संरक्षण मंत्रालय
गुजरातमध्ये गांधीनगर येथे डेफ-एक्सपो 2022 च्या पार्श्वभूमीवर भारत-आफ्रिका संरक्षण संवादाचे आयोजन; या चर्चेमुळे भारत-आफ्रिका संरक्षण विषयक संबंध अधिक दृढ होण्याचा मार्ग मोकळा
सैनिक प्रशिक्षण आणि लष्करी अभ्यासाच्या क्षेत्रात सहकार्य वाढवण्याबाबतच्या जाहीरनाम्याचा स्वीकार
भारतातील संरक्षण विषयक उपकरणे आणि तंत्रज्ञान वापरुन बघण्याचे संरक्षण मंत्र्यांचे सर्व आफ्रिकी देशांना आवाहन; भारतातील अत्याधुनिक आणि मजबूत संरक्षण सामग्री उत्पादन व्यवस्था, आंतरराष्ट्रीय गरजांची पूर्तता करू शकतात
“सुरक्षित आणि शांततापूर्ण सागरी पर्यावरण, विशेषतः हिंद महासागर प्रदेश सुरक्षित ठेवणे सुनिश्चित करण्यात, भारत आणि आफ्रिका महत्त्वाचे भागीदार”
“भारताचा वर्गीकृत जागतिक उतरंडीच्या पद्धतीवर विश्वास नाही; आमचे जगाशी असलेले नातेसंबंध मानवी समानता आणि प्रतिष्ठेवर आधारलेले आहेत: राजनाथ सिंह
“संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषद अधिक व्यापक प्रतिनिधित्व असलेली असावी, जिथे आंतरराष्ट्रीय शांतता, सुरक्षा आणि नियमांचा वैश्विक स्तरावर आदर केला जाईल ”
Posted On:
18 OCT 2022 8:14PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 18 ऑक्टोबर 2022
गुजरातच्या गांधीनगर इथे आज, 18 ऑक्टोबर 2022 रोजी झालेल्या डेफ-एक्सपो 2022 दरम्यान, भारत-आफ्रिका संरक्षण संवाद- आयएडीडी झाला. या संवादादरम्यान आयएडीडीची संकल्पना ‘संरक्षण आणि सुरक्षा सहकार्य अधिक ऊर्जावान आणि दृढ करण्यासाठी धोरणाचा स्वीकार” या संकल्पनेशी संबंधित विविध पैलूवर यावेळी चर्चा झाली.
या संवादात, बीजभाषण करतांना, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी आयएडीडी ची संकल्पना सविस्तर विशद करुन सांगितली. या अंतर्गत, भारत आणि आफ्रिका दोन्ही देश, संरक्षण विषयक सहकार्याचे नवे मार्ग शोधण्यास कटिबद्ध आहेत. यात क्षमता बांधणी, प्रशिक्षण, सायबर सुरक्षा, सागरी संरक्षण आणि दहशतवाद विरोधी कारवाया, अशा सर्वच विषयांचा समावेश आहे. सुरक्षित आणि शांततामय सागरी पर्यावरणासाठी, विशेषतः हिंद महासागर प्रदेश सुरक्षित असेल हे सुनिश्चित करण्यासाठी, भारत आणि आफ्रिकी देश महत्वाचे भागीदार आहेत, असेही ते म्हणाले. अनेक प्रादेशिक यंत्रणा, ज्या सुरक्षाविषयक कार्यात एकात्मिक आणि विधायक सहकार्य करण्यास पाठबळ देतात, त्या यंत्रणांसाठी भारत आणि आफ्रिका एकत्रित काम करतात, असे त्यांनी नमूद केले.तसेच, शांतता आणि समृद्धीला असलेल्या सामाईक आव्हानांचा सामना करण्यातही दोन्ही देशांमध्ये भरीव सहकार्य आहे, असे त्यांनी सांगितले.
भारत आणि आफ्रिका यांच्यात बहुआयामी संरक्षण आणि सुरक्षाविषयक सहकार्याचे संबंध आहेत, यावर राजनाथ सिंह यांनी भर दिला. कुठलेही संघर्ष, दहशतवाद आणि हिंसक कट्टरतावादासारख्या आव्हानांचा सामना करतांना, भारताचा आफ्रिकेला कायम पाठिंबा राहील, अशी ग्वाही संरक्षणमंत्र्यांनी दिली. “शांतता, सुरक्षितता, स्थैर्य, विकास आणि समृद्धी अशा सर्व गोष्टी साध्य करण्याच्या आफ्रिकी देशांच्या प्रयत्नात, भारत कायम त्यांच्यासोबत असेल. आफ्रिकेसोबतची भारताची भागीदारी दहा दिशादर्शक तत्वांवर आधारलेली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2018 साली युगांडाच्या संसदेत दिलेल्या भाषणात, ही दहा तत्वे सांगितली होती.
