विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

केंद्रीय मंत्री डॉ.जितेंद्र सिंह यांच्या हस्ते हरियाणामधील फरीदाबाद येथे ‘भारतीय जैविक माहिती केंद्र’ (आयबीडीसी) या भारतातील पहिल्यावहिल्या राष्ट्रीय जैवविज्ञान माहिती भांडाराचे उद्घाटन

Posted On: 10 NOV 2022 7:54PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 10 नोव्‍हेंबर 2022

 

  • आयबीडीसीने भारतभरातील 50 हून अधिक संशोधन प्रयोगशाळांनी सादर केलेल्या 2,08,055 प्रस्तुतींच्या मदतीने 200 अब्जाहून अधिक प्रकारच्या जिवांची माहिती साठविली आहे.
  • आयबीडीसीच्या डॅशबोर्डच्या माध्यमातून भारतभरातील जैवविज्ञानविषयक माहितीचे सुविहित सादरीकरण, माहिती मिळविण्याची सोय,माहितीच्या विश्लेषणाची सेवा आणि सार्स-को-व्ही-2 च्या विविध प्रकारांची वास्तव माहिती मिळण्याची सोय आहे.
  • भारतात सार्वजनिक निधीतून करण्यात आलेल्या संशोधनाद्वारे मिळविलेल्या जैवविज्ञानविषयक सर्व माहितीचा साठा करून ठेवणे आयबीडीसीला अनिवार्य असणार आहे.
  • वापरकर्त्यांना त्यांची विनंती support@ibdc.rcb.res.in येथे सादर करून या माहितीकेंद्राशी संपर्क साधता येणार आहे.

केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार),डॉ.जितेंद्र सिंह  यांनी आज हरियाणामधील फरीदाबाद येथे  ‘भारतीय जैविक माहिती केंद्र’ (आयबीडीसी) या भारतातील पहिल्यावहिल्या राष्ट्रीय जैवविज्ञान माहिती भांडाराचे उद्घाटन केले.

भारत सरकारच्या बायोटेक-प्राईड मार्गदर्शक तत्वांना अनुसरून, भारतात सार्वजनिक निधीतून करण्यात आलेल्या संशोधनाद्वारे मिळविलेल्या जैवविज्ञानविषयक सर्व माहितीचा साठा करून ठेवणे आयबीडीसीला अनिवार्य असणार आहे, असे सिंह यांनी यावेळी सांगितले. 

जैवतंत्रज्ञान विभागाच्या पाठबळावर फरीदाबाद येथील प्रादेशिक जैवतंत्रज्ञान केंद्रात स्थापन करण्यात आलेल्या या केंद्राला भुवनेश्वर येथील राष्ट्रीय माहिती केंद्राकडून माहितीच्या ‘आपत्कालीन पुनर्प्राप्ती’साठीची यंत्रणा मदत करणार आहे.  

आयबीडीसीच्या प्रणालीमध्ये सुमारे 4 पेटाबाईट्सइतकी माहिती साठविण्याची क्षमता आहे आणि या केंद्रात ‘ब्रह्म’ ही उच्च गणक क्षमता असलेली सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. सखोल संगणकीय विश्लेषण करण्यात रुची असणाऱ्या संशोधकांना आयबीडीसी येथे संगणकीय पायाभूत सुविधा देखील उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. वापरकर्त्यांना त्यांची विनंती support@ibdc.rcb.res.in येथे सादर करून या माहितीकेंद्राशी संपर्क साधता येणार आहे.

आयबीडीसीने ‘इंडियन न्यूक्लिओटाईड डाटा अर्काइव्ह (आयएनडीए)’ आणि ‘इंडियन न्यूक्लिओटाईड डाटा अर्काइव्ह – कंट्रोल्ड अॅक्सेस (आयएनडीए - सीए)’ या दोन माहिती पोर्टल्सच्या माध्यमातून न्यूक्लिओटाईड स्वरुपाची माहिती देखील साठवून ठेवण्याची सेवा देखील सुरु केली असल्याचे सिंह यांनी सांगितले.  या सेवेद्वारे आयबीडीसीने आतापर्यंत भारतभरातील 50 हून अधिक संशोधन प्रयोगशाळांनी सादर केलेल्या 2,08,055 प्रस्तुतींच्या मदतीने 200 अब्जाहून अधिक प्रकारच्या जिवांची माहिती साठविली आहे.

या केंद्रात आयएनएसएसीओजी (Indian SARS-CoV-2 Genomics Consortium) प्रयोगशाळांकडून (https://inda.rcb.ac.in/insacog/statisticsinsacog) मिळालेल्या जीनोमिक सर्व्हिलन्स डाटासाठी ऑनलाईन डॅशबोर्डची व्यवस्था करण्यात आली आहे. आयबीडीसीच्या डॅशबोर्डच्या माध्यमातून भारतभरातील जैवविज्ञानविषयक माहितीचे सुविहित सादरीकरण, माहिती मिळविण्याची सोय,माहितीच्या विश्लेषणाची सेवा आणि सार्स-को-व्ही-2 च्या विविध प्रकारांची वास्तव माहिती मिळण्याची सोय आहे. इतर प्रकारच्या माहितीची साठवण आणि वापरविषयक पोर्टल्सच्या विकसनाचे काम सुरु असून लवकरच त्या सेवा सुरु करण्यात येतील.

मुलभूतरित्या, आयबीडीसी एफएआयआर अर्थात शोधता येणाऱ्या, सहजपणे पोहोचू शकणाऱ्या, परस्परांकडून वापरता येणाऱ्या आणि पुनर्वापर करता येण्याजोग्या माहिती आदानप्रदानाच्या तत्वांशी कटिबद्ध आहे. या केंद्राचा विकास विशिष्ट प्रकारची जैवविज्ञानविषयक माहिती मिळविण्यासाठी वेगवेगळे विभाग अशा पद्धतीने करण्यात आला आहे.

 

* * *

S.Kakade/S.Chitnis/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1875023) Visitor Counter : 279