वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
भारताच्या विकासाच्या प्रवासात कृत्रिम बुद्धिमत्ता सहाय्यक म्हणून काम करेल आणि 2047 पर्यंत विकसित देश बनण्याचे उद्दिष्ट साध्य करण्यात मदत करेल: केंद्रीय मंत्री पीयूष गोयल
तिसऱ्या जागतिक कृत्रिम बुद्धिमत्ता शिखर परिषद आणि पुरस्कार समारंभाला गोयल यांनी केले संबोधित
Posted On:
07 OCT 2022 6:27PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 7 ऑक्टोबर 2022
15 ऑगस्ट 2022 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या स्वातंत्र्यदिनाच्या भाषणात सांगिल्यानुसार , भारताची 2047 पर्यंत विकसित देश बनण्याची खरोखरच आकांक्षा असेल, तर कृत्रिम बुद्धिमत्ता देशाला त्या उद्दिष्टापर्यंत पोहोचण्यास आणि या देशातील प्रत्येक नागरिकाला समृद्ध करण्यासाठी मदत करेल असे केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग, ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण आणि वस्त्रोद्योग मंत्री पियूष गोयल यांनी सांगितले.तिसऱ्या जागतिक कृत्रिम बुद्धिमत्ता शिखर परिषद आणि पुरस्कार समारंभात ते आज बोलत होते.

"कोणताही समाज जो नवनिर्मिती करत नाही, त्याचा विकास ठप्प होतो'' या पंतप्रधान मोदी यांच्या विधानाचा दाखला देत, गोयल यांनी सांगितले की , कृत्रिम बुद्धिमत्ता भारताच्या विकासाच्या प्रवासात खऱ्या अर्थाने सहाय्यक ठरेल. ‘ मेक इन इंडिया’ कार्यक्रम जेव्हा कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाशी जोडला जाईल तेव्हा भारत जगाला उपकरणे आणि तंत्रज्ञान दोन्ही प्रदान करणारा जागतिक कारखाना बनेल, असे त्यांनी सांगितले. देशात उपलब्ध प्रचंड प्रतिभा या आर्थिक उपक्रमांच्या प्रत्येक क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्ता वापरण्याचे नवीन मार्ग शोधण्यात नक्कीच मदत करेल, हे त्यांनी नमूद केले. देशाच्या वैज्ञानिक समुदायाच्या प्रयत्नांना आणि विशेषत: कोविडच्या आव्हानात्मक काळात पाठबळ देण्यासाठी केलेल्या अभूतपूर्व कार्याबद्दल मंत्र्यांनी विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाची प्रशंसा केली.

तिसरी कृत्रिम बुद्धिमत्ता शिखर परिषद ऑल इंडिया कौन्सिल फॉर रोबोटिक्स अँड ऑटोमेशनद्वारे आयोजित करण्यात आली असून आणि सरकारच्या भागीदारीतून संरक्षण, आरोग्यसेवा, कृषी, स्मार्टसिटी, परिवहन आणि शिक्षण या क्षेत्रांवर यामध्ये लक्ष केंद्रित केले जात आहे. समाजाच्या फायद्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता कार्यक्षेत्र आणि स्टार्टअप्सचा वापर कशाप्रकारे करायचा याचा मार्गदर्शक आराखडा विकसित करणे हा यामागचा उद्देश आहे. विविध भागधारक कार्यरत असलेल्या क्षेत्रांमध्ये मर्यादित असलेली व्यवस्था मोडीत काढण्यासाठी तसेच आपल्या समाजातील प्रमुख क्षेत्रांसाठी तांत्रिक उपाय शोधण्यासाठी तिसर्या वार्षिक परिषदेने बहुविद्याशाखीय गट स्थापन केले आहेत.
* * *
S.Patil/S.Chavan/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1865894)