रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय
भारत-ऑस्ट्रेलियन द्विपक्षीय व्यापार आणि गुंतवणुकीला प्रोत्साहन देत वाहतूक पायाभूत सुविधा क्षेत्रासह भारतात गुंतवणुकीच्या मोठ्या संधींवर नितीन गडकरी यांनी दिला भर
Posted On:
21 OCT 2022 7:50PM by PIB Mumbai
भारत-ऑस्ट्रेलियन द्विपक्षीय व्यापार आणि गुंतवणुकीला प्रोत्साहन देत वाहतूक पायाभूत सुविधा क्षेत्रासह भारतात गुंतवणुकीच्या मोठ्या संधीवर केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी भर दिला. ऑस्ट्रेलियात सिडनी येथील न्यू साउथ वेल्स इथे झालेल्या विविध बैठकांमध्ये गडकरी यांनी ऑस्ट्रेलियन सिनेटर व्यापार आणि उत्पादन खात्याचे सहाय्यक मंत्री आयरेस यांच्याशी फलदायी संवाद साधला.

भारतातील रस्ते आणि वाहतूक क्षेत्रात ऑस्ट्रेलियन गुंतवणूकदारांसाठी असलेल्या उत्तम गुंतवणूक संधींबद्दल गडकरी आणि आयरेस यांनी चर्चा केली. भविष्यातील विकासात तंत्रज्ञान आणि नवोन्मेष यांची प्रमुख भूमिका असून दोन्ही देशांमधील व्यापारी संबंध उत्साहवर्धक आणि उभय देशांसाठी लाभदायी आहेत, असे गडकरी म्हणाले.

गडकरी यांनी सिडनी येथील न्यू साउथ वेल्स विद्यापीठातील एकात्मिक परिवहन अभिनव संशोधन केंद्राला (rCITI) भेट दिली. हे एकात्मिक परिवहन अभिनव संशोधन केंद्र भारतीय महामार्ग अभियंते अकादमी आणि भारतीय वाहतूक उद्योगाच्या सहकार्याने भारतात अत्याधुनिक वाहतूक तंत्रज्ञान आणि प्रणाली (CATTS) केंद्र उभारण्यासाठी एकत्र काम करेल.भारत -ऑस्ट्रेलियन भागीदारी असलेली अत्याधुनिक वाहतूक तंत्रज्ञान आणि प्रणाली (CATTS) स्मार्ट वाहतूक प्रणालीच्या क्षेत्रात क्षमता बांधणीसाठी उत्कृष्टता केंद्र म्हणून काम करेल.

सिडनी येथे प्राइसवॉटरहाऊस कूपर्सने (PwC) आयोजित केलेल्या ऑस्ट्रेलिया-भारत पायाभूत सुविधा मंचच्या (AIIF) चमूसोबत त्यांनी बैठक घेतली.

गडकरी यांनी एक्स्पोर्ट फायनान्स ऑस्ट्रेलियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी जॉन हॉपकिन्स यांची भेट घेतली. त्यांनी यावेळी उभय देशांमधील व्यापार आणि द्विपक्षीय गुंतवणुकीसंदर्भातील भारत-ऑस्ट्रेलिया आर्थिक सहकार्य आणि व्यापार कराराच्या (ईसीटीए ) परिणामांशी संबंधित चर्चा केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली बळकट असलेली भारत-ऑस्ट्रेलिया भागीदारी वाढून येत्या काही वर्षांत भारताची ऑस्ट्रेलियाला वस्तू आणि सेवांची निर्यात वाढेल, असे गडकरी म्हणाले.

सिडनी येथील सेंट पीटर्स एनएसडब्ल्यू येथील ट्रान्सर्बनद्वारे व्यवस्थापित ऑस्ट्रेलियातील सर्वात मोठ्या मोटरवे कंट्रोल सेंटरला (एमसीसी) गडकरी यांनी भेट दिली.या सुविधेमुळे गंभीर घटना घडल्यास समन्वय साधला जातो आणि बोगद्यांसह देखभाल तसेच वाहतुकीवर देखरेख ठेवली जाते.

त्यांनतर गडकरी यांनी एनएसडब्ल्यू विद्यापीठाने आयोजित केलेल्या कार्यक्रमात देशांच्या विकास आणि समृद्धीमध्ये पायाभूत सुविधांच्या महत्त्वपूर्ण भूमिकेबद्दल भाष्य केले. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पायाभूत सुविधांच्या भागीदारीचा विस्तार करण्याच्या निर्वेध संधी त्यांनी अधोरेखित केल्या.
***
R.Aghor/S.Chavan/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1870083)
Visitor Counter : 219