कृषी मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ‘पीएम किसान सन्मान संमेलन 2022’चे उद्घाटन, 16,000 कोटी रुपयांचा ‘पीएम-किसान’ निधी केला जारी


बोगस लाभार्थींची नावे वगळून पात्र शेतकऱ्यांची सूची दुरूस्त करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार संयुक्‍तपणे कार्यरत - केंद्रीय मंत्री तोमर

Posted On: 17 OCT 2022 7:45PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 17 ऑक्‍टोबर 2022

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्लीतील भारतीय कृषी संशोधन संस्थेत प्रधानमंत्री किसान सन्मान संमेलन 2022 चे उद्घाटन केले. पंतप्रधानांनी रसायने आणि खते मंत्रालयांतर्गत 600 प्रधानमंत्री किसान समृद्धी केंद्रांचेही (पीएमकेएसके) उद्घाटन केले. याशिवाय, पंतप्रधानांनी, प्रधानमंत्री भारतीय जन उर्वरक  योजना - एक राष्ट्र एक खत याचा शुभारंभ केला.  या कार्यक्रमादरम्यान, पंतप्रधानांनी  थेट लाभ हस्तांतरणाद्वारे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पीएम किसान) अंतर्गत  16,000 कोटी रुपयांचा 12 वा हप्ता देखील जारी केला.  पंतप्रधानांनी  कृषी स्टार्टअप परिषद आणि प्रदर्शनाचे उद्घाटनही केले. या कार्यक्रमादरम्यान, पंतप्रधानांनी ‘इंडियन एज’ हे खतावरील ई-मासिकही प्रकाशित केले. मोदींनी स्टार्टअप प्रदर्शनाच्या संकल्पना पॅव्हेलियनचा आढावा घेतला आणि प्रदर्शनातील उत्पादनांची पाहणी केली.

जय जवान, जय किसान, जय विज्ञान आणि जय अनुसंधान (संशोधन) हे मंत्र एकाच प्रांगणात उपस्थित असल्याचे सांगत पंतप्रधानांनी आपल्या भाषणाला सुरुवात केली. या मंत्राचे जिवंत रूप आपण येथे पाहू शकतो. किसान संमेलन हे शेतकऱ्यांचे जीवन सुसह्य करणे, त्यांची क्षमता वाढवणे आणि प्रगत कृषी तंत्राला चालना देणारे साधन आहे. “आज 600 हून अधिक प्रधानमंत्री समृद्धी केंद्राचे उद्घाटन करण्यात आले ” असे मोदी म्हणाले.  ही केंद्रे केवळ खत विक्री केंद्रे नसून देशातील शेतकऱ्यांशी घट्ट नाते निर्माण करणारी यंत्रणा आहे असे त्यांनी सांगितले. प्रधानमंत्री किसान सन्मान निधीच्या (पीएम-किसान)  नव्या हप्त्याबाबत, पंतप्रधान म्हणाले की, पैसे कोणत्याही मध्यस्थाशिवाय थेट शेतकऱ्यांच्या खात्यात पोहोचतात.

“कोट्यवधी शेतकरी कुटुंबांना 16,000 कोटी रुपयांचा आणखी एक हप्ताही पंतप्रधान किसान सन्मान निधीच्या रुपात जारी करण्यात आला आहे” असे सांगत दिवाळीच्या आधी हा हप्ता शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत असल्याबद्दल मोदी यांनी आनंद व्यक्त केला. प्रधानमंत्री भारतीय जन उर्वरक योजना - एक राष्ट्र एक खत आज  सुरू केली आहे. भारत ब्रँडचे स्वस्त दर्जाचे खत शेतकऱ्यांना मिळण्याची सुनिश्चिती करणारी ही योजना आहे असे पंतप्रधान म्हणाले.

“पीएम किसान सन्मान संमेलन 2022” मध्ये आपल्या भाषणात, केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री,  नरेंद्र सिंह तोमर म्हणाले, पीएम- किसान  ही जगातील सर्वात मोठी थेट लाभ हस्तांतरण  योजना आहे. पंतप्रधान  मोदी यांच्या निरंतर वचनबद्धतेचा परिणाम म्हणजे ही योजना असून त्यामध्‍ये , पारदर्शकता आहे. या योजनेत निधीची कोणत्याही प्रकारे गळती होत नाही. लाभार्थींना निधीचे विनाखंड हस्तांतरण होत असल्याबद्दल तोमर यांनी कौतुक केले.

तोमर  म्हणाले, पीएम किसान सन्मान निधी कार्यक्रम तंत्रज्ञानाच्या मदतीने पूर्ण पारदर्शकतेने राबवला जात आहे. बोगस लाभार्थींची नावे  काढून पात्र शेतकऱ्यांची सूची  दुरुस्त करण्यासाठी केंद्र आणि राज्ये संयुक्तपणे  काम करत असल्याची माहितीही मंत्र्यांनी दिली.

कृषी मंत्री तोमर यांनी आजच्या कार्यक्रमामध्‍ये  शेतकरी आणि कृषी स्टार्ट अप एकाच व्यासपीठावर आल्याबद्दल आनंद व्यक्त केला.

कृषी स्टार्टअप कॉन्क्लेव्ह आणि प्रदर्शनाच्या उद्घाटनाचा  कार्यक्रम पंतप्रधान  मोदी यांच्या हस्ते झाला, याचा उल्लेख करताना, कृषी मंत्री म्हणाले की, आमचे शेतकरी कुशल आणि नवोन्मेषी  आहेत, परंतु त्यांच्याकडे त्यांची प्रतिभा प्रदर्शित करण्यासाठी कोणतेही व्यासपीठ नाही.

‘एक राष्‍ट्र एक खत (ओएनओएफ) योजनेबद्दल बोलताना, तोमर म्हणाले की, आता सर्व प्रकारची खते मग ती डीएपी, एनपीके किंवा युरिया असो, एकाच ब्रँडने म्हणजेच "भारत" या नावाने विकली जातील.  याचा अर्थ खताची  कंपनी कोणतीही असो, देशभरातील खतांचे ब्रँड आता ‘भारत’ या नावाने प्रमाणित करण्यात येणार असल्याचे तोमर यांनी स्पष्‍ट केले.  

 

 

* * *

S.Kane/S.Bedekar/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1868609) Visitor Counter : 425


Read this release in: English , Urdu , Hindi , Manipuri