राष्ट्रपती कार्यालय

भारताच्या राष्ट्रपतींनी राष्ट्रपतींच्या अंगरक्षकांना सिल्व्हर ट्रम्पेट आणि ट्रम्पेट बॅनर केले प्रदान

Posted On: 27 OCT 2022 9:52PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 27 ऑक्‍टोबर 2022

 

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज (ऑक्टोबर 27, 2022)  राष्ट्रपती भवनात झालेल्या समारंभात राष्ट्रपतींच्या अंगरक्षकांना (पीबीजी) सिल्व्हर ट्रम्पेट  आणि ट्रम्पेट बॅनर प्रदान केले.  

यावेळी आपल्या छोटेखानी  भाषणात राष्ट्रपतींनी,दिमाखदार संचलन, सुसज्ज घोड्यांची देखभाल आणि लक्षवेधी औपचारिक पोशाख यासाठी पीबीजीचे कमांडंट, अधिकारी, जेसीओ आणि इतर अधिकाऱ्यांचे अभिनंदन केले. राष्ट्रपती म्हणाल्या की हा कार्यक्रम आणखी विशेष आहे, कारण देशभरात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा होत असताना, राष्ट्रपतींचे अंगरक्षक त्यांच्या स्थापनेची 250 वर्षे साजरी करत आहेत.

राष्ट्रपतींनी उत्कृष्ट लष्करी परंपरा, व्यावसायिकता आणि सर्व कामांमधील शिस्त, यासाठी पीबीजींची प्रशंसा केली. त्या म्हणाल्या की देशाला त्यांचा अभिमान आहे. राष्ट्रपती भवनाच्या सर्वोच्च परंपरा कायम राखण्यासाठी पीबीजी समर्पण, शिस्त आणि शौर्याचे पालन करून भारतीय लष्कराच्या इतर रेजीमेंटसाठी एक आदर्श ठरतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.  

राष्ट्रपतींचे अंगरक्षक ही भारतीय सैन्यातील सर्वात जुनी रेजिमेंट असून, 1773 मध्ये गव्हर्नर-जनरलचे अंगरक्षक (नंतर व्हॉईसरॉयचे अंगरक्षक) म्हणून तिचा विस्तार करण्यात आला.        

भारताच्या राष्ट्रपतींचे अंगरक्षक असलेल्या लष्कराच्या या तुकडीचे अनन्य साधारण वेगळेपण म्हणजे, राष्ट्रपतींचे सिल्व्हर ट्रम्पेट आणि ट्रम्पेट बॅनर घेऊन जाण्याचा विशेषाधिकार असलेली भारतीय लष्कराची ही एकमेव तुकडी आहे. 1923 मध्ये तत्कालीन व्हाईसरॉय लॉर्ड रीडिंग यांनी राष्ट्रपतींच्या अंगरक्षकाला, या सेवेची 150 वर्षे पूर्ण झाल्या निमित्त हा बहुमान प्रदान केला होता. त्यानंतर आलेल्या प्रत्येक व्हाईसरॉयने अंगरक्षकाला सिल्व्हर ट्रम्पेट आणि ट्रम्पेट बॅनर प्रदान केले.

27 जानेवारी 1950 रोजी या रेजिमेंटचे नाव राष्ट्रपतींचे अंगरक्षक असे ठेवण्यात आले. प्रत्येक राष्ट्रपतींनी या रेजिमेंटचा सन्मान करण्याची प्रथा कायम ठेवली आहे. वसाहतवादाच्या काळात या बॅनरवर शस्त्रांचे चिन्ह होते, त्या ऐवजी आता राष्ट्रपतींचा मोनोग्राम बॅनरवर दिसतो. भारताचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी 14 मे 1957 रोजी राष्ट्रपतींच्या अंगरक्षकांना त्यांचे सिल्व्हर ट्रम्पेट आणि ट्रम्पेट बॅनर प्रदान केले.

 

* * *

S.Kane/R.Agashe/D.Rane

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1871409) Visitor Counter : 156


Read this release in: English , Urdu , Hindi , Punjabi