संरक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

अंतर्गत आणि बाह्य सुरक्षेतील फरक आता कमी होत असताना, सायबर हल्ले आणि माहितीविषयक युद्धासारख्या नव्याने उदयाला येत असलेल्या धोक्यांचा सामना करण्यासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवर एकत्रित प्रयत्न गरजेचे : नवी दिल्ली येथील राष्ट्रीय संरक्षण महाविद्यालयाच्या 60 व्या तुकडीतील पदवीधारक अधिकाऱ्यांसमोर संरक्षण मंत्र्यांचे प्रतिपादन


सर्वांसाठी उपयुक्त अशी जागतिक व्यवस्था निर्माण करण्यासाठी राष्ट्रीय सुरक्षा असा विचार करण्याऐवजी राष्ट्रीय सुरक्षेकडे खऱ्या अर्थाने सामूहिक दायित्व म्हणून पाहण्याची केली गरज व्यक्त

Posted On: 10 NOV 2022 3:10PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 10 नोव्‍हेंबर 2022

 

सायबर हल्ले आणि माहितीविषयक युद्धासारख्या नव्याने उदयाला येत असलेल्या गंभीर धोक्यांचा सामना करण्यासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवर एकत्रित प्रयत्न करण्याचे आवाहन संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी केले आहे. नवी दिल्ली येथे आज, 10 नोव्हेंबर 2022 रोजी आयोजित करण्यात आलेल्या एनडीसी अर्थात राष्ट्रीय संरक्षण महाविद्यालयाच्या 60 व्या तुकडीच्या दीक्षांत समारंभात भारतीय सशस्त्र दले, नागरी सेवा तसेच परदेशी मित्रराष्ट्रांतील अधिकाऱ्यांना संबोधित करताना ते बोलत होते. जेव्हा देशहित सुरक्षित होईल तेव्हाच देशाच्या पूर्ण क्षमतेचा वापर करता येईल यावर भर देत ते म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील सरकारने प्रामुख्याने राष्ट्रीय सुरक्षा या विषयावर लक्ष केंद्रित केले आहे. देशात नागरी संस्कृतीची भरभराट आणि वाढ होण्यासाठी देशाची सुरक्षितता अत्यावश्यक आहे असे ते म्हणाले.

देशातील महत्त्वाच्या पायाभूत सुविधा सायबर हल्ल्यांपासून सुरक्षित नसणे हे अत्यंत चिंताजनक आहे असे सांगून संरक्षणमंत्री म्हणाले की, उर्जा, वाहतूक, सरकारी सेवा, दूरसंचार, महत्त्वाचे निर्मिती उद्योग आणि एकमेकांशी जोडलेल्या आर्थिक यंत्रणा यांसारखी क्षेत्रे अशा धोक्यांचे लक्ष्य ठरू शकतात . माहितीचे युध्द देशातील राजकीय स्थैर्यासमोर गंभीर आव्हान निर्माण करू शकते असे मत त्यांनी मांडले. समाज माध्यमे तसेच इतर ऑनलाईन साहित्य निर्मिती मंचांचा सुसंघटीत वापर जनसामान्यांची मते आणि दृष्टीकोन तयार करण्याला कारणीभूत ठरतात याकडे त्यांनी निर्देश केला.

सर्वांसाठी उपयुक्त अशी जागतिक व्यवस्था निर्माण करण्यासाठी राष्ट्रीय सुरक्षा असा विचार करण्याऐवजी राष्ट्रीय सुरक्षेकडे खऱ्या अर्थाने सामूहिक दायित्व म्हणून पाहण्याची गरज आहे, यावर केंद्रीय मंत्री राजनाथ सिंग यांनी भर दिला. “शून्य गोळाबेरजेचा खेळ म्हणून  राष्ट्रीय सुरक्षिततेचा विचार करता येणार नाही. सर्वांसाठी विजयी परिस्थिती निर्माण करण्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत. आपण संकुचित स्वार्थाच्या मार्गाने जाता कामा नये कारण ते दीर्घकाळासाठी फारसे लाभदायक ठरत नाही. शाश्वत तसेच धक्क्यांप्रती लवचिक अशा प्रबुद्ध स्वहिताच्या मार्गदर्शनाखाली वाटचाल करायला हवी,” ते म्हणाले.

एनडीसीचा अभ्यासक्रम यशस्वीपणे पूर्ण करणाऱ्या परदेशी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून केंद्रीय मंत्री राजनाथ सिंग म्हणाले की हे अधिकारी म्हणजे भारत आणि उर्वरित जग यांना जोडणारा पूल आहे.

या दीक्षांत समारंभात एनडीसीच्या 60 व्या तुकडीतील (वर्ष 2020 ची तुकडी) 80 विद्यार्थ्यांना मद्रास विद्यापीठातर्फे प्रतिष्ठित एम.फिल. पदवी देऊन गौरविण्यात आले. ‘राष्ट्रीय सुरक्षा आणि नीती’ हा एनडीसीचा 47 आठवडे कालावधीचा अत्यंत महत्त्वाचा अभ्यासक्रम असून त्यात सर्वसमावेशक शैक्षणिक अभ्यासक्रम पद्धतींचा वापर करण्यात आला आहे.

उपस्थितांना संबोधित करताना, एनडीसीचे कमांडंट, लेफ्टनंट जनरल एम.के.मागो म्हणाले की, एनडीसीच्या 60 व्या तुकडीतील अधिकारी धोरण आखणी तसेच त्याची अंमलबजावणी अशा दोन्हीमध्ये, धोरणात्मक पातळीवरील राष्ट्रीय समस्या सोडविताना अनुशासनात्मक आणि चौकटीबाहेरील दृष्टीकोन स्वीकारू शकतील.

केंद्रीय संरक्षण सचिव गिरीधर आरमाने, मद्रास विद्यापीठाचे उपकुलगुरू प्राध्यापक (डॉ.) एस गौरी तसेच इतर अनेक मान्यवर अतिथी या प्रसंगी उपस्थित होते. वर्ष 1960 मध्ये स्थापन झालेली एनडीसी ही संस्था केंद्रीय संरक्षण मंत्रालयाच्या अखत्यारीतील प्रमुख आंतर-सेवा विषयक शैक्षणिक संस्था असून धोरणात्मक शिक्षणासाठीची देशातील सर्वात मोठी संस्था म्हणून तिचा नावलौकिक आहे.

 

* * *

Jaydevi PS/S.Chitnis/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1874947) Visitor Counter : 236


Read this release in: English , Urdu , Hindi , Tamil , Telugu