गृह मंत्रालय
केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांच्या हस्ते आज श्रीनगरमध्ये सुमारे 2,000 कोटी रुपये खर्चाच्या 240 विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी
Posted On:
05 OCT 2022 9:10PM by PIB Mumbai
केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी आज श्रीनगरमध्ये सुमारे 2,000 कोटी रुपये खर्चाच्या 240 विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी केली. अमित शहा यांनी बारामुल्ला, जम्मू आणि काश्मीरमधल्या कोट्यवधी रुपये खर्चाच्या विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी केली तसेच जाहीर सभेलाही संबोधित केले. यावेळी जम्मू आणि काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा आणि केंद्रीय मंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
आपल्या भाषणात केंद्रीय गृहमंत्री म्हणाले की पीर पंजाल आणि चिनाबचा डोंगराळ परिसर आणि काश्मीर खोऱ्यातील हा प्रदेश जगातील सर्वात सुंदर भागांपैकी एक आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे जम्मू-काश्मीरमध्ये सुरु झालेला विकास या भागातील लोकांच्या आनंदी चेहऱ्यांवर स्पष्टपणे दिसून येतो. ते म्हणाले की यापूर्वी या प्रदेशावर राज्य करणाऱ्या तीन घराण्यांनी या प्रदेशाच्या विकासासाठी क्वचितच काम केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जम्मू-काश्मीरच्या प्रत्येक गावात लोकशाही पोहोचेल, हे सुनिश्चित करण्याचे मोठे काम पूर्ण केले आहे. यापूर्वी काश्मीरमध्ये लोकशाहीचा अर्थ तीन कुटुंबे, 87 आमदार आणि 6 खासदारांपुरताच मर्यादित होता. मात्र 5 ऑगस्ट 2019 नंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गावातील पंच, सरपंच, बीडीसी आणि जिल्हा परिषद स्तरापर्यंत लोकशाही पोहोचवून 30 हजार लोकांना लोकशाहीशी जोडले आहे. यापूर्वी भ्रष्टाचारामुळे गरीबांच्या पैशाचा गैरवापर केला जात होता, मात्र आता पंतप्रधान नरेंद्र मोदी गरीबांचा पैसा गरीबांपर्यंत पोहोचेल, याकडे लक्ष देत आहेत. तीन कुटुंबांच्या राजवटीत जम्मू-काश्मीरमध्ये 70 वर्षांत केवळ 15,000 कोटी रुपयांची गुंतवणूक आली, तर पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली केवळ तीन वर्षांत 56,000 कोटी रुपयांची गुंतवणूक आली आहे. अमित शाह पुढे म्हणाले की पूर्वी हा प्रदेश दहशतवाद्यांचा केंद्रबिंदू होता, मात्र आता तो पर्यटकांचा केंद्रबिंदू झाला आहे. यापूर्वी, दरवर्षी जास्तीत जास्त सहा लाख पर्यटक काश्मीर खोऱ्याला भेट देत असत, मात्र या वर्षी आतापर्यंत 22 लाख पर्यटकांनी या प्रदेशाला भेट दिली आहे, ज्यामुळे हजारो तरुणांना रोजगार मिळाला आहे आणि ही प्रक्रिया आणखी बळकट केली जाईल.
अमित शहा म्हणाले की खोऱ्यातील तरुणांच्या हातात पूर्वी दगड आणि बंदुका दिल्या जात होत्या, मात्र आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्याऐवजी मोबाईल आणि लॅपटॉप दिले आणि प्रदेशात उद्योग उभारून तरुणांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे. दहशतवादामुळे जगात कोणतीही चांगली गोष्ट झाली नाही. 1990 पासून आजपर्यंत जम्मू-काश्मीरमधील 42,000 लोक दहशतवादाला बळी पडले आहेत, असे सांगत ते म्हणाले की आता दहशतवाद हळूहळू नष्ट होत आहे. आता काश्मीरमधील प्रत्येक गावात वीज पोहोचली आहे आणि पंतप्रधान मोदींनी पाच लाख रुपयांपर्यंतचे संपूर्ण मोफत उपचार सुनिश्चित केले आहेत. 77 लाख लोकांना त्यांच्या उपचारासाठी एक पैसाही खर्च करावा लागू नये, म्हणून त्यांना आरोग्य कार्ड देण्यात आले आहे. यापूर्वी या प्रदेशात बर्फाळ वाऱ्यातही पक्के घर नसलेले एक लाख लोक राहत होते, मात्र पंतप्रधान मोदींनी 2014 ते 2022 या काळात जम्मू-काश्मीरमध्ये या लोकांना घरे उपलब्ध करून दिली आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने सुमारे 12 लाख कुटुंबांना गॅस सिलिंडर उपलब्ध करून दिले आहेत. जल जीवन मिशन अंतर्गत 58% लोकांच्या घरात नळाद्वारे पाणी आले आहे आणि सुमारे 11.87 लाख शेतकर्यांच्या खात्यात वार्षिक 6,000 रुपये जमा होत आहेत.
