संरक्षण मंत्रालय

संरक्षण क्षेत्राशी संबंधित सार्वजनिक क्षेत्रातील उद्योगांनी 72 प्रकारच्या संरक्षण सामग्रीची स्वदेशी निर्मिती करण्याचे काम त्यांच्या मूळ कालमर्यादेच्या आत पूर्ण केले

Posted On: 07 OCT 2022 8:46PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 7 ऑक्‍टोबर 2022

 

आत्मनिर्भर भारत साकारण्याचे कार्य अधिक जलदगतीने करण्याच्या उद्देशाने, संरक्षण क्षेत्राशी संबंधित सार्वजनिक क्षेत्रातील उद्योगांना देण्यात आलेल्या पहिल्या तसेच दुसऱ्या निश्चित स्वदेशीकरण यादीतील एकूण 214 प्रकारच्या संरक्षण सामग्रीपैकी 72 प्रकारच्या सामग्रीची स्वदेशी निर्मिती करण्याचे काम त्यांना नेमून दिलेल्या डिसेंबर 2023, डिसेंबर 2024 आणि डिसेंबर 2025 या मूळ स्वदेशीकरण कालमर्यादेच्या कितीतरी आधी पूर्ण करण्यात यश आले आहे. उर्वरित 142 प्रकारच्या सामग्रीचे स्वदेशी बनावटीचे उत्पादन करण्याचे काम डिसेंबर 2022 या कालमर्यादेच्या आत पूर्ण करण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. स्वदेशी पद्धतीने निर्मिती सुरु करण्यात आलेल्या प्रमुख उप-यंत्रणा/ लाईन रिप्लेसमेंट युनिट्स सामग्रीमध्ये जहाजांसाठी मॅगेझीन अग्निशमन यंत्रणा, लढाऊ जहाजांसाठी दिशादर्शक गियर यंत्रणा आणि नियंत्रणासह फिन स्टॅबिलायझर, आकाश क्षेपणास्त्रासाठी प्रेशराईज्ड कंटेनर्स, कोन्कर्स क्षेपणास्त्रा करिता केओईचार्ज तसेच लढाऊ रणगाड्यांसाठी इलेक्ट्रिक मोटरसाठी, डीकंटॅमिनेशन सेट आणि प्रिझम ऑप्टिकल साधने यांचा समावेश आहे.        

या सामग्रीखेरीज महत्त्वाच्या इतर स्वदेशी साहित्यामध्ये हेलिकॉप्टरसाठी इंटरमिजिएट कास्टिंग, पाणबुड्यांसाठी पॉलीक्लोरोप्रीन रबर बँड आणि जहाजांसाठी लागणाऱ्या उच्च दाब नियंत्रण व्हाल्वचा समावेश आहे. स्वदेशी पद्धतीने निर्मिती होऊ लागलेल्या सर्व संरक्षण सामग्रीचे तपशील srijandefence.gov.in  या श्रीजन पोर्टलवर उपलब्ध आहेत.

संरक्षण दलांना आवश्यक असणाऱ्या साहित्याची निर्मिती करण्यात स्वावलंबी होण्याच्या उद्देशाने तसेच ‘आत्मनिर्भर भारत अभियाना’अंतर्गत संरक्षण क्षेत्राशी संबंधित सार्वजनिक क्षेत्रातील उद्योगांकडून होणाऱ्या आयातीचे प्रमाण किमान असेल अशी व्यवस्था करण्यासाठी केंद्रीय संरक्षण मंत्रालयाच्या अखत्यारीतील संरक्षण सामग्री उत्पादन विभागाने डिसेंबर 2021, मार्च 2022 आणि ऑगस्ट 2022  मध्ये स्वदेशी पद्धतीने निर्मिती करण्याचे उद्दिष्ट असलेल्या सामग्रीच्या अनुक्रमे तीन याद्या अधिसूचित केल्या होत्या. स्वदेशी पद्धतीने सामग्री निर्मितीसाठी त्याचवेळी कालमर्यादा देखील निश्चित करण्यात आल्या होत्या. स्वदेशी पद्धतीने निर्मितीसाठी पहिल्या यादीत 351 प्रकारची सामग्री, दुसऱ्या यादीत 107 प्रकारची सामग्री तर तिसऱ्या यादीत 780 प्रकारची सामग्री समाविष्ट करण्यात आली आहे. 

त्यानंतर, संरक्षण सामग्री उत्पादन विभागाने पहिल्या यादीतील 67 आणि दुसऱ्या यादीतील 5 अश्या एकूण 72 प्रकारच्या सामग्रीच्या स्वदेशी निर्मितीसाठी सुधारित कालमर्यादा अधिसूचित केली आहे. आता, या सामग्रीचे उत्पादन केवळ भारतीय उद्योगांतर्फे केले जाईल आणि त्यातून एमएसएमई उद्योगांसह देशांतर्गत उत्पादन उद्योगांना मोठी चालना मिळेल तसेच परदेशी चलनाची देखील बचत होईल. या कामगिरीमुळे, संरक्षण दलांची मागणी पूर्ण करण्यासाठी आंतरराष्ट्रीय दर्जाच्या संरक्षण सामग्रीचा पुरवठा करण्याच्या देशांतर्गत उद्योगांच्या क्षमतेवरील  सरकारचा वाढता विश्वास अधिक दृढ होत आहे.

 

* * *

S.Patil/S.Chitnis/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai(Release ID: 1865941) Visitor Counter : 207


Read this release in: English , Urdu , Hindi