माहिती आणि प्रसारण मंत्रालय

केंद्रीय मंत्री अनुराग सिंह ठाकूर यांनी मुंबईत माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या माध्यम कार्यालयांच्या कामकाजाचा आणि स्वच्छता मोहीम 2.0 अंतर्गत सुरु असलेल्या उपक्रमांचा घेतला आढावा

Posted On: 14 NOV 2022 6:11PM by PIB Mumbai

मुंबई, 14 नोव्‍हेंबर 2022

 

केंद्रीय माहिती आणि प्रसारण आणि युवा आणि क्रीडा व्यवहार मंत्री अनुराग सिंह ठाकूर यांनी आज मुंबईतील आकाशवाणी, दूरदर्शन, फिल्म्स डिव्हिजन आणि पत्र सूचना कार्यालयाच्या प्रादेशिक कार्यालयांना भेट देऊन तेथील कामकाजाचा आढावा घेतला. आपल्या दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यात ठाकूर यांनी  स्वच्छता 2.0 मोहिमेअंतर्गत माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या माध्यम कार्यालयांमध्ये सुरु असलेल्या उपक्रमांचा आढावा घेतला आणि  देशात सर्वत्र जलदगतीने सुरु असलेल्या स्वच्छता मोहिमेचा वेग कायम ठेवण्याचे आवाहन सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना केले.

केंद्रीय मंत्र्यांनी सर्वप्रथम चर्चगेट येथील आकाशवाणी प्रसारण भवनाला  भेट दिली, आणि विविध कार्यालयांमध्ये फिरून त्यांच्या कामांचा आढावा घेतला. केंद्रीय मंत्री ठाकूर यांनी वरळी येथील दूरदर्शन केंद्र आणि मरीन लाईन्स येथील पत्र सूचना कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसोबत आढावा बैठका घेतल्या. त्यांनी संपूर्ण परिसराचा  फेरफटका मारला आणि तेथील  स्वच्छता उपक्रमांबाबत माहिती घेतली. तसेच त्यांनी  डॉ. जी. देशमुख मार्गावरील फिल्म्स डिव्हिजनलाही भेट दिली. या सर्व कार्यालयांमध्ये उपलब्ध जागेचे प्रभावी व्यवस्थापन करावे, अशी सूचना त्यांनी केली. स्वच्छता कृती मोहिमेचा एक भाग म्हणून, ठाकूर यांनी सर्व संबंधितांना अनावश्यक कागदपत्रे, फाईल्स काढून टाकण्याचे आणि भंगार साहित्याचा लिलाव करण्याचे निर्देश दिले. सर्व अधिकाऱ्यांनी शक्य तितक्या उत्कृष्ट पद्धतीने नागरिकांशी संवाद साधावा असे आवाहन माहिती आणि प्रसारण मंत्र्यांनी केले. 

   

यावेळी माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या पश्चिम विभागाच्या महासंचालक मोनिदीपा मुखर्जी,  आकाशवाणी आणि दूरदर्शनचे पश्चिम विभागाचे अतिरिक्त महासंचालक  जुगल चंदिरा आणि माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे संबंधित सर्व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

आपल्या मुंबई दौऱ्यात केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर काल 'हिमाचल मित्र मंडळ' संस्थेच्या 71 व्या  स्थापना दिन सोहळ्यात सहभागी झाले. मुंबईत राहणाऱ्या हिमाचल प्रदेशच्या नागरिकांना त्यांनी शुभेच्छा दिल्या. 

कार्यक्रमादरम्यान त्यांनी संस्थेच्या  सन्माननीय सदस्यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान केले. हिमाचल मित्र मंडळ ही धर्मादाय संस्था 1952 मध्ये स्थापन झाली असून ही संस्था हिमाचल प्रदेशातील  संस्कृतीला प्रोत्साहन देणे, गरजूंना वैद्यकीय मदत, विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती आणि कर्करोग ग्रस्त आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना मोफत निवास व्यवस्था पुरवणे इत्यादी कार्य सातत्याने करत आहे.

* * *

PIB Mumbai | RT/S.Tupe/B.Sontakke/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1875877) Visitor Counter : 188


Read this release in: English , Urdu , Hindi