त्यावेळी, आफ्रिका, भारताच्या सर्व प्राधान्यक्रमात सर्वोच्च स्थानी आहे, असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले होते. आम्ही आफ्रिकेसोबतचे आपले संबंध अधिक दृढ आणि सशक्त करण्यासाठी काम करतच राहू. आफ्रिकी देशांशी विकासात्मक, व्यावसायिक आणि तंत्रज्ञानविषयक संबंध तर भारताला अधिक दृढ करायचे आहेतच, त्याशिवाय, दोन्ही देशांच्या संयुक्त निवेदनात दहशतवाद आणि कट्टरपंथी कारवायांचा सामना करण्यासाठीच्या क्षमतावृद्धीसाठी सहकार्य अधिक दृढ करण्याचाही मुद्दा समाविष्ट आहे. त्यासोबतच, संयुक्त राष्ट्रांच्या शांततामय अभियानात आणि मुक्त तसेच खुल्या सागरी प्रदेशात एकत्रित काम करण्यावरही भर देण्याचाही उल्लेख आहे.” असे राजनाथ सिंह म्हणाले.
भारत-आफ्रिकी देशांमधील संबंध आर्थिक, मुत्सद्दी आणि संरक्षण क्षेत्रातील बहुआयामी संबंध आहेत, असे राजनाथ सिंह यावेळी म्हणाले. भारत आणि आफ्रिका यांच्यातली मजबूत भागीदारी ‘सागर’ (प्रदेशातील सुरक्षा आणि सर्वांचा विकास) च्या सहकारी आराखड्यावर आधारित आहे, असेही त्यांनी अधोरेखित केले. सागर ही संकल्पना ‘वसुधैव कुटुंबकम’ या तत्वावर आधारित आहे.
आफ्रिकी देशांनी भारतीय संरक्षणविषयक उपकरणे आणि तंत्रज्ञान वापरुन बघावे, असे आवाहन राजनाथ सिंह यांनी केले. गेल्या काही वर्षांत, भारत संरक्षण विषयक उपकरणांची निर्यात करणारा, आघाडीचा देश ठरला आहे, असे त्यांनी नमूद केले. “संरक्षण, सुरक्षा आणि विकास या तिन्ही गोष्टी एकमेकांशी सुसंगत आहेत. कोणत्याही प्रदेशात विकास करायचा असेल तर, त्या भागातील सुरक्षितता महत्वाची आहे. आम्ही, एक मजबूत असा सार्वजनिक आणि खाजगी संरक्षण उद्योग उभारला आहे. भारतात उभारण्यात आलेल्या संरक्षण उत्पादन व्यवस्थेमागे देशातील मोठ्या प्रमाणात उपलब्ध असलेले तंत्रकुशल मनुष्यबळ आहे. आमचे संरक्षण उद्योग क्षेत्र आपल्यासोबत काम करुन आपल्या संरक्षणविषयक गरजा पूर्ण करु शकते.” असे त्यांनी आपल्या आफ्रिकी भागीदारांना सांगितले.
भारताचा जागतिक वर्गीकृत उतरंडीवर विश्वास नाही, असे मत संरक्षण मंत्र्यांनी मांडले. अशा कथित उतरंडीत काही देश, इतरांपेक्षा श्रेष्ठ समजले जातात. भारताचे आंतरराष्ट्रीय संबंध, मानवी समानता आणि प्रतिष्ठेवर आधारलेले आहेत, आणि हे भारताच्या प्राचीन विचारांचेच प्रतिबिंब आहे. “आमचा एखाद्या देशाचा ग्राहक किंवा उपराज्य बनण्याच्या संस्कृतीवर विश्वास नाही. आणि म्हणूनच जेव्हा आम्ही कोणत्याही देशांशी भागीदारी करतो, तेव्हा, ती सार्वभौम समानता आणि परस्पर सन्मानावर आधारित असते. आम्ही परस्पर वित्तीय विकासाच्या दिशेने काम करतो, त्यामुळे, आमचे (इतर राष्ट्रांशी असलेले) संबंध आपोआप विकसित होतात.” असे ते म्हणाले.
जागतिक नियम-कायदेव्यवस्थेचे अधिक लोकशाहीकरण होणे आवश्यक आहे, असा भारताचा विश्वास असल्याचं राजनाथ सिंह यांनी अधोरेखित केलं. जगाच्या बहुराष्ट्रीय मंचावर अधिकाधिक देशांना प्रतिनिधित्व मिळणं, हे आजच्या जागतिक परिस्थितीच्या वस्तुस्थितीला धरुन असेल, असे ते म्हणाले.
संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेतील प्रतिनिधित्व अधिक व्यापक करण्यावर त्यांनी भर दिला. तसेच यामुळे, या संस्थेला अधिक वैधता मिळेल,ज्यातून, आंतरराष्ट्रीय शांतता, सुरक्षितता आणि नियमव्यवस्था याविषयी जगभरात सन्मान केला जातो, ही तत्वे सुरक्षित राहू शकतील.
