राष्ट्रपती कार्यालय
राष्ट्रपती सिक्कीम दौऱ्यावर ; सिक्कीम सरकारने आयोजित केलेल्या नागरी सत्कार समारंभाला उपस्थित ; राष्ट्रपतींच्या हस्ते शिक्षण, आरोग्य, रस्ते पायाभूत सुविधा आणि पर्यटनाशी संबंधित विविध प्रकल्पांचे लोकार्पण / पायाभरणी
Posted On:
04 NOV 2022 10:15PM by PIB Mumbai
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज सिक्कीम सरकारने त्यांच्या सन्मानार्थ आयोजित केलेल्या नागरी सत्कार समारंभाला उपस्थित राहिल्या . त्यांनी आज ( 4 नोव्हेंबर 2022) गंगटोक येथे शिक्षण, आरोग्य, रस्ते पायाभूत सुविधा आणि पर्यटनाशी संबंधित विविध प्रकल्पांचे आभासी पद्धतीने लोकार्पण /पायाभरणी केली.
साक्षरतेचे 80 टक्क्यांहून अधिक प्रमाण असलेले सिक्कीम हे शिक्षणाच्या बाबतीत आघाडीवर असलेल्या राज्यांपैकी एक आहे असे सांगत राष्ट्रपतींनी आनंद व्यक्त केला. उच्च शिक्षणासाठी विद्यार्थ्यांची नोंदणी होणाऱ्या राज्यांमध्ये सिक्कीम हे राज्य देशात प्रथम क्रमांकावर आहे. सिक्कीममध्ये मुलांपेक्षा मुलींची शिक्षणासाठी नोंदणी अधिक आहे हे पाहूनही त्यांनी आनंद व्यक्त केला.
देशातील सर्व राज्यांमध्ये सिक्कीममध्ये सर्वात कमी प्लास्टिक कचरा निर्माण होतो, यातून सिक्कीमच्या लोकांची स्वच्छता आणि शाश्वत विकासाबाबतची बांधिलकी दिसून येते, हे राष्ट्रपतींनी नमूद केले.
सेंद्रिय शेतीचे मॉडेल बनून सिक्कीमने इतर राज्यांसमोर आदर्श निर्माण केला आहे, असे राष्ट्रपतींनी सांगितले. सिक्कीम हे अतिरिक्त वीज उत्पादन असलेले राज्य आहे आणि अक्षय्य स्त्रोतांपासून वीज निर्मितीच्या क्षेत्रात देशात दुसऱ्या क्रमांकावर आहे याबद्दलही त्यांनी आनंद व्यक्त केला.
आज झालेल्या शिक्षण, आरोग्य, पर्यटन आणि रस्त्यांशी संबंधित प्रकल्पांचे लोकार्पण / पायाभरणी केल्याने सिक्कीमच्या विकासाला नवी चालना मिळेल आणि राज्याच्या अर्थव्यवस्थेला बळ मिळेल, असा विश्वास राष्ट्रपतींनी व्यक्त केला.
***
S.Kane/S.Chavan/P.Kor
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1873840)
Visitor Counter : 153