आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
आरोग्य आणि उर्जाविषयक उच्च-स्तरीय आघाडीच्या दुसऱ्या बैठकीला केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री, डॉ. भारती प्रवीण पवार यांनी केले संबोधित
"3.5 मेगावॅटच्या एकूण सौर क्षमतेसह देशातील 75% आरोग्य केंद्रांचे विद्युतीकरण"
"हरित आणि हवामानाशी सुसंगत आरोग्य सेवा सुविधांना" प्रोत्साहन देण्यासाठी भारत वचनबद्ध - डॉ भारती प्रवीण पवार
Posted On:
07 OCT 2022 9:14PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 7 ऑक्टोबर 2022
आरोग्य आणि ऊर्जा क्षेत्रावर आधारित उच्च-स्तरीय आघाडीच्या दुसर्या बैठकीत आज केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री, डॉ. भारती प्रवीण पवार यांनी निर्माण भवनातून दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून सहभागी होत, मुख्य ठळक मुद्यांवर चर्चा केली आणि प्राधान्य कृती सत्राला संबोधित केले. आरोग्य आणि ऊर्जा क्षेत्रांमधील सहकार्य बळकट करणे, राजकीय निर्णयांची गती वाढवणे, गुंतवणुकीला चालना देणे, लोकांचा पाठिंबा मिळवणे आणि व्यावहारिक उपाय शोधण्याच्या उद्दिष्टांसह, 2019 मध्ये जागतिक आरोग्य संघटनेच्या महासंचालकांनी आरोग्य आणि ऊर्जा क्षेत्रासंदर्भात उच्च-स्तरीय आघाडीची बैठक बोलावली होती.
आरोग्य आणि ऊर्जा क्षेत्रांमधील सहकार्य बळकट करण्यासाठी प्रमुख प्राधान्यक्रमाच्या कृतींवर प्रकाश टाकल्याबद्दल आणि चर्चेसाठी उपस्थित राहिल्याबद्दल जागतिक आरोग्य संघटनेच्या महासंचालकांचे आभार मानत,डॉ. भारती पवार यांनी उच्च-स्तरीय आघाडीची किंवा आरोग्य आणि ऊर्जा कृती मंचाची दुसरी बैठक आयोजित करण्यासाठी घेतलेल्या प्रयत्नांचीही प्रशंसा केली. देशांमध्ये स्वच्छता राखत स्वयंपाक करण्याला गती देण्यासाठी आणि आरोग्य सुविधांचे विद्युतीकरण सुधारणे यांसारख्या महत्वाच्या क्षेत्रांमध्ये ठोस कृतींसह अधिक कृतीशील चर्चेची आवश्यकता आहे, यावर भारताचा ठाम विश्वास आहे'' असे त्यांनी या बैठकीत नमूद केले.
2030 पर्यंत 450 गिगावॅट नवीकरणीय ऊर्जा निर्मितीचा भारत सरकारचा दृष्टीकोन अधोरेखित करत ,आरोग्य-संबंधित धोरणे आणि ऊर्जा-संबंधित धोरणे एकत्र करून सन 2022 पर्यंत 175 गिगावॅट नवीकरणीय ऊर्जा क्षमता स्थापित करण्याच्या उद्दिष्टासह आरोग्य केंद्राच्या विद्युतीकरणाकडे भारताची निरंतर वाटचाल सुरु आहे .", असे त्यांनी सांगितले. "आम्ही आमच्या राष्ट्रीय निर्धारीत योगदानामध्ये (एनडीसी) जे वचन दिले होते त्यापेक्षा भारत यापूर्वीच पुढे निघून गेला आहे "असे सांगत आधीपासूनच आमच्या स्थापित ऊर्जा क्षमतेपैकी 39% ऊर्जा बिगर-जीवाश्म आधारित स्रोतांकडून प्राप्त होते आणि 2022 पर्यंत आम्ही आमचे 40% उद्दिष्ट गाठू",असे त्या म्हणाल्या. भारताने देखील उर्जा संवर्धन कायदा 2001च्या एकूण परिघात विविध अभिनव उपक्रमांच्या माध्यमातून उर्जेचा कार्यक्षम वापर करण्यासाठी नूतनीकरणीय उर्जा कार्यक्रम तसेच उर्जा कार्यक्षमता कार्यक्रम यांचा विस्तार केला आहे अशी माहिती केंद्रीय आरोग्य राज्यमंत्र्यांनी दिली.
