महिला आणि बालविकास मंत्रालय
आंतरराष्ट्रीय बालिका दिनानिमित्त, केंद्रीय मंत्री स्मृती झुबीन इराणी यांनी मुलींसाठी कौशल्य विकास, सशक्तीकरण आणि अपारंपरिक उपजीविका तसेच सरकारची विविध मंत्रालये आणि विभागांचे केंद्रीकरण यावर भर दिला
Posted On:
11 OCT 2022 8:37PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 11 ऑक्टोबर 2022
केंद्रीय कौशल्य विकास आणि उद्योजकता तसेच केंद्रीय अल्पसंख्याक मंत्रालयाच्या सहभागासह केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्रालयाने आज नवी दिल्ली येथे आंतरराष्ट्रीय बालिका दिनानिमित्त देशभरातील किशोरींसाठी “बेटियाँ बने कुशल” या अपारंपरिक उपजीविकेबाबतच्या आंतरमंत्रालयीन परिषदेचे आयोजन केले.
या कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी म्हणून केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्री स्मृती झुबीन इराणी उपस्थित होत्या.
उपस्थितांना संबोधित करताना, केंद्रीय मंत्री स्मृती झुबीन इराणी म्हणाल्या की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वर्ष 2015 मध्ये ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ अभियानाची सुरुवात केली. मुलींना दर्जेदार शिक्षण तसेच समान संधी देऊन त्यांचे सशक्तीकरण करण्यासाठी विविध मंत्रालयांनी समन्वय साधून काम करण्यावर त्यांनी भर दिला. ज्या देशातील मुली आणि महिला यांचे सशक्तीकरण केले जात नाही तो देश प्रगती करू शकत नाही असे त्यांनी सांगितले. सरकारने नेहमीच लिंगआधारित ठराविक साचेबद्ध विचार सोडून देऊन आपल्या आवडीच्या क्षेत्रात व्यावसायिक शिक्षण घेण्यासाठी मुलींना प्रोत्साहन दिले आहे आणि त्यांना सक्षम केले आहे अशी माहिती त्यांनी दिली.
बालविवाह, लिंग आधारित भेदभाव तसेच आर्थिक अडचणींवर मात करत एनटीएल म्हणजेच अपारंपरिक उपजीविका क्षेत्रात उत्तम कामगिरी करून दाखविणाऱ्या काही किशोरींचा गट आणि केंद्रीय मंत्री स्मृती झुबीन इराणी यांच्यातील संवाद हा या कार्यक्रमाचा परमोच्च आकर्षणबिंदू ठरला. या चर्चेदरम्यान, केंद्रीय मंत्री स्मृती झुबीन इराणी यांनी सांगितले की महिला आणि बालविकास मंत्रालय मुलींना शालेय शिक्षणानंतर योग्य शैक्षणिक अभ्यासक्रम निवडण्यासाठी सल्ला सेवा सुरु करण्यासाठी तसेच बाल सुविधा संस्थांमध्ये असलेल्या मुलींना आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र तसेच सक्षम होणे सोपे व्हावे यासाठी त्यांना कौशल्य विकास संच उपलब्ध करून देण्यासाठी देखील प्रयत्न करेल.
देशभरातील प्रेक्षकांसाठी “बेटियाँ बने कुशल”या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण करण्यात आले. कार्यक्रमात सुरुवातीला अपारंपरिक उपजीविका कौशल्यांची ओळख आणि सरकारने मुलींच्या कौशल्य विकासासाठी हाती घेतलेल्या उपक्रमांची माहिती देण्यात आली. अभिनव संशोधन, उद्योजकता, एसटीइएम शिक्षण, नागरी नेतृत्व आणि आर्थिक साक्षरता या घटकांचे विवेचन करणाऱ्या चित्रपटाचे यावेळी सादरीकरण करण्यात आले. एनटीएलमध्ये सहभागी होताना मुलींवर प्रभाव टाकणारे महत्त्वाचे घटक तसेच एनटीएलमध्ये मुलींचा दीर्घकालीन सहभाग आणि सातत्य सुनिश्चित करण्याचे मार्ग यांवर या कार्यक्रमात भर देण्यात आला.
किशोरवयीनांच्या कौशल्य विकासाच्या सर्वोत्तम पद्धतींची माहिती यावेळी देण्यात आली. खासगी क्षेत्र आणि नागरी समाज यांच्या प्रतिनिधींनी एनटीएलमध्ये मुली तसेच महिलांच्या शाश्वत समावेशासंदर्भातील अनेक उदाहरणांचे सादरीकरण केले.
S.Patil/S.Chitnis/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1866921)
Visitor Counter : 191