रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय
बायो-सीएनजी, बायो-एलएनजी आणि बायो-मासपासून ग्रीन हायड्रोजनच्या निर्मितीसाठी जैव-तंत्रज्ञानाच्या वापरावर लक्ष केंद्रित करण्याचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे आयआयटी संशोधकांना आवाहन
देशात आयात केल्या जाणाऱ्या वस्तू ओळखून त्यांच्यासाठी स्वदेशी पर्याय विकसित करण्यावर भर देणे गरजेचे : केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री
"मागास जिल्ह्यांच्या उन्नतीसाठी वन -आधारित उद्योग, कृषी आणि ग्रामीण तंत्रज्ञान, आदिवासी क्षेत्रावरील संशोधनाला प्राधान्य द्या"
Posted On:
29 OCT 2022 6:34PM by PIB Mumbai
केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज आयआयटीच्या संशोधकांना बायो-सीएनजी, बायो-एलएनजी आणि बायो-मासपासून ग्रीन हायड्रोजनच्या निर्मितीसाठी जैव-तंत्रज्ञानाच्या वापरावर त्यांचे संशोधन केंद्रित करण्याचे आवाहन केले. ग्रीन हायड्रोजनचा मोठ्या प्रमाणावर वापर करण्याच्या दिशेने आपण वाटचाल करत आहोत, असे ते म्हणाले. आयआयटी मुंबई येथील शैलेश जे. मेहता स्कूल ऑफ मॅनेजमेंटद्वारा आयोजित अलंकार-2022 या जागतिक नेतृत्व शिखर परिषदेत ते आज बोलत होते.
गरजा ओळखून त्या आधारे आपण संशोधनाला प्राधान्य देण्याची गरज आहे, असे त्यांनी आयआयटी मुंबईच्या विद्यार्थ्यांना सांगितले. संशोधनातून आयातीला पर्याय, किफायतशीर, प्रदूषणमुक्त, स्वदेशी उपाय पुढे यायला यावेत असे ते म्हणाले. "आपल्याला देशात आयात केल्या जाणाऱ्या वस्तू ओळखण्याची गरज आहे आणि त्यानंतर त्यांच्यासाठी स्वदेशी पर्याय विकसित करण्यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे. देशात आयात केल्या जाणाऱ्या वस्तू ओळखून त्यांच्यासाठी स्वदेशी पर्याय विकसित करण्यावर भर देणे गरजेचे आहे. यामुळे आयात कमी होईल, निर्यात वाढेल आणि आपली अर्थव्यवस्था अधिक मजबूत होईल" असे ते म्हणाले. सर्व संशोधन प्रकल्पांसाठी सिद्ध तंत्रज्ञान, आर्थिक व्यवहार्यता, कच्च्या मालाची उपलब्धता आणि विक्रीसाठीची योग्यता यांचा प्रामुख्याने विचार व्हायला हवा असे ते म्हणाले.
जरी कृषी क्षेत्राचा जीडीपी केवळ 12 टक्के असला तरी देशातील 65 टक्के लोकसंख्या शेतीवर अवलंबून आहे असे ते म्हणाले. देशात 124 जिल्हे आहेत, जिथे मोठ्या प्रमाणात लोकसंख्या आहे, मात्र ते सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासलेले आहेत, असे त्यांनी सांगितले. त्यांनी आयआयटीच्या संशोधकांना या जिल्ह्यांमधील वन-आधारित उद्योग, कृषी आणि ग्रामीण तंत्रज्ञान, आदिवासी क्षेत्र यांना संशोधनात प्राधान्य देण्याचे आवाहन केले. "आपल्याला क्रांती घडवून आणण्याची क्षमता असलेला ग्रामीण, कृषी संबंधी आवश्यक कच्चा माल ओळखण्याची गरज आहे. यामुळे मोठ्या प्रमाणात विकास होईल आणि रोजगाराच्या संधी निर्माण होतील", असे ते म्हणाले.
