नौवहन मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

वाराणसी इथे होणाऱ्या दोन दिवसीय गतिशक्ती बहुपर्यायी जलमार्ग शिखर परिषदेचे केंद्रीय मंत्री सर्बानंद सोनोवाल यांच्या हस्ते उद्‌घाटन

Posted On: 09 NOV 2022 5:23PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 9 नोव्हेंबर 2022

केंद्रीय बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्रालयाच्या अधीन असलेले भारतीय जलमार्ग प्राधिकरण येत्या 11 आणि 12 नोव्हेंबर 2022 पासून वाराणसी इथे ‘पीएम गतिशक्ती बहुपर्यायी जलमार्ग शिखर परिषद’ आयोजित करणार आहे. वाराणसीच्या दीनदयाळ हस्तकला संकुलात ( व्यापारी केंद्र आणि संग्रहालय) ही शिखर परिषद होणार असून, या परिषदेच्या माध्यमातून पीएम गतिशक्ती राष्ट्रीय बृहद आराखड्याविषयी जनजागृती केली जाणार आहे. त्यातही, जलमार्ग क्षेत्रातल्या पायाभूत विकास सुविधांवर अधिक भर दिला जाणार आहे. 

केंद्रीय बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल यांच्या हस्ते या परिषदेचे उद्घाटन होईल. या परिषदेच्या आधी, ते वाराणसी इथल्या गंगेच्या रविदास घाटावर सात सामुदायिक जेट्टींचे उद्घाटन करतील आणि आठ सामुदायिक जेट्टीच्या बांधकामाची पायाभरणी करतील.

पीएम गतिशक्ती राष्ट्रीय बृहद आरखड्याविषयी माहिती देतांना, सोनोवाल यांनी सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली, सरकार ‘सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास आणि सबका प्रयास’ साठी कटिबद्ध आहे. पीएम गतिशक्ती राष्ट्रीय बृहद आरखडा, देशातील, लॉजिस्टिक कार्यक्षमता सुधारणे आणि लॉजिस्टिक खर्च कमी करण्यासाठीचा एक परिवर्तनशील दृष्टिकोन मांडणारी योजना आहे. ज्याआधारे, प्रवासी आणि मालवाहतूक दळणवळण व्यवस्था शेवटच्या कानाकोपऱ्यांपर्यंत अधिक सुविहितपणे पोहचू शकेल. एमओपीएसडब्लू ने पीएम गतिशक्ती राष्ट्रीय बृहद आरखड्याअंतर्गत, सुमारे 62,627 कोटी रुपये खर्चाच्या 101 प्रकल्पांची निवड केली असून, हे प्रकल्प 2024 पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे.  तर देशाच्या पायाभूत सुविधांवर मोठा परिणाम करु शकणाऱ्या, 1,913 कोटी रुपयांच्या नऊ प्रकल्पांचे काम या आर्थिक वर्षांत पूर्ण केले जाणार आहे. 

आयडब्लूएआय चे अध्यक्ष संजय बंदोपाध्याय, म्हणाले, या शिखर परिषदेमुळे, केंद्र सरकार आणि राज्य सरकारांमधील महत्वाच्या हितसंबंधी घटकांना, तसेच उद्योगक्षेत्र आणि अभ्यासकांना एकमेकांशी संपर्क करण्यासाठीचे एक सामाईक व्यासपीठ उपलब्ध होईल.यावर ते, राष्ट्रीय बृहद आराखडयाविषयी परस्परांशी चर्चा करु शकतील. संबंधित मंत्रालये आणि विभाग, बंदर प्राधिकरण, विविध विभागांचे तज्ञ आणि खाजगी क्षेत्रातील भागधारक, असे सर्व लोक या परिषदेत उपस्थित राहणार आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी  पीएम गतिशक्ती राष्ट्रीय बृहद आरखड्याचे उद्घाटन केले होते. देशातील विविध विशेष आर्थिक क्षेत्र पट्ट्यात, बहुपर्यायी दळणवळण संपर्कयंत्रणा पुरवठ्याकरता आणि लॉजिस्टिक कमांसाठी त्याचप्रमाणे प्रवासी आणि मालवाहतुकीच्या साधनांसाठी, जलद आणि कार्यक्षम व्यवस्था उभारण्यासाठी एक सुविहीत आणि कार्यक्षम अशी लॉजिस्टिक व्यवस्था आहे. अशा व्यवस्था, ‘आत्मनिर्भर भारताचे उद्दिष्ट साध्य करण्यात महत्वाची भूमिका बजावतील.

 

 S.Patil/R.Aghor/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai(Release ID: 1874754) Visitor Counter : 79