माहिती आणि प्रसारण मंत्रालय

इफ्फी - 53 महोत्सवात आबालवृद्ध ॲनिमेशन प्रेमींच्या मनोरंजनाची हमी

Posted On: 13 NOV 2022 11:30PM by PIB Mumbai

मुंबई, 13 नोव्‍हेंबर 2022

 

ॲनिमेशन म्हणजे आभासी चलतचित्रांच्या माध्यमातून मनोरंजनाद्वारे प्रेक्षकांना शिक्षित करणे आणि कार्यप्रवृत्त करणे होय! उठावदार रंगसंगती, पात्रांच्या सर्व कोनांमधून होणाऱ्या वैशिष्ट्यपूर्ण हालचाली, आणि हृदयाला भिडणाऱ्या साध्या संकल्पना किंवा संदेश, यामुळे ॲनिमेशन हा प्रकार लहान मुलांना खूप आवडतो. मात्र आतापर्यंतचे अनेक सर्वोत्कृष्ट ॲनिमेशनपट हे अधिक प्रगल्भ प्रौढ प्रेक्षकांसाठी तयार करण्यात आले आहेत. 53 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात - इफ्फीमध्ये, रसिकांना या चित्रपट - कलेच्या विविध शैलींचे अनोखे मिश्रण पहायला मिळेल. लहान मुले आणि प्रौढ अशा दोन्ही वयोगटांना आवडू शकणार्‍या कथा असलेले, जगभरातील विविध भागांतील पाच ॲनिमेशनपट, इफ्फी-53 मध्ये खास तयार केलेल्या ॲनिमेशनपट विभागात दाखवले जाणार आहेत.

1. "BLIND WILLOW SLEEPING WOMEN" (ब्लाईंड विलो, स्लीपींग वुमन)

2022 सालचा हा जपानी ॲनिमेशनपट, प्रसिद्ध जपानी लेखक हारुकी मुराकामी यांच्या लघुकथांवर बेतला आहे. हा चित्रपट केवळ मुराकामींच्या जगभरातील लाखो चाहत्यांनाच नाही, तर लेखकाचा परिचय नसलेल्या चित्रपट रसिकांनाही भावेल, अशा तऱ्हेने बनवण्यात आला आहे.  भूकंप आणि एक विशाल बेडूक, चित्रपटातील पात्रांना स्वतःपासून लपवत असलेली स्वतःबद्दलची सत्ये उघड करण्यात कशी मदत करतात, याची मांडणी हा ॲनिमेशन पट करतो. चित्रपटाचे कथानक आठवणी, स्वप्ने आणि कल्पनाविश्व यातून उलगडत जाते आणि त्यावर भूकंपामुळे निर्माण झालेल्या वैयक्तिक जाणिवांचा प्रभाव दिसत राहतो, कारण यातील मुख्य पात्रे, आपली स्वतःची खरी ओळख जाणून घेण्याचा प्रयत्न पुन्हा पुन्हा करत राहतात. 

जन्माने अमेरिकन असलेला या ॲनिमेशन पटाचा निर्माता पियर फोल्डस् - Pierre Földes, हा संगीतकार, वाद्यवृंद संयोजक, चित्रकार आणि चित्रपट निर्माता आहे.

 

2. MY LOVE AFFAIR WITH MARRIAGE (माय लव्ह अफेअर वीथ मॅरेज)

2022 सालच्या या ॲनिमेशनपटामध्ये संगीत आणि विज्ञानाच्या माध्यमातून स्त्री पुरुष भेदानुसार प्रेमात काय फरक असू शकतो या समीकरणाचे जीवशास्त्रीय दृष्टिकोनातून परीक्षण केले आहे तसेच एखाद्या व्यक्तीवर सामाजिक नीतीनियमांनुसार येणाऱ्या सामाजिक दबावाचे निरीक्षण केले आहे. स्त्रीच्या आंतरीक विद्रोहाची ही कथा आहे. झेल्मा ही एक तरुण उमदी स्त्री आहे. प्रेम मिळवण्यासाठी तिला पौराणिक शृंगारीक गाणी गावी लागतात. तिच्यासाठी हा एक प्रकारचा दबावच असतो आणि या दबावाशी जुळवून घेण्याचा दृढनिश्चयही ती करते, मात्र  ती जितके जुळवून घेण्याचा प्रयत्न करते तितकेच तिचे शरीर बंड करून उठते.

या चित्रपटाने जगभरातील चित्रपट महोत्सवांमध्ये आतापर्यंत दोन पुरस्कार आणि सहा नामांकने मिळवली आहेत.

