संरक्षण मंत्रालय

भारत प्रशांत क्षेत्राची सागरी सीमा खुली, मुक्त आणि नियम आधारित असावी या भूमिकेवर भारत ठाम आहे : केंद्रिय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांचं नवी दिल्ली इथं सुरू असलेल्या आशियातल्या तटरक्षक दलांच्या प्रमुखांच्या (HACGAM) 18 व्या बैठकीत प्रतिपादन


परिसंस्थेचे आरोग्य जपत सागरी स्रोतांचा आर्थिक विकासासाठी वापर केला पाहिजे राजनाथ सिंह यांनी व्यक्त केलं मत

Posted On: 15 OCT 2022 10:40PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 15 ऑक्‍टोबर 2022

 

भारत प्रशांत क्षेत्राची सागरी सीमा खुली, मुक्त आणि नियमांवर आधारित असावी या भूमिकेवर भारत ठाम असल्याचा पुनरुच्चार केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी केला आहे. नवी दिल्ली इथं सुरू असलेल्या आशियातल्या तटरक्षक यंत्रणांच्या प्रमुखांच्या (HACGAM) 18 व्या बैठकीच्या उद्घाटन समारंभात राजनाथ सिंह बोलत होते.  भारत हा आजवरच्या इतिहासातला एक शांतताप्रिय देश आहे, ज्याने कधीही परकीय देशावर आक्रमण केले नाही, भारताने कायमच सार्वत्रिक मानवी मूल्ये आणि इतर देशांच्या प्रादेशिक अखंडतेचा  आदर केला आहे, आणि इतर देशांना  नेहमीच समान भागीदार म्हणूनच वागवले आहे, असे संरक्षणमंत्र्यांनी ठामपणे नमूद केले. मानवी हित आणि शाश्वत पर्यावरणीय जीवनपद्धतीसाठी आपण महासागरीय अवकाशाचा जागतिक सामायिक प्रदेश म्हणून आदर केला पाहिजे,  यावर त्यांनी भर दिला. 

'सागर' [‘SAGAR’ (Security and Growth of All in Region)] हे भारताचे धोरण, शाश्वत विकासाची ध्येय उद्दीष्टे आणि 'सागरी प्रदेशातले नियमाधारीत सत्तासमीकरण या गोष्टी, भारत प्रशांत क्षेत्रातल्या, भारताच्या सर्वसमावेशक विकास आणि दीर्घकालीन सहकार्याच्या धोरणाला पूरक गोष्टी असल्याचे सिंह यांनी यावेळी नमूद केले.

सागरी सुरक्षा आणि सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी तटरक्षक दलाच्या यंत्रणांनी बजावलेल्या भूमिकेचंही सिंह यांनी यावेळी कौतुक केलं. सागरी देखरेख आणि  कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या संस्था म्हणून तटरक्षक दलाच्या यंत्रणांनी एक विशिष्ट क्षमता आणि कार्यप्रणाली विकसित केली असल्याचं त्यांनी सांगितलं.

आशियातील  तटरक्षक यंत्रणांच्या प्रमुखांच्या (HACGAM) या 18 व्या बैठकीचं यजमानपद भारतीय तटरक्षक दल (ICG) भूषवत आहे. आशियातील  तटरक्षक यंत्रणांच्या प्रमुखांचे (HACGAM) सचिवालय या बैठकीचे संयुक्त आयोजक आहेत. काल 14 ऑक्टोबरपासून सुरु झालेली ही बैठक येत्या 18 ऑक्टोबर 2022 पर्यंत सुरु राहील. या बैठकीत 18 देश आणि समुद्री चाचेगिरीविरुद्ध कारवाई करणारी  रिजनल को ऑपरेशन अॅग्रीमेटं ऑन कॉम्बॅटिंग पायरसी अँड आर्मड रॉबरी अगेंस्ट शिप्स इन एशिया इनफॉरमेशन शेअरींग सेंटर  (ReCAAP ISC) तसेच युनायटेड नेशन्स ऑफिस ऑन ड्रग्स अँड क्राइम- ग्लोबल मेरीटाईम क्राईम प्रोग्राम (UNODC-GMCP) या दोन आंतरराष्ट्रीय संघटनांचे मिळून एकूण 55 प्रतिनिधी सहभागी झाले आहेत. चार दिवसांच्या या बैठकीत सागरी पर्यावरण संरक्षण, सागरी शोध आणि बचाव तसेच सागरी कायद्याची अंमलबजावणी या संबंधातील महत्वाचे विषय आणि संबंधीत समस्यांवर कार्यस्तरीय चर्चा आणि विचारविनिमय होणार आहे. आशियातील  तटरक्षक यंत्रणांच्या प्रमुखांचा (HACGAM) हा गट म्हणजे 23 देशांचे बहुआयामी व्यासपीठ आहे. या गटात भारतासह ऑस्ट्रेलिया, बहरीन, बांगलादेश, ब्रुनेई, कंबोडिया, चीन, फ्रान्स, इंडोनेशिया, जपान, दक्षिण कोरिया, लाओ पीडीआर, मलेशिया, मालदीव, म्यानमार, पाकिस्तान, फिलिपिन्स, सिंगापूर, श्रीलंका, थायलंड, तुर्की, व्हिएतनाम आणि हाँगकाँग (चीनमधील प्रदेश)  या २३ देशांचा समावेश आहे.


* * *

S.Patil/T.Pawar/D.Rane

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1868157) Visitor Counter : 195


Read this release in: English , Urdu , Hindi , Tamil