शिक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

केंद्रीय शिक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष सरकार यांच्या हस्ते आज मुंबईत एआयसीटीईच्या अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या मराठी भाषेतील पुस्तकांचे उद्घाटन


"राष्ट्रीय शिक्षण धोरणात प्रादेशिक भाषांना दिलेले प्राधान्य, सरकारची सर्व प्रादेशिक भाषांमधील कटिबद्धता व्यक्त करणारे आहे"- केंद्रीय राज्यमंत्री डॉ. सुभाष सरकार

प्रादेशिक भारतीय भाषांमधील शिक्षण, विद्यार्थ्यांना तांत्रिक विषय समजून त्यात संशोधन करण्यास सुलभता आणणारे ठरेल- केंद्रीय राज्यमंत्री डॉ. सुभाष सरकार

Posted On: 14 NOV 2022 8:54PM by PIB Mumbai

मुंबई, 14 नोव्‍हेंबर 2022

 

देशातील विद्यार्थ्यांना इंग्रजीव्यतिरिक्त प्रादेशिक भाषांमध्येही अभियांत्रिकीचे शिक्षण घेता यावे या उद्देशाने नवी दिल्लीचे अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण संचालनालय यांच्या संयुक्त विद्यमाने आज मुंबईत मराठी भाषेत निर्मित पाठ्यपुस्तकांचा वितरण सोहळा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला केंद्रीय शिक्षण राज्यमंत्री सुभाष सरकार, उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, विद्यापीठ अनुदान आयोग आणि नवी दिल्लीच्या अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेचे अध्यक्ष जगदिश कुमार , डॉ. अभय वाघ, संचालक, तंत्रशिक्षण, महाराष्ट्र राज्य, विकास चंद्र रस्तोगी, (भा.प्र.से.) प्रधान सचिव, उच्च व तंत्रशिक्षण, महाराष्ट्र राज्य, डॉ. एम. पी. पुनिया, उपाध्यक्ष, अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद, नवी दिल्ली आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी, विविध शिक्षणसंस्थांच्या 12 प्रमुखांना आणि 12 विद्यार्थ्यांना ही मराठी पुस्तकांचा संच देखील वितरित करण्यात आला. तसेच, या पुस्तकांचे भाषांतर करणाऱ्या लोणेरे इथल्या डॉ बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठाचे प्र कुलगुरू, समन्वयक, भाषांतरकार, अशा सर्वांचा यावेळी सत्कार करण्यात आला.

यावेळी बोलतांना सुभाष सरकार म्हणाले की अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने अभियांत्रिकी अभ्यासक्रमाची पुस्तके भारतीय भाषांमध्ये उपलब्ध करुन देण्याचा हाती घेतलेला उपक्रम अतिशय स्तुत्य असून, राष्ट्रीय शिक्षण धोरणाच्या मार्गदर्शक तत्वाशी सुसंगत आहे.  "राष्ट्रीय शिक्षण धोरणात प्रादेशिक भाषांना प्राधान्य देण्याची सरकारची भूमिका केंद्र सरकारची प्रादेशिक भाषांविषयी कटिबद्धता दर्शवणारी आहे. आमच्या दृष्टीने भारतीय भाषा, भारतीयत्वाचा आत्मा आणि भविष्य आहे."भाषा केवळ संपर्काचे साधन नाही, तर आपली संस्कृती, समाज, श्रद्धा, परंपरा यांची ती अभिव्यक्ती आहे. त्यामुळे, प्रादेशिक भाषांमध्ये पुस्तके निर्माण करण्याचा हा उपक्रम कौतुकास्पद आहे."राष्ट्रीय शिक्षण धोरणात, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अनेक गोष्टींचा समावेश करण्यात आला आहे, असं त्यांनी सांगितलं. प्रादेशिक भाषांमधून तांत्रिक शिक्षण घेतल्यास, विद्यार्थ्यांना विषयाचे उत्तम आकलन होईल आणि संशोधनाला प्रोत्साहन मिळेल, असा विश्वास सरकार यांनी व्यक्त केला. या शिक्षण धोरणात, तांत्रिक शिक्षणात, मानवी मूल्ये अंतर्भूत करण्याचा विशेष प्रयत्न करण्यात आला आहे, असे त्यांनी पुढे सांगितले.

महाराष्ट्राचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं की, विद्यापीठ अनुदान आयोग आणि अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेच्या मदतीने, जून 2023 पर्यंत, महाराष्ट्रातील सर्व तंत्रशिक्षण अभ्यासक्रमातील पुस्तके मराठी भाषेत अनुवादित करण्याचे राज्य सरकारचे उद्दिष्ट आहे.

या कार्यक्रमात अभियांत्रिकी शिक्षण राबवत असलेल्या संस्थांच्या प्राचार्यांना आणि विद्यार्थ्यांना मराठी भाषेतील पुस्तकांच्या संचाचे वितरण करण्यात आले. राज्यातील पदविका/पदवी / पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम राबवणाऱ्या तंत्रशिक्षण संचालनालय अंतर्गत असलेल्या अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र, वास्तुशास्त्र, एचएमसीटी, एमसीए, एमबीए अशा सर्व संस्थामधील अधिकारी, कर्मचारी आणि विद्यार्थी या कार्यक्रमात दूरस्थ पद्धतीने सहभागी झाले होते.

शालेय शिक्षणापासून महाविद्यालयीन शिक्षणापर्यंत मातृभाषेतून शिक्षण दिले गेले तर विद्यार्थ्यांना त्या विषयाची समज अधिक चांगल्याप्रकारे होऊ शकते, हे संशोधनातून सिद्ध झाले आहे, असे तंत्रशिक्षण संचालनायाचे अध्यक्ष डॉ अभय वाघ यांनी यावेळी सांगितले. 

 

* * *

PIB Mumbai | S.Tupe/R.Aghor/B.Sontakke/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1875965) Visitor Counter : 304


Read this release in: English , Urdu , Hindi