विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय
केंद्रीय मंत्री डॉ जितेंद्र सिंह यांनी पुण्यातील सिम्बायोसिस विद्यापीठ रुग्णालय आणि संशोधन केंद्र येथे मेटाबॉलिक अँड एंडोक्राइन डिसऑर्डर सेंटरचे उद्घाटन केले
प्रख्यात मधुमेहतज्ज्ञ डॉ जितेंद्र सिंह म्हणाले, टाइप 1 मधुमेहाच्या व्यवस्थापनात जीवनशैली व्यवस्थापन महत्त्वाची भूमिका बजावते.
Posted On:
04 NOV 2022 5:58PM by PIB Mumbai
केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री डॉ जितेंद्र सिंह यांच्या हस्ते आज पुण्यातील सिम्बायोसिस रुग्णालय आणि संशोधन केंद्रात मेटाबॉलिक अँड एंडोक्राइन डिसऑर्डर्स सेंटरचे उद्घाटन झाले.
डॉ जितेंद्र सिंह जे प्रख्यात डायबेटोलॉजिस्ट देखील आहेत आणि प्रतिष्ठित RSSDI (रिसर्च सोसायटी फॉर स्टडी ऑफ डायबिटीज इन इंडिया) चे लाइफ पॅट्रन आहेत, त्यांनी जीवनशैलीतील आजार आणि चयापचय विकारांच्या वाढत्या घटना लक्षात घेता हे नवीन केंद्र प्रासंगिक असल्याचे सांगितले . हे केंद्र सर्व सामान्य रोग - मधुमेहाच्या प्रतिबंधात्मक तपासणीवर लक्ष केंद्रित करेल.

संपूर्ण सिम्बायोसिस आरोग्य धाम पुणे येथील लव्हाळे गावातील सिम्बायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठाच्या निसर्गरम्य संकुलात आहे. वैद्यकीय महाविद्यालय आणि त्याच्याशी संलग्न सिम्बायोसिस विद्यापीठ आणि संशोधन केंद्रात अत्याधुनिक पायाभूत सुविधा आणि इतर सुविधा आहेत.
डॉ जितेंद्र सिंह म्हणाले, गेल्या दोन दशकांमध्ये, भारतात टाइप 2 मधुमेहाच्या आजारात वाढ झाली आहे, ज्याने आता संपूर्ण भारत व्यापला आहे. ते म्हणाले की, टाईप 2 मधुमेह जो दोन दशकांपूर्वी दक्षिण भारतात प्रचलित होता, तो आज उत्तर भारतात तितकाच पसरला आहे आणि त्याच वेळी तो महानगरे, शहरे आणि शहरी भागातून ग्रामीण भागातही पसरला आहे.
इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने नुकत्याच जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचा हवाला देत डॉ जितेंद्र सिंग म्हणाले, गेल्या तीन दशकांमध्ये देशात मधुमेह असलेल्या लोकांच्या संख्येत 150 टक्क्यांनी वाढ झाली आहे. टाईप 2 मधुमेहाचे निदान होत असलेले वय कमी असून शहरी आणि ग्रामीण भागात 25-34 वर्षे वयोगटात या आजाराचे वाढते प्रमाण या चिंतेच्या मुख्य बाबी आहेत असे ते म्हणाले.

डॉ जितेंद्र सिंग म्हणाले की, टाइप 1 मधुमेहाच्या व्यवस्थापनात जीवनशैली व्यवस्थापन महत्त्वाची भूमिका बजावते आणि रोगाच्या योग्य व्यवस्थापनासाठी आहार आणि शारीरिक हालचालींचा ग्लायसेमियावरील प्रभाव समजून घेणे आवश्यक आहे. त्यांनी निदर्शनास आणून दिले की, कोविडपूर्व काळातही असंसर्गजन्य रोगांवर उपचार करताना, उदाहरणार्थ, मधुमेह :निसर्गोपचारात उपलब्ध काही योग आसने आणि जीवनशैलीतील बदलांच्या सहाय्यक सरावाने इन्सुलिन किंवा तोंडावाटे दिल्या जाणाऱ्या मधुमेहविरोधी औषधांची मात्रा कमी करता येते हे पुराव्यानिशी सिद्ध झाले आहे.
केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या राष्ट्रीय आरोग्य अभियानच्या मोफत औषध सेवा उपक्रमांतर्गत, छोट्या मुलांसह गरीब आणि गरजू लोकांना इन्सुलिनसह इतर आवश्यक औषधे मोफत पुरवण्यासाठी राज्ये /केंद्रशासित प्रदेशांना आर्थिक सहाय्य प्रदान केले जात असल्याचे डॉ जितेंद्र सिंह यांनी सांगितले. याशिवाय, राज्य सरकारांच्या सहकार्याने ‘जन औषधी योजने’ अंतर्गत इन्सुलिनसह दर्जेदार जेनेरिक औषधे सर्वांना परवडणाऱ्या किमतीत उपलब्ध करून दिली जात असल्याचेही त्यांनी सांगितले.
शिवाय सरकारी रुग्णालये मोफत उपचार देतात. सामाजिक आर्थिक जात जनगणना (SECC) डेटाबेस 2011 नुसार AB-PMJAY अंतर्गत पात्र 10.74 कोटी कुटुंबांसाठी आयुष्मान भारत - प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेच्या (PMJAY) अंतर्गत रुग्णालयात दाखल रूग्णांसाठी उपचार देखील उपलब्ध आहेत.

