सुक्ष्म, लघु आणि मध्यम उदयोग मंत्रालय

‘आत्मनिर्भर भारता’चे ध्येय साकार करण्यात आगामी काळात प्लास्टीक उद्योगाची महत्त्वपूर्ण भूमिका-केंद्रीय मंत्री नारायण राणे


केंद्रीय सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयातर्फे गोव्यात जागतिक प्लास्टीक परिषदेचे आयोजन

Posted On: 16 NOV 2022 4:20PM by PIB Mumbai

पणजी, 16 नोव्हेंबर 2022

 

केंद्रीय सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालय आणि अखिल भारतीय प्लास्टीक निर्माता संघटनेच्या संयुक्त विद्यमाने जागतिक परिषदेचे गोव्यात आयोजन करण्यात आले आहे. ‘भारतीय प्लास्टीक उद्योगासाठी पाच ट्रिलीयन अमेरिकी डॉलर्स एवढ्या आकाराच्या अर्थव्यवस्थेत संधी’ ही या परिषदेची संकल्पना आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे, मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांच्या हस्ते या दोन दिवसीय परिषदेचे उद्घाटन करण्यात आले.

परिषदेला नारायण राणे यांनी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून संबोधित केले. याप्रसंगी बोलताना ते म्हणाले की, देशातील प्लास्टीक उद्योग अर्थव्यवस्थेचा अविभाज्य घटक आहे. सध्या सुमारे 50,000 उद्योग प्लास्टीक क्षेत्रात कार्यरत आहेत. यातील बहुतांश उद्योग सुक्ष्म, लघु आणि मध्यम आकाराचे आहेत. या उद्योगांचे देशाच्या अर्थव्यवस्थेत 3.5 लाख कोटी रुपयांचे योगदान आहे तसेच 50,000 हून अधिक लोकांना यामुळे रोजगार मिळाला आहे. भारतातून सुमारे 35 हजार कोटी रुपयांच्या प्लास्टीकची निर्यात होते.  

देशातील प्लास्टीकपैकी सुमारे 60 टक्के प्लास्टीकचा पुनःवापर केला जातो, हा दर विकसित देशांतील दरापेक्षा अधिक आहे. भारत सरकारच्या ‘मेक इन इंडिया’, ‘स्कील इंडिया’, ‘स्वच्छ भारत मोहीम’, ‘डिजीटल इंडिया’ या उपक्रमांच्या माध्यमातून प्लास्टीक उत्पादनात वृद्धी होत आहे. 2027 पर्यंत प्लास्टीक उद्योगाचा 10 लाख कोटी वार्षिक कारभार होण्याची अपेक्षा आहे, तसेच निर्यात वाढून दोन लाख टन होईल. या उद्योगाच्या माध्यमातून आगामी पाच वर्षांत एक कोटी लोकांना रोजगाराच्या संधी निर्माण होतील, असे नारायण राणे म्हणाले.

प्लास्टीक उद्योगाला चालना देण्यासाठी अद्ययावत तंत्रज्ञानासाठी भारत सरकार सर्वतोपरी सहकार्य करेल. जास्तीत जास्त उत्पादन वाढून देशाच्या अर्थव्यवस्थेत योगदानही वाढेल. आत्मनिर्भर भारताचे पंतप्रधानांनी ठेवलेले ध्येय पूर्ण करण्यासाठी प्लास्टीक उद्योगाला योगदान द्यावे लागेल, असे राणे म्हणाले.   

परिषदेला संबोधित करताना गोव्याचे मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांनी प्लास्टीक उद्योगाला कृषी क्षेत्राकडे प्राधान्याने लक्ष देण्याचे आवाहन केले. तसेच प्लास्टीक उद्योगासाठी गोवा सरकार सर्वतोपरी मदत करेल, असे ते म्हणाले.

दोन दिवसीय परिषदेत शासकीय ई-मार्केट प्लेसच्या माध्यमातून प्लास्टीक उद्योगाला संधी, प्लास्टीक उद्योगाला चालना देण्यासाठी भारत सरकारच्या योजना, भारतीय टूलिंग क्षेत्रात अद्ययावत तंत्रज्ञान अशा विविध विषयांवर तज्ज्ञांकडून मंथन केले जाणार आहे. परिषदेच्या उद्घाटन सत्राला गोव्याचे उद्योगमंत्री माविन गुदिन्हो, भारतीय प्लास्टीक निर्माता संघटनेचे अध्यक्ष मयूर शाह, केंद्रीय एमएसएमई मंत्रालयाच्या संयुक्त सचिव सुश्री मर्सी इपाओ, वाणिज्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव मनीष चढ्ढा यांची उपस्थिती होती.

परिषदेत 250 हून अधिक उद्योगसमूहांचा सहभाग आहे. तंत्रज्ञान प्रदर्शन, उद्योगप्रतिनिधींच्या बैठका, केस स्टडीज, बेस्ट प्रॅक्टिसेस, पॅनल चर्चा या परिषदेत होत आहेत.

S.Thakur/P.Malandkar

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBPanaji   Image result for facebook icon /PIBPanaji    /pib_goa   pibgoa[at]gmail[dot]com  /PIBGoa



(Release ID: 1876487) Visitor Counter : 144


Read this release in: Urdu , English , Hindi