भविष्यात ग्रीन हायड्रोजनचा वापर रसायने, खते, पोलाद सारख्या विविध उद्योगांमध्ये तसेच वाहतूक क्षेत्रातही केला जाईल, असे सांगून गडकरी यांनी देशातील तरुण, प्रतिभावान अभियांत्रिकी मनुष्यबळाला इलेक्ट्रोलायझिंगद्वारे सांडपाण्यावर प्रक्रिया करून ग्रीन हायड्रोजन निर्मितीवर संशोधन करण्याचे आवाहन केले. . यामुळे देशातील नगरपालिकांना कचऱ्यातून संपत्ती निर्मिती बरोबरच स्वच्छ भारत अभियान राबविण्यास देखील मदत होईल असे ते म्हणाले. या संदर्भात त्यांनी नागपूर महानगरपालिकेचे उदाहरण दिले. त्यांनी सांडपाण्यावर प्रक्रिया केली आणि नंतर ते कोराडी आणि खापरखेडा येथील औष्णिक वीज केंद्रातील वीज प्रकल्पांसाठी राज्य वीज उत्पादक महाजनकोला विकून कचऱ्यापासून संपत्ती निर्माण करता येते ही संकल्पना प्रत्यक्षात अमलात आणून दाखवली आहे. यातून वार्षिक 325 कोटी रुपयांचा महसूल प्राप्त होत आहे असे ते म्हणाले.
आगामी काळात आपण ऊर्जा निर्यातदार देश बनले पाहिजे, असे ते म्हणाले. पंतप्रधानांचे आत्मनिर्भर भारताचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आयआयटीच्या विद्यार्थ्यांनी मोठे आव्हान स्वीकारावे, असे आवाहन त्यांनी केले. ऊर्जा संकट ही आपली समस्या आहे, असे ते म्हणाले. देशाच्या ऊर्जा निर्मितीत सौरऊर्जेचा 38 टक्के वाटा आहे आणि हा वाटा वाढवला जात असताना, जगातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या अर्थव्यवस्थेत आपण अजूनही औष्णिक उर्जा निर्मिती थांबवू शकत नाही, असेही ते म्हणाले. मात्र, आपल्या पर्यावरण आणि परिसंस्थेसाठी प्रदूषण ही एक मोठी चिंतेची बाब आहे आणि आपला देश 16 लाख कोटी रुपयांचे जीवाश्म इंधन आयात करतो, याकडे त्यांनी लक्ष वेधले. म्हणूनच हरित इंधनावर भर देण्याची गरज आहे असे ते म्हणाले.
आपल्या देशात ऊसाची मळी (मोलॅसिस), बी-हेवी मोलॅसिस, ऊस, तुकडा तांदूळ, बांबू, अन्नधान्य, कृषी-कचरा यांपासून हरित हायड्रोजन निर्मिती करता येते. आसाममध्ये बांबूपासून इथेनॉल तयार करण्याचा प्रकल्प सुरू झाला आहे, पानिपतमधील आयओसीएल प्रकल्प भाताच्या पेंढ्यापासून (किंवा हिंदीत पराली) जे हिवाळ्यात दिल्ली आणि आसपासच्या परिसरात हवा प्रदूषित होण्याचे मुख्य कारण आहे, त्यापासून दररोज 150 टन बायो-बिटुमेन तयार करतो, या प्रकल्पातून 1 लाख लिटर बायो-इथेनॉलची निर्मिती देखील होत आहे. याशिवाय आयओसीएल प्रकल्पात 5 टन परालीपासून 1 टन बायो-सीएनजी तयार होतो अशी माहिती गडकरी यांनी दिली. या संदर्भात ते म्हणाले, पाणी, वीज, वाहतूक, दळणवळण या उद्योगांसाठीच्या मूलभूत गरजा आहेत, ज्यामुळे भांडवली गुंतवणूक आणि रोजगार निर्माण होईल. या संदर्भात ते म्हणाले, पाणी, वीज, वाहतूक, दळणवळण या उद्योगांसाठी मूलभूत गरजा आहेत, त्यातूनच भांडवली गुंतवणूक येईल आणि रोजगार निर्मिती होईल, असे गडकरी म्हणाले.
पर्यायी इंधनावर आधारित वाहतुकीबाबत बोलताना नितीन गडकरी म्हणाले की, कंपन्या बायो-इथेनॉल इंधनावर चालणाऱ्या मोटार-सायकल आणि स्कूटर बनवत आहेत. अलिकडे झालेल्या संशोधनात असे दिसून आले आहे की, इथेनॉल आणि पेट्रोल यांचे ‘मायलेज’ सारखेच असून दोन्ही इंधनावर गाडी तेवढेच अंतर चालते. मात्र इथेनॉलची किंमत 60 रुपये असून, ती पेट्रोलच्या तुलनेत बरीच कमी आहे, असेही ते म्हणाले.
