वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
जगभरात दाटलेल्या निराशेच्या मळभात भारत एक उज्ज्वल आशेचा किरण - वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल
अहिंसा विश्व भारतीची राष्ट्रीय परिषद मुंबईत सुरु
Posted On:
06 NOV 2022 3:57PM by PIB Mumbai
अहिंसा विश्व भारती राष्ट्रीय परिषदेत प्रमुख पाहुणे म्हणून केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल उपस्थित होते. ही परिषद आज, 6 नोव्हेंबर 2022 रोजी मुंबईत आयोजित करण्यात आली आहे. या कार्यक्रमात गोयल यांनी भारताच्या विश्वगुरू बनण्याचे ध्येय अधोरेखित केले. महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, आचार्य डॉ. लोकेश मुनी आणि अहिंसा विश्व भारतीचे इतर मान्यवर कार्यक्रमाला उपस्थित होते.
संत आणि ऋषी अशी ठिणगी पेटवतात जी एखाद्याचे कार्य प्रज्वलित करते असे पियुष गोयल यावेळी म्हणाले. आपल्याला कधीकधी आपल्या कर्तव्याची आठवण करून देण्याची गरज असते आणि संत तेच करतात. कर्मकांडात अडकून न पडता धर्माला दैनंदिन जीवनाशी जोडणे आवश्यक आहे आणि डॉ. लोकेश यांच्यासारखे आचार्य आदर्श उदाहरण आहेत असे गोयल म्हणाले.
देशाच्या विश्वगुरु होण्याच्या ध्येयाबाबत बोलताना केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी हर घर तिरंगा सारख्या कार्यक्रमाच्या अभूतपूर्व यशाचा उल्लेख केला. राष्ट्रध्वज फडकला नसेल असे एकही घर सापडणे जवळपास अशक्य होते. निराशेच्या मळभातील भारत आशेचा उज्ज्वल किरण असून प्रत्येक भारतीय देशाच्या प्रगतीचा साक्षीदार आहे असे त्यांनी सांगितले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या पंचप्रणामध्ये देशाला वसाहतवादी मानसिकता पुसून टाकत आपली कौटुंबिक मूल्ये, वारसा आणि नैतिकता या आपल्या मुळांकडे परतण्याचे आवाहन केले आहे. आपल्या दैनंदिन जीवनातही पंतप्रधानांचे पंचप्रण आपल्याला मार्गदर्शन करत राहतील, असे ते म्हणाले.
स्वतः ची काळजी घेतो तशी समाजाची काळजी घेण्याची जैन धर्माची शिकवण देशाच्या प्रगतीसाठी आवश्यक असल्याचे निरीक्षण मंत्र्यांनी नोंदवले. भारताला विश्वगुरू व्हायचे आहे असे भारताचे नागरिक ठरवतात तेव्हा जगातील कोणतीही शक्ती त्याला रोखू शकत नाही, अशा शब्दात त्यांनी समारोप केला.
महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यावेळी म्हणाले की, आपला देश ऋषीमुनींसाठी ओळखला जातो. देशाच्या उभारणीत ऋषीमुनींनी मूलभूत भूमिका बजावली आहे. राजांचे योगदान विसरण्याकडे आपला कल असला तरी राष्ट्र उभारणीतील ऋषीमुनींचे योगदान कधीही विसरता कामा नये, असे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी सांगितले.
ऋषीमुनींच्या शिकवणुकीमुळे देशाने अनेक परकीय आक्रमणे यशस्वीपणे उधळून लावलाचे त्यांनी नमूद केले. स्वामी विवेकानंद यांच्या व्यक्तिमत्त्वाने मंत्रमुग्ध झालेल्या अमेरिकी माध्यमांनी त्यांना जिवंत ख्रिस्त म्हटल्याचे स्मरण राज्यपालांनी केले. जोपर्यंत देश संतांच्या परंपरेचे स्मरण ठेवेल तोपर्यंत भारत प्रगती करत राहील, असा विश्वास राज्यपालांनी व्यक्त केला.
राकेशजी, जैन इंटरनॅशनल ट्रेड ऑर्गनायझेशन आणि संजय घोडावत फाउंडेशन यांना यावेळी अहिंसा आंतरराष्ट्रीय पुरस्कार 2022 ने सन्मानित करण्यात आले.
***
S.Kane/V.Ghode/P.Kor
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1874112)
Visitor Counter : 215