कोविड-19 महामारीच्या वेळी, भारताने दक्षिण आफ्रिकेला केलेल्या सहकार्याचा संरक्षणमंत्र्यांनी उल्लेख केला. भारतीय नौदलाने, सागर उपक्रमाच्या माध्यमातून अत्यंत उत्कृष्ट क्षमता आणि सेवांचे प्रदर्शन केले. याद्वारे योग्य वेळी, औषध पुरवठा करण्यात आला, तसेच प्रशिक्षण आणि सहकार्यासाठी तज्ञ डॉक्टरांची पथकेही पाठवण्यात आली होती. “आफ्रिकी देशांना मानवी मदत आणि आपत्ती निवारण मदत पाठवणारा भारत पाहिला देश होता” असे ते म्हणाले.
भारत आणि आफ्रिका यांच्यातील राजकीय, आर्थिक आणि सांस्कृतिक संबंधांचा इतिहास राजनाथ सिंह यांनी यावेळी विशद केला. वसाहतवादाच्या काळात निर्माण झालेली एकता, परस्पर विश्वासाची भावना आजही परस्पर सहकार्याला चालना देत आहे, असे ते म्हणाले. आफ्रिकेतील वसाहतवादी राजवट संपवण्याच्या मताचा भारत खंदा पुरस्कर्ता होता असे सांगत, आफ्रिकेतील वर्णद्वेषी आणि वंशवादी राजवटीच्या अंतासाठी भारतानेही योगदान दिले, असेही सिंह यांनी नमूद केले.
या चर्चेनंतर, आयएडीडी -2022 चे गांधीनगर घोषणापत्र, हा दस्तऐवज स्वीकारण्यात आला. यात सैनिकांच्या प्रशिक्षणाचे स्थान आणि प्रशिक्षण संघांची प्रतिनियुक्ती, संरक्षण दलांचे सक्षमीकरण आणि क्षमतावृद्धी करून परस्पर हिताच्या सर्व क्षेत्रांमध्ये प्रशिक्षणाच्या क्षेत्रात सहकार्य वाढवण्याचा तसेच, नैसर्गिक आपत्ती दरम्यान मानवतावादी दृष्टीने मदत करण्याचा प्रस्ताव आहे. भारताने मनोहर पर्रीकर संरक्षण अध्ययन आणि विश्लेषण संस्थेच्या माध्यमातून आफ्रिकी देशांतील विद्यार्थ्यांना अध्ययनवृत्ती देऊ केली आहे.
भारत-आफ्रिका संरक्षण आणि सुरक्षेतील सहभागाला दिलेले सर्वोच्च प्राधान्य अधोरेखित करणाऱ्या या संवाद परिषदेत, 20 संरक्षण मंत्री, सात CDS/सेवेचे प्रमुख आणि आठ स्थायी सचिवांसह पन्नास आफ्रिकन देशांनी सहभाग घेतला होता.
आयएडीडी दरम्यान, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि संरक्षण राज्य मंत्री अजय भट्ट यांनी यावेळी आफ्रिकन मंत्र्यांची भेट घेतली जिथे संरक्षण आणि द्विपक्षीय संबंधांशी संबंधित मुद्द्यांवर चर्चा झाली.
DefExpo 2022 चा एक भाग म्हणून, आयएडीडी मध्ये आफ्रिकन राष्ट्रांना देशांतर्गत संरक्षण उद्योगाचा विस्तार आणि व्याप्ती दाखवण्यात आली. भारताच्या पंतप्रधानांच्या संकल्पनेतील 'मेक इन इंडिया, मेक फॉर द वर्ल्ड' साध्य करण्याच्या प्रमुख प्रयत्नांपैकी एक आहे. या संवादातून दोन्ही आफ्रिकी देशांच्या संरक्षणविषयक गरजा पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. तसेच, आपल्या देशांतर्गत गरजा पूर्ण करण्याचे उद्दिष्टही साध्य होईल. आयएडीडी विषयक एक विशेष मुखपृष्ठ आणि ‘भारत आफ्रिका संरक्षण सहकार्य: संधी आणि आव्हाने’ या विषयावरील पुस्तकही यावेळी प्रकाशित करण्यात आले.
भारत आफ्रिकी देशांदरम्यान डेफएक्सपोचे सलग द्वैवार्षिक आयोजन करण्यासाठी आयएडीडी ला संस्थात्मक स्वरूप देण्यात आले. भारत आणि आफ्रिकी देश यांच्यातील विद्यमान संरक्षण भागीदारी वाढवण्याचा आणि क्षमता वाढवणे, प्रशिक्षण, सायबर सुरक्षा, सागरी सुरक्षा आणि दहशतवादविरोधी क्षेत्रांसह परस्पर संबंधांसाठी अभिसरणाची नवीन क्षेत्रे शोधण्याचा याद्वारे प्रयत्न केला जातो.
S.Patil/R.Aghor/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1868963)
Visitor Counter : 259