संशोधन संस्थांनी आपण केलेले कार्य बंद दाराआड ठेवू नये, असे सांगून आपल्या संस्थेमध्ये झालेल्या कामाचे शोधनिबंध सार्वजनिक करावेत, असे आवाहन नितीन गडकरी यांनी केले. यासाठी भागधारकांमधील सहकार्य, समन्वय आणि संवाद आवश्यक आहे, असेही ते म्हणाले.
रस्ते आणि वाहतूक क्षेत्रातील तंत्रज्ञानामध्ये क्रांती घडून आली आहे, याविषयी बोलताना केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री म्हणाले की, लडाख आणि लेहला जोडण्यासाठी एक बोगदा तयार करण्यात येत आहे. या बोगद्याच्या बांधकामासाठी 12000 कोटी रुपये खर्च येणार होता आता त्यामध्ये बरेच संशोधन करण्यात आले आहे, त्यामुळे बोगदा बांधण्याच्या कामामध्ये सुमारे 5000 कोटी रुपयांची बचत झाली आहे". गडकरी यांनी माहिती दिली की आयआयटीमध्ये शिक्षण घेतलेल्या व्यक्तीने तिथे फ्युनिक्युलर म्हणजे केबल कार प्रमाणे दोरीवर चालणारी रेल्वे विकसित करण्यासाठी पथदर्शी –प्रकल्पाचे नेतृत्व केले आहे. आता, या प्रकल्पामुळे त्या खडबडीत पर्वत रांगांममधून लोक दुचाकी गाड्या, मेंढ्यांचे कळप यांची वाहतूक करण्यासाठी या ‘फ्युनिक्युलर’ रेल्वे वाहतुकीच्या रूपात राबविल्या जाणार्या स्मार्ट वाहतूक साधनाचा वापर करू शकणार आहेत. बंगळुरूमध्ये होणारी वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी स्मार्ट वाहतूक उपायासाठी केलेल्या अभ्यासाबाबतही त्यांनी माहिती दिली. आयआयटीच्या विद्यार्थ्यांनी वाहतूक क्षेत्रासाठी नवीन तंत्रज्ञानावर त्यांचे संशोधन लक्ष केंद्रित करण्याचे आवाहन केले. ते म्हणाले की, देशात 10 लाख इलेक्ट्रिक बसेस चालवण्याची क्षमता आहे, त्यामध्ये डबल डेकर, एसी आणि लक्झरी बसचा समावेश आहे. आता देशात इलेक्ट्रिक वाहने लोकप्रिय झाली आहेत, असेही ते म्हणाले. देशात 400 स्टार्ट अप ‘ इलेक्ट्रिक’ वाहनांसाठी काम करत आहेत, अशी माहिती गडकरी यांनी दिली.
आयआयटीमधून बाहेर पडणा-या अनेकांनी सुरू केलेल्या स्टार्ट-अप कंपन्या यशस्वी होत आहेत, असे नितीन गडकरी म्हणाले. खेडेगाव, गरीब, कामगार आणि शेतकरी यांच्या उन्नतीसाठी युवा प्रतिभावंतांनी त्यांच्या संशोधनावर अधिक लक्ष केंद्रित करण्याचा सल्ला त्यांनी दिला. "देशातील गरिबी, उपासमारी आणि बेरोजगारी संपवण्यासाठी तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी काम करावे , कारण ते देशाच्या सामाजिक-आर्थिक परिवर्तनासाठी लाभदायक ठरणार आहे. प्रामाणिकपणा, प्रतिष्ठा आणि विश्वासार्हता हे 21 व्या शतकातील सर्वात मोठे भांडवल आहे. नोकरी देणारे बनण्याचा प्रयत्न करा. - नोकरी करणारे नाही, " असा सल्ला केंद्रीय मंत्र्यांनी आयआयटी मुंबईच्या विद्यार्थ्यांना दिला. 5 ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था आणि आत्मनिर्भर भारताच्या उभारणीविषयी बोलताना नितीन गडकरी म्हणाले, उद्योजकता, यशस्वी तंत्रज्ञान आणि मानवी मूल्यांसह ज्ञान हे यशाचे मर्म आहे.
यावेळी आयआयटी मुंबईचे संचालक प्रा.सुभाशीष चौधरी आणि संस्थेचे विद्यार्थी उपस्थित होते.
***
R.Aghor/S.Kane/S.Bedekar/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1871868)
Visitor Counter : 253