संरक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav g20-india-2023

भारतीय लष्कराकडून गणवेशाच्या नव्या रचनेची आणि केमोफ्लाज पॅटर्नची बौद्धिक संपदा हक्क (आयपीआर) अंतर्गत नोंदणी

Posted On: 03 NOV 2022 9:02PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 3 नोव्‍हेंबर 2022

 

भारतीय लष्कराकडून आपल्या गणवेशाचे स्वामित्व प्रस्थापित करण्यासाठी गणवेशाच्या नव्या केमोफ्लाज पॅटर्नची आणि सुधारित लढाऊ गणवेशाच्या डिझाइनची नोंदणी करण्याची प्रक्रिया पेटंट्स, डिझाईन्स आणि ट्रेडमार्कचे महा नियंत्रक, कोलकाता यांनी पूर्ण केली आहे. पेटंट कार्यालयाच्या अधिकृत जर्नलमध्ये 21 ऑक्टोबर 2022 रोजी अंक क्रमांक 42/2022 द्वारे नोंदणी प्रकाशित करण्यात आली आहे. भारतीय लष्कराच्या सैनिकांसाठी नवीन डिजिटल पॅटर्न कॉम्बॅट युनिफॉर्मचे अनावरण 15 जानेवारी 2022 (सैन्य दिन) रोजी करण्यात आले. सुधारित गणवेशाचे स्वरूप समकालीन आहे तर रचना कामासाठी अनुकूल आहे. गणवेशाचे कापड वजनाला हलके, मजबूत, श्वास घेण्यायोग्य, जलद कोरडे होणारे आणि देखभाल करण्याला सोपे आहे. महिलांच्या लढाऊ गणवेशासाठी लिंगविशिष्ट बदलांचा समावेश केल्याने गणवेशाचे वेगळेपण स्पष्ट दिसते.

डिझाईन आणि केमोफ्लाज पॅटर्नचे ‘बौद्धिक संपदा अधिकार (आयपीआर)’ आता पूर्णपणे भारतीय लष्कराकडे आले आहेत. त्यामुळे अधिकृत नसलेल्या कोणत्याही विक्रेत्याद्वारे उत्पादन करणे बेकायदेशीर असेल आणि तसे केल्यास कायदेशीर परिणामांना सामोरे जावे लागेल. भारतीय सैन्य डिझाईनचे विशेष अधिकार लागू करू शकते आणि सक्षम न्यायालयासमोर दिवाणी कारवाईच्या मार्गाने उल्लंघनाचे दावे दाखल करू शकते. उल्लंघनाविरूद्धच्या उपायांमध्ये अंतरिम आणि कायमस्वरूपी आदेश तसेच नुकसानीचा समावेश होतो.

गणवेशाचा नवीन पॅटर्न सादर करण्याच्या प्रक्रियेचा एक भाग म्हणून, एकूण 50,000 संच कॅन्टीन स्टोअर्स विभाग (सीएसडी) मार्फत आधीच खरेदी केले गेले आहेत. 15 सीएसडी डेपोंना (दिल्ली, लेह, बीडी बारी, श्रीनगर, उधमपूर, अंदमान आणि निकोबार, जबलपूर, मासीमपूर, नारंगी, दिमापूर, बागडोगरा, लखनौ, अंबाला, मुंबई आणि खडकी) वितरित केले गेले आहेत. दिल्ली येथील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी (एनआयएफटी) च्या प्रशिक्षकांच्या समन्वयाने विशिष्ट डिझाइननुसार नवीन गणवेशांची शिलाई करण्यासाठी नागरी आणि लष्करी टेलरना प्रशिक्षण देण्यासाठी कार्यशाळा आयोजित केल्या जात आहेत. ज्युनिअर कमिशन्ड ऑफिसर्स (जेसीओज) आणि इतर श्रेणीतल्या (ओआर) अधिकाऱ्यांना वैयक्तिक किटचा भाग म्हणून 11.70 लाख गणवेश संच पुरवण्यासाठी खरेदी प्रक्रिया प्रगतीपथावर आहे आणि ऑगस्ट 2023 पासून सुरू होण्याची शक्यता आहे.

 

* * *

S.Patil/P.Jambhekar/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai(Release ID: 1873572) Visitor Counter : 152


Read this release in: English , Urdu , Hindi , Tamil