रेल्वे मंत्रालय
आर्थिक वर्ष 2021-22 साठी रेल्वे कर्मचाऱ्यांना 78 दिवसांचा उत्पादनाशी निगडीत बोनस देण्यास केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी
Posted On:
12 OCT 2022 5:22PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 12 ऑक्टोबर 2022
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळाने आज आर्थिक वर्ष 2021-22 साठी रेल्वे कर्मचाऱ्यांना 78 दिवसांचा पीएलबी म्हणजेच उत्पादनाशी निगडीत बोनस देण्यासाठी कार्योत्तर मंजुरी दिली.
दर वर्षी दसरा पूजेच्या सुट्ट्यांच्या आधीच पात्र रेल्वे कर्मचाऱ्यांना बोनस देण्यात येतो. यावर्षी देखील रेल्वेच्या सुमारे 11 लाख 27 हजार अराजपत्रित कर्मचाऱ्यांना 78 दिवसांच्या वेतनाइतकी बोनसची रक्कम अदा करण्यात आली आहे.पात्र रेल्वे कर्मचाऱ्याला देण्यात येणारी 78 दिवसांसाठीची सर्वाधिक रक्कम 17,951रुपये इतकी आहे. ही रक्कम रेल्वेमार्गाचे देखभाल कर्मचारी, चालक आणि गार्ड, स्टेशन मास्तर, पर्यवेक्षक, तंत्रज्ञ, तंत्रज्ञ सहाय्यक, नियंत्रक, पॉईंट्समन अशा विविध श्रेणीतील कर्मचारी, मंत्रालयीन कर्मचारीवर्ग तसेच ‘क’ गटातील इतर कर्मचाऱ्यांना देण्यात आली आहे.
रेल्वे कर्मचाऱ्यांना देण्यात आलेली 78 दिवसांच्या बोनसची अंदाजित रक्कम सुमारे 1832.09 कोटी रुपये इतकी आहे. कोविड-19 नंतर उद्भवलेल्या विपरीत आर्थिक परिस्थितीत देखील बोनस देण्याचा निर्णय घेण्यात आला.
विशिष्ट सूत्रांच्या आधारावर मोजण्यात आलेल्या दिवसांपेक्षा बोनस म्हणून घोषणा केलेले दिवस प्रत्यक्षात जास्त असतात.रेल्वेच्या कामगिरीत अधिकाधिक सुधारणा करण्यासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांना प्रेरणा मिळावी यासाठी बोनसची रक्कम प्रोत्साहन म्हणून देण्यात येते.
S.Kane/S.Chitnis/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1867120)
Visitor Counter : 168