आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ मनसुख मांडविया यांनी केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ भारती प्रवीण पवार यांच्या उपस्थितीत कर्नाटकातल्या म्हैसूर आणि महाराष्ट्रातल्या चंद्रपूर येथे सीजीएचएस आरोग्‍य निरामय केंद्रांचे केले उद्घाटन

Posted On: 19 OCT 2022 9:49PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 19 ऑक्‍टोबर 2022

 

केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री डॉ. मनसुख मांडविया यांनी आज केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती प्रवीण पवार यांच्या उपस्थितीत कर्नाटकातल्या म्हैसूर  आणि  महाराष्ट्रातल्या चंद्रपूर  येथे सीजीएचएस आरोग्‍य आणि निरामय  केंद्राचे   डिजिटल माध्‍यमाव्दारे उद्घाटन केले.

कर्नाटक आणि महाराष्ट्रातील लोकांना चांगल्या वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी ही दोन्ही सीजीएचएस आरोग्‍य आणि निरामय  केंद्रे महत्वाची भूमिका पार पाडतील असा विश्‍वास व्यक्त करून,  आरोग्य आणि निरामय केंद्रे सुरू होत होत असल्याबद्दल डॉ. मांडवीया यांनी आनंद व्यक्त केला. त्यांनी  म्हैसूर आणि चंद्रपूर येथे आरोग्य केंद्रे सुरू  झाल्याबद्दल लाभार्थ्यांचे अभिनंदन केले. “आपल्या सरकारी कर्मचारी आणि सेवानिवृत्त अधिकाऱ्यांसाठी दर्जेदार आरोग्य सेवा पुरविण्‍याची  आणि त्यांनी निरामय रहावे, यासाठी सेवा प्रदान करणे ही आमच्या सरकारची जबाबदारी आहे”.

केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनी पुढे सांगितले की, या  केंद्रांमुळे  वैद्यकीय सेवा सुकरतेने  मिळण्यास मदत होईल. 2014 मध्ये सीजीएचएस  केंद्रांची संख्या 25 होती, ती वाढून  आज   77  झाली आहे, हे त्यांनी अधोरेखित केले.

ते पुढे म्हणाले की, "केंद्र सरकार केवळ आरोग्य आणि निरामय केंद्रे  सुरू करूनच नाही तर वैद्यकीय व्यावसायिकांमध्‍येही वृद्धी करीत आहे. आणि अधिक वैद्यकीय महाविद्यालयांद्वारे त्यांचे प्रशिक्षण सुनिश्चित करून 'टोकन टू टोटल' दृष्टिकोन अवलंबत आहे". “देशाच्या दुर्गम भागापर्यंत पोहोचण्यासाठी, दूरसंचार साधनांच्या  मदतीने डॉक्‍टरांकडून सल्‍ला घेणे  आणि एबीडीएम म्हणजेच ‘आयुष्‍मान भारत डिजिटल मिशन’ सारखे उपक्रम राबवून  डिजिटल माध्‍यमातून  हस्तक्षेप केला  आहे. जनऔषधी केंद्रांची स्थापना करण्यात आली असून आयुष्मान भारत योजना सुरू करण्यात आली आहे. "सर्वांसाठी आरोग्य" सुनिश्चित करता यावे यासाठी केंद्र सरकार विविध सुधारणा करत आहे", असे डॉ. मांडवीया  म्हणाले.

डॉ भारती प्रवीण पवार यावेळी म्हणाल्या  की, "सीजीएचएस  सर्व  निवृत्तीवेतन धारकांपर्यंत पोहोचण्‍यासाठी काम करेल आणि सर्व मदत करेल. आणि या केंद्रांमध्ये नवीन संकल्पना आणि पद्धतींचा समावेश करेल". सीजीएचएस अंतर्गत आरोग्य सुविधा सुधारण्यासाठी सरकारने अनेक उपाययोजना केल्या असल्याचे डॉ. भारती पवार यांनी अधोरेखित केले. “केंद्र सरकारने देशातील प्रत्येक नागरिकाचे कल्याण करण्यासाठी पीएमजेएवाय, पीएम-एबीएचआयएम, एचडब्ल्यूसी यांच्यासारखे काही महत्त्वाकांक्षी उपक्रम सुरू केले आहेत. कर्नाटकची सांस्कृतिक राजधानी म्हैसूर आणि काळ्या सोन्याचे शहर चंद्रपूर येथे आज उघडलेलीही आरोग्‍य निरामय केंद्र सर्वांना आरोग्यविषयक सुविधा मिळणे  सुनिश्चित करतील, अशी आम्हाला आशा आहे,” असे डॉ. भारती पवार   म्हणाल्या.

 

* * *

S.Kakade/S.Bedekar/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1869352) Visitor Counter : 190
Read this release in: English , Urdu , Hindi , Telugu