उपराष्ट्रपती कार्यालय
नैसर्गिक साधन-संपत्तीचा सर्वांनी कार्यक्षम आणि विवेकपूर्ण वापर करण्याचे उपराष्ट्रपतींचे आवाहन
प्रविष्टि तिथि:
05 NOV 2022 8:32PM by PIB Mumbai
उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी आज आपल्या नैसर्गिक साधन-संपत्तीचा सर्वांनी कार्यक्षम आणि विवेकपूर्ण वापर करण्याच्या गरजेवर भर दिला. भारतीय राज्यघटना नैसर्गिक साधनसंपत्तीच्या न्याय्य वाटपाची गरज सूचित करत असल्याचे अधोरेखित करून, मानवाकडून बेपर्वाईने होत असलेल्या निसर्गाच्या शोषणाबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली. ते असेही म्हणाले की एखाद्या व्यक्तीच्या आर्थिक क्षमतेचा संबंध त्याच्या अथवा तिच्या पाणी, वीज, पेट्रोल किंवा गॅससारख्या साधन संपत्तीच्या वापराशी जोडला जाऊ नये. “आपल्याला परवडतात म्हणून आपण या साधन संपत्तीचा गैरवापर करू शकत नाही,” ते म्हणाले.
ग्रेटर नोएडा येथे आज 7व्या भारत जल सप्ताहाच्या समारोप समारंभाला संबोधित करताना उपराष्ट्रपतींनी भारतीय संस्कृती आणि ग्रामीण परीसंस्थेमधील तलाव आणि जलाशयांचे महत्व अधोरेखित केले आणि “या जल-स्त्रोतांची पुनर्निर्मिती करण्यासाठी सर्वकाही करण्याची गरज आहे”, यावर भर दिला.
या कार्यक्रमात धनखड यांनी आंतर-राज्य पाणी-वाटप विवाद, संघराज्यवादाच्या खऱ्या भावनेने सोडवण्यासाठी सक्रीय पुढाकार घ्यायला हवा, असे आवाहन केले.
जलशक्ती मंत्रालय आणि संबंधित संस्थेने 7 वा भारत जल सप्ताह यशस्वीपणे आयोजित केल्याबद्दल उपराष्ट्रपतींनी प्रशंसा केली, आणि ते म्हणाले की, असे उपक्रम केवळ विविध समकालीन प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी योग्य व्यासपीठ उपलब्ध करत नाहीत, तर सामान्य लोकांना नैसर्गिक साधन-संपत्ती आणि त्याच्या संवर्धनाबद्दल जागरूक राहायला प्रेरित देखील करतात.
***
S.Tupe/R.Agashe/P.Kor
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1874034)
आगंतुक पटल : 244