ऊर्जा मंत्रालय
लाईफ मिशन अंतर्गत अग्नी तत्व मोहिमेच्या पहिल्या संमेलनाचे लेह मध्ये आयोजन
Posted On:
08 OCT 2022 4:55PM by PIB Mumbai
पॉवर फाऊंडेशन ऑफ इंडिया आणि विज्ञान भारती (VIBHA) यांच्या संयुक्त विद्यमाने सध्या ‘लाइफ - पर्यावरणरक्षणासाठी जीवनशैली कार्यक्रमांतर्गत जागरूकता निर्माण करण्यासाठी अग्नी तत्व मोहीम सुरु आहे.
यातील "शाश्वतता आणि संस्कृती" या संकल्पनेवर आधारित पहिली अग्नी मोहीम काल लेह येथे आयोजित करण्यात आली होती. यामध्ये प्रशासन, धोरणकर्ते, शैक्षणिक आणि स्टार्ट-अप सारख्या विविध क्षेत्रात कार्य करणारे ऊर्जा, संस्कृती आणि शाश्वतता या मुख्य क्षेत्रातले प्रतिनिधी सहभागी झाले होते.
लडाखचे नायब राज्यपाल आर के माथूर यांच्या हस्ते या परिषदेचे उद्घाटन झाले. लडाख मध्ये नेहमीच शाश्वत जीवनशैलीचा अंगीकार केला गेला आहे, मात्र वाढत्या आधुनिकतेच्या प्रवाहात या क्षेत्रातील परिसंस्थेमध्ये असंतुलन निर्माण होत आहे, आणि याचा दुष्परिणाम केवळ या क्षेत्रापुरता मर्यादित नसून त्याचा प्रभाव संपूर्ण देशाच्या ऋतुचक्रावर होऊ शकतो कारण हे सर्व हिमालयातील परिसंस्थेशी संलग्न आहे, असे माथूर यांनी सांगितले. हे दुष्परिणाम आणि असंतुलन नाहीसे करावेत या उद्देशाने केंद्रशासित प्रदेश प्रशासनाने एक पथदर्शी आराखडा विकसित केला असून शाश्वत विकासाकडे वाटचाल सुरु आहे, असे त्यांनी सांगितले. तसेच त्या दृष्टीने अनेक संबंधित क्षेत्रांवर भर दिला.
लडाख कडे सौर ऊर्जेची प्रचंड क्षमता असून त्याचा पुरेपूर वापर करणे आवश्यक आहे. लडाखने दुर्गम भागात वीज पुरवण्यासाठी वीजनिर्मिती यंत्रणा स्थापन करण्याच्या दिशेने आणि ग्रिड वर असलेले अवलंबित्व कमी करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत . हे पंतप्रधानांच्या कार्बन न्यूट्रल लडाखच्या संकल्पनेशी सुसंगत आहे.
भू-औष्णिक ऊर्जा हे आणखी एक प्राधान्याचे क्षेत्र असून लडाख मध्ये यासंदर्भात अफाट क्षमता आहे. इतर प्रकारच्या अक्षय ऊर्जांचा पुरवठा खंडितपणे होत असला तरी भू-औष्णिक ऊर्जा दिवसभर आणि वर्षभर उपलब्ध असते, जी योग्य रित्या वापरणे आवश्यक आहे.
हरित हायड्रोजन हा लडाखमधील दुसरा पर्याय आहे, कारण या प्रदेशात भरपूर सौरऊर्जा आहे. तसेच पाणीही मुबलक प्रमाणात आहे. यातून निर्माण झालेल्या हायड्रोजनचा उपयोग पेट्रोल आणि डिझेलला पर्याय म्हणून आणि ऑक्सिजनचा वापर रूग्णालयात आणि पर्यटकांद्वारे केला जाऊ शकतो.
सुमंगलमच्या छत्र मोहिमेअंतर्गत असलेला एक उपक्रम 'अग्नि तत्व मोहीम - एनर्जी फॉर लाइफ', केंद्रीय ऊर्जा ,नवीन आणि नवीकरणीय ऊर्जामंत्री आर के सिंह यांच्या हस्ते 21 सप्टेंबर 2022 रोजी नवी दिल्ली इथे सुरू करण्यात आला. याअंतर्गत देशभरात संमेलनांची मालिका आयोजित करण्यात आली आहे.
पॉवर फाउंडेशन ऑफ इंडिया ही भारत सरकारच्या उर्जा मंत्रालयाच्या अधिपत्याखाली स्थापन केलेली आणि आघाडीच्या केंद्रीय सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम (CPSEs) द्वारे समर्थित एक संस्था आहे. हे प्रतिष्ठान ऊर्जा परिक्षेत्रातील संशोधन आणि सल्ला या क्षेत्रात कार्यरत आहे.
***
S.Patil/B.Sontakke/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1866077)
Visitor Counter : 212