निर्मात्या सिग्ने बाउमाने या लॅटव्हियन ॲनिमेटर, कलाकार, चित्रकार आणि लेखक आहेत. त्या सध्या अमेरिकेत न्यूयॉर्क शहरात राहतात आणि काम करतात.  त्यांनी 16 ॲनिमेटेड लघु ॲनिमेशन पट आणि दोन ॲनिमेशन पट लिहिले आणि दिग्दर्शित केले असून, त्यांच्या संकल्पचित्रांची रचना (डिझाईन) आणि ॲनिमेशनही केले आहे. 

 

3. THE ISLAND (द आयलंड)

2021 सालचा हा चित्रपट, एक सांगितिक ॲनिमेशनपट आहे. रॉबिन्सन क्रूसो मिथक: छोटा राजकुमार मॉन्टी अजगराला भेटतो, या संकल्पनेवर तो बेतलेला आहे. रॉबिन्सन एक डॉक्टर आहे. स्थलांतरित, बिगर सरकारी संस्था, तसेच रक्षकांच्या कचाट्यात सापडलेल्या बेटावर, एकट्याने राहायचा निर्णय त्याने स्वेच्छेने घेतला आहे. फुटलेल्या बेकायदेशीर निर्वासित गलबतातून बचावलेल्या फ्रायडे नावाच्या एकमेव नाविकाला तो वाचवतो. बेटावरील वास्तव्यादरम्यान, रॉबिन्सनला विलक्षण प्राण्यांचा आणि घटनांचा सामना करावा लागतो. प्रत्येकजण स्वतःचे सुख शोधत असलेल्या जगात, काव्यात्मक आणि प्रतीकात्मकतेच्या माध्यमातून तो चालू घडामोडींचा सामना करत राहतो.

रुमानियामध्ये जन्मलेल्या निर्मात्या अँका डॅमियन यांनी कला संबंधित विषयांवर बेतलेल्या अनेक माहितीपटांसाठी दिग्दर्शक, पटकथा लेखक आणि निर्माता म्हणून काम केले आहे. द आयलंड हा त्यांचा सातवा ॲनिमेशनपट आहे.

चित्रपटकर्ता आणि ख्यातनाम संगीतकार अलेक्झांडर बालानेस्कू हा रुमानियामध्ये जन्मलेला बहु आयामी संगीतकार आहे आणि तो आजच्या काळातील सर्वात द्रष्ट्या आणि प्रभावशाली व्हायोलिन वादकांपैकी एक मानला जातो.

 

4. DOZENS OF NORTHS (डझन्स ऑफ नॉर्थ)

2021 सालचा हा जपानी ॲनिमे शैलीतला ॲनिमेशनपट, 2011 साली जपानच्या पूर्व भागात झालेल्या भूकंपामुळे घडलेल्या दुष्परिणामांचे वर्णन करतो.  भूकंपामुळे ओसाड आणि स्मशानवत झालेल्या भूप्रदेशाचे चित्रण करणाऱ्या संवाद रहीत जबरदस्त व्यक्तीचित्रांची रचना या चित्रपटात करण्यात आली आहे. भूकंपामुळे उद्भवलेली परिस्थिती आणि आधुनिक काळातील परिस्थितीची सांगड घालत हा चित्रपट, मानवी अस्तित्वाची निरर्थकता आणि शोकांतिका सांगतो आणि त्याचबरोबर आशेचा किरणही दाखवत राहतो. पूर्णपणे अंधारलेल्या चित्रपटगृहातही पडदा ज्याप्रमाणे उजळलेला दिसत राहतो त्याचप्रमाणे हा चित्रपट नकारात्मक अंधारलेल्या परिस्थितीतला सकारात्मक प्रकाश दाखवत राहतो. 

नावाजलेले चित्रपट निर्माता कोजी यामामुरा, यांनी हा ॲनिमेशनपट बनवला आहे. लघुपट बनवण्यात याची ख्याती असून 2002  सालच्या “Mt. Head" या त्यांच्या लघुपटाला ऑस्कर नामांकन सुद्धा मिळाले होते.

 

5. PINOCCHIO (पनोकिओ)

2022 सालचा हा चित्रपट, गेपेटो नावाच्या शोकाकूल काष्ठशिल्पकाराचे मानसिकदृष्ट्या भंगलेले हृदय पूर्ववत करण्यासाठी जादुने जिवंत केलेल्या लाकडी बाहुलीची अभिजात कथा नव्याने मांडतो. 

अकादमी पुरस्कार विजेते गिलेर्मो डेल टोरो आणि मार्क गुस्ताफसन यांनी दिग्दर्शित केलेला हा मजेशीर, स्टॉप-मोशन तंत्राचा वापर केलेला ॲनिमेशनपट, जगात नाव कमावण्याच्या प्रयत्नात असलेल्या पनोकिओच्या व्रात्य आणि आज्ञा न जुमानता केलेल्या साहसांचे चित्रण करतो.

 

* * *

PIB Mumbai | M.Pange/A.Save/D.Rane

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1875764) Visitor Counter : 179


Read this release in: English , Urdu , Hindi , Kannada