक्त केले. ते म्हणाले, जर दिग्दर्शकाला कलाकार आणि सहायकांच्या चमूतले सगळेच लोक खरोखरच आवडत असतील तर तो/ती त्यांच्या चुका सुधारू शकतो आणि पुढे जाऊ शकतो. त्यांच्या मते, चांगले सहायक मिळणे हे चांगला जोडीदार मिळण्याइतकेच महत्वाचे असते. “चित्रपट निर्मिती म्हणजे लग्न आहे. तुम्हाला तुमच्या सहायकांना जोडीदारासारखी वागणूक द्यावी लागते, त्यांचा सन्मान करावा लागतो आणि त्यांच्यावर प्रेम करावे लागते. कधी तुमचे काम सुरळीतपणे होईल, तर कधी तुमचे मार्ग वेगळे होतील. तुमचे एकमत होईल, मतभेद होतील, वादविवाद आणि भांडणे होतील. मात्र, तुम्ही एकतर समोरच्याला पटवून द्याल किंवा तो तुम्हाला पटवून देईल,” अशी भूमिका त्यांनी मांडली.

चित्रपटाची पटकथा लिहिताना लेखकाला कसं ‘खुलवायचं’ याविषयी बोलताना शुजित सरकार म्हणाले, दिग्दर्शक आणि लेखक यांनी संवाद साधने गरजेचे आहे आणि चर्चा करण्यात खूप वेळ घालवणे महत्वाचे आहे, पटकथेचा भाग नसलेल्या वेगवेगळ्या गोष्टींवर बोलणे देखील महत्वाचे आहे. आमीर खान कडून तुम्ही काय शिकलात, या प्रश्नाला उत्तर देताना अद्वैत चंदन म्हणाले, आमीर अक्षरशः चित्रपटाची शाळा आहेत, ज्याच्याकडून उदयोन्मुख चित्रपट निर्माते खूप काही शिकू शकतात. “आमीर खूपच मोकळे आणि समंजस आहेत. ते आपल्या चमूची मतं मनापासून ऐकून घेतात,” असे चंदन म्हणाले.

चित्रपट प्रदर्शनाविषयी या दिग्दर्शकांनी परस्पर विरोधी मत व्यक्त केलीत. एकीकडे अद्वैत म्हणाले की प्रेक्षकांकडून चित्रपटाबद्दल मत जाणून घेणे चांगले आहे, तर शुजित म्हणाले, त्यांचा या कल्पनेला पूर्ण विरोध आहे. “प्रेक्षक हे माझ्या चित्रपटांसाठी सगळ्यात शेवटी आहेत. माझ्यासाठी मला जे सांगायचे आहे, माझ्या मनात जे आहे ते महत्वाचे आहे. मी काय केले आहे किंवा काय करायचा प्रयत्न केला आहे, याचे चांगले मूल्यमापन माझ्याशिवाय कुणीच करू शकत नाही,” ते म्हणाले. ते म्हणाले माझे चित्रपट बघायला चुकीचे प्रेक्षक यायला नको, फक्त ही एकच भीती मला वाटत असते. पुढच्या सिनेमासाठी लोकांच्या अपेक्षांचा वाढता दबाव असतो हे मत देखील त्यांनी फेटाळून लावले. “दबाव हा न प्रेक्षकांचा असतो, न सिने सृष्टीचा, तर फक्त माझा स्वतःचा दबाव असतो. मी काही वाईट चित्रपट बनवले आहेत. मी असंख्य चुका केल्या आहेत. प्रत्येक चित्रपटातून मी या चुका सुधारण्याचा पुरेपूर प्रयत्न करतो,” असे ते म्हणाले. चित्रपट दिग्दर्शक म्हणून त्यांना कुठले क्षेत्र आजमवायचे आहे या प्रश्नावर अद्वैत म्हणाले, ते असा विचार करत नाहीत, तर कथा आणि त्यातील भावना यानुसार निर्णय घेतात.

मनोरंजन विश्वातील पत्रकार हिमेश माकंद यांनी या सत्राचे सूत्रसंचालन केले.

***
PIB Mumbai | U.Ujare/R.Aghor/DineshY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1877910) Visitor Counter : 198


Read this release in: English , Urdu , Hindi , Tamil