विविध पातळ्यांवर हाती घेण्यात आलेल्या उपाययोजनांचे महत्त्व अधोरेखित करत, डॉ.भारती प्रवीण पवार म्हणाल्या की भारताने वर्ष 2030 पर्यंत 99.99% घरांमध्ये वीज जोडणी उपलब्ध करून देऊन परवडणाऱ्या दरात, विश्वसनीय पद्धतीने आणि आधुनिक प्रकारच्या उर्जाविषयक सेवा सार्वत्रिक पद्धतीने पुरविण्याची व्यवस्था करण्याचे शाश्वत विकास ध्येयांमधील लक्ष्य 7.1 साध्य केले आहे. तसेच देशभरातील 95% जिल्हा रुग्णालये आणि सुमारे 90% उप-विभागीय रुग्णालये यांना थ्री फेज वीज पुरविण्यासाठी यशस्वीपणे विद्युतीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. समग्रपणे, देशातील सुमारे 75% आरोग्य केंद्रांना 3.5 मेगावॉट सौर क्षमतेच्या वीज जोडण्या देण्यात आल्या आहेत असे त्यांनी यावेळी सांगितले.
केंद्रीय राज्यमंत्री पुढे म्हणाल्या की “हरित आणि हवामान बदलाबाबत लवचिकता असणाऱ्या आरोग्य सुविधां”च्या संदर्भात, भारताने, माले जाहीरनाम्यावर स्वाक्षऱ्या केल्या असून कोणत्याही प्रकारच्या हवामानविषयक आपत्तीला तोंड देण्यास समर्थ असणाऱ्या हवामान बदलाप्रति लवचिक आरोग्य सुविधांना प्रोत्साहन देण्याबाबत आणि अशा प्रकारच्या आपत्तींच्या वेळी पाणीपुरवठा, स्वच्छता, कचरा व्यवस्थापन आणि वीज पुरवठा यांसारख्या अत्यावश्यक सेवा सुरु राहतील याची सुनिश्चिती करण्याबाबत संमती दर्शविली आहे.
यावेळी बोलताना केंद्रीय राज्यमंत्र्यांनी या विषयासंदर्भात स्फूर्तीदायक भागीदारी विकसित करण्यावर तसेच अशाच प्रकारच्या इतर अभियानांसोबत समन्वय निर्माण करण्यावर आणि जागतिक पातळीवर हवामान बदलासंदर्भातील कार्यक्रमांमध्ये आरोग्य या विषयाला पुरेसे प्रतिनिधित्व मिळेल याची सुनिश्चिती करण्यावर अधिक भर दिला. त्या म्हणाल्या की, या आघाडी गटाचे असे सहकारी संबंध आणि सामूहिकपणे केलेले कार्य यामुळे स्वच्छ तसेच हरित उर्जेच्या वापरातून अधिक हरित वसुंधरेचे उद्दिष्ट पूर्ण करता येईल.
जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक डॉ. टेड्रोस घेब्रेयेसस, संघटनेचे सहाय्यक महासंचालक डॉ.नाओको यामामोटो, संघटनेतील पर्यावरण, हवामान आणि आरोग्य विभागाच्या संचालक डॉ.मारिया नेईरा आणि संसद सदस्य डॉ.कांदेह युमकेला, सीएरा लिओन यांच्यासह इतर मान्यवर देखील या बैठकीला उपस्थित होते.
* * *
S.Patil/S.Chavan/S.Chitnis/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1865948)
Visitor Counter : 171