15 ऑगस्ट 2020 रोजी लाल किल्ल्यावरून पंतप्रधानांच्या "राष्ट्रीय डिजिटल हेल्थ मिशन" च्या क्रांतिकारी घोषणेचा संदर्भ देत डॉ जितेंद्र सिंह म्हणाले, उपचारातील आव्हाने कमी करण्यासाठी तंत्रज्ञानाचा विवेकपूर्ण वापर केला जाईल. त्यांनी मोदींना उद्धृत केले की, “प्रत्येक भारतीयाला आरोग्य ओळखपत्र देण्यात येईल. हे आरोग्य ओळखपत्र प्रत्येक भारतीयाच्या आरोग्य खात्याप्रमाणे काम करेल. या खात्यामध्ये तुमची प्रत्येक चाचणी, प्रत्येक रोग, तुम्ही भेट घेतलेले डॉक्टर, तुम्ही घेतलेली औषधे आणि निदानाचा तपशील असेल. आम्ही एक अशी प्रणाली तयार करत आहोत जी प्रत्येक नागरिकाला चांगले आणि माहितीपूर्ण निर्णय घेण्यास मदत करेल.”
सिम्बायोसिस सेंटर फॉर मेटाबॉलिक अँड एंडोक्राइन डिसऑर्डरमध्ये शरीर रचना यंत्र, त्वचेच्या घडीची जाडी मोजण्यासाठी कॅलिपर, न्यूरोपॅथी लवकर ओळखण्यासाठी बायोथेसिओमीटर, हातात धरता येणारे रक्तवहिन्यासंबंधी डॉप्लर, पोडियास्कॅन इत्यादी सुसज्ज यंत्रणा आहेत, सोबतच पोषणतज्ञ आणि नर्स डायबेटिक शिक्षक रुग्णांना आणि त्यांच्या नातेवाईकांना योग्य प्रकारचा आहार आणि त्याचे महत्त्व सुनिश्चित करण्यासाठी उपलब्ध असतील. केंद्राचा मुख्य भर आजाराची गुंतागुंत रोखणे आणि रुग्णांना चांगली जीवनशैली राखण्यासाठी मार्गदर्शन करणे यावर आहे.
कार्डिओलॉजी, पोडियाट्रिक सर्जन, न्यूरोलॉजिस्ट, नेत्ररोगतज्ज्ञ यांसारखे सर्व संबंधित तज्ञ केंद्रात सेवा देण्यासाठी उपलब्ध आहेत. शिवाय, आणखी एक प्रमुख चिंता करण्याजोगा जीवनशैली आजार आहे लठ्ठपणा. केंद्राचे उद्दिष्ट अशा रूग्णांसाठी गैर- उपचारात्मक आणि शस्त्रक्रिया दोन्ही उपाय प्रदान करणे हे आहे. या केंद्रात मधुमेह आणि लठ्ठपणा व्यतिरिक्त थायरॉईड विकार, पॉली सिस्टिक ओव्हेरियन सिंड्रोम (पीसीओएस) आणि इतर चयापचय आणि अंतःस्रावी विकार असलेल्या रुग्णांचे व्यवस्थापनही केले जाईल.
सिम्बायोसिस इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, सिम्बायोसिस स्कूल ऑफ बायोलॉजिकल सायन्सेस आणि सिम्बायोसिस सेंटर फॉर स्टेम सेल रिसर्च (SCSCR), सिम्बायोसिस सेंटर फॉर मेडिकल इमेजिंग ॲनालिसिस (SCMIA), सिम्बायोसिस सेंटर फॉर इमोशनल वेलबीइंग (SCEW), सिम्बायोसिस सेंटर फॉर अप्लाइड आर्टिफिशियल इंटेलिजेंस (SCAAI), सिम्बायोसिस सेंटर फॉर बिहेवियरल स्टडीज (SCBS), सिम्बायोसिस सेंटर फॉर नॅनोसायन्स अँड नॅनोटेक्नॉलॉजी (SCNN) आणि सिम्बायोसिस सेंटर फॉर वेस्ट रिसोर्स मॅनेजमेंट (SCWRM) यांसारख्या कॅम्पसमधील सहाय्यक संस्थांचे अस्तित्व शैक्षणिक आणि संशोधन क्षेत्रात लक्ष केंद्रित करण्यात मदत करेल.
***
S.Kane/S.Mukhedkar/P.Kor
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1873775)