केंद्रीय गृहमंत्री म्हणाले की पंतप्रधानांना बारामुल्ला येथील गुज्जर, बकरवाल आणि पहाडी लोकांपर्यंत तसेच काश्मीरमधील तरुणांपर्यंत पोहोचायचे आहे. काश्मीरच्या जनतेने खुल्या मनाने विचार केला पाहिजे की या प्रदेशात दहशत पसरवणाऱ्या लोकांनी त्यांच्या भल्यासाठी कधीही चांगले काम केलेले नाही. काश्मीरने आता देशातील इतर सर्व राज्यांसोबत पुढे जाणे गरजेचे आहे, असे शहा म्हणाले. आपण दहशतवादाच्या मार्गाने न जाता विकासाच्या मार्गाने गेले पाहिजे, असेही ते म्हणाले. काश्मीरमधील तरुणांनी देशाच्या विकासात योगदान द्यावे, त्यांनी स्वतःला शिक्षित करून नोकऱ्या मिळाव्यात आणि उद्योगांशी जोडले जाऊन देशाच्या विकासात हातभार लावावा, हा पंतप्रधान नरेंद्र मोदींचा संकल्प आहे, असे त्यांनी सांगितले. शहा यांनी दोन मॉडेल्सचा उल्लेख केला. त्यापैकी एक म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विकास, शांतता, सौहार्द आणि रोजगाराचे मॉडेल आणि दुसरे मॉडेल, जे पुलवामा हल्ल्यासारख्या घटनांना कारणीभूत ठरते. पंतप्रधान मोदींनी पुलवामा येथे 2,000 कोटी रुपये खर्चून रुग्णालय बांधले आहे. दुसऱ्या मॉडेलमध्ये दगड आणि मशीन गन आणि तरुणांसाठी बंद असलेली महाविद्यालये आहेत, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मॉडेलमध्ये आयआयएम आणि आयआयटी अशा तरुणांना घडवणाऱ्या संस्था आहेत, असे ते म्हणाले. युवकांनी हाताने दगड न उचलता शिक्षणाकडे वळले पाहिजे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी युवकांच्या हातातून दगड काढून घेऊन त्यांना स्वतःला शिक्षित करण्याची प्रेरणा दिली आहे, असे शहा म्हणाले.
सरकारने काश्मीरमध्ये राजकीय प्रक्रिया सुरू केली असल्याचे त्यांनी सांगितले. निवडणूक आयोगाचे मतदार याद्या तयार करण्याचे काम पूर्ण होताच काश्मीरमधील लोकांसाठी संपूर्ण पारदर्शकतेने निवडणुका घेतल्या जातील, असे आश्वासन त्यांनी जनतेला दिले. लोकांनी निवडून दिलेले प्रतिनिधी या प्रदेशात राज्य करतील, असे ते म्हणाले. यापूर्वी केवळ तीन घराण्यातील लोकांना फायदा व्हावा यासाठी परिसीमन केले जात होते, मात्र आता परिसीमन झाल्यामुळे लोकप्रतिनिधी जिंकतील आणि तेच राज्य करतील, असे ते म्हणाले. गृहमंत्री म्हणाले की, आता काश्मीर दहशतवादापासून जवळजवळ मुक्त राहील, हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुनिश्चित केले आहे. त्यांनी लोकांना सुचवले की जर त्यांच्या गावात कोणी दहशतवाद्यांचे समर्थन करत असेल तर त्यांचे मन वळवून त्यांना मुख्य प्रवाहात आणले पाहिजे, कारण दहशत आणि दहशतवाद काश्मीरचे भले करु शकत नाही. केवळ लोकशाही, औद्योगिकीकरण, एम्स, आयआयएम आणि आयआयटी यांचाच फायदा काश्मीरला होऊ शकतो.
आधी कलम 370 मुळे गुज्जर - बकरवाल आणि पहाडी लोकांना शिक्षण, निवडणुका आणि नोकऱ्यांमध्ये आरक्षणाचा लाभ मिळू शकत नव्हता, पण आता हे कलम हटवल्यानंतर सर्वांना त्याचा लाभ मिळेल, असे शहा यांनी सांगितले. यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी न्यायमूर्ती शर्मा आयोगाची स्थापना करून पुन्हा एकदा एसटी, एससी आणि ओबीसींचे वैज्ञानिक सर्वेक्षण करून विविध समाजांना आरक्षणाचा लाभ देण्याचा प्रयत्न केला आहे, असे ते म्हणाले. आता पहाडी लोकांना आरक्षण दिले जाईल, यामुळे गुज्जर लोकांच्या आरक्षण हक्कावर कोणताही परिणाम होणार नाही. गुज्जर लोकांना आजवर मिळालेल्या आरक्षणाचे लाभ यापुढेही असेच मिळत राहतील, असे त्यांनी सांगितले. पंतप्रधानांनी उचललेल्या या पावलांमुळे जम्मू-काश्मीरमध्ये सुधारणांचा मार्ग मोकळा होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
जम्मू आणि काश्मीरमध्ये 42,000 लोक मारले गेले आहेत आणि ती सर्व गोर-गरीबांची मुले होती, असे गृहमंत्र्यांनी सांगितले. जम्मू-काश्मीरमधील फुटीरतावाद आणि दहशतवाद संपला पाहिजे आणि जम्मू-काश्मीर हे भारताचे नंदनवन राहिले पाहिजे, अशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची इच्छा असल्याचे ते म्हणाले. जम्मू-काश्मीरमधून दहशतवादाचा नायनाट करण्याचे आवाहन गृहमंत्र्यांनी जनतेला केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार दहशतवाद अजिबात खपवून घेणार नाही, असे शहा म्हणाले. काश्मीर खोरे असो किंवा जम्मू, श्रीनगर असो किंवा जम्मू-काश्मीरमधील बारामुल्ला, पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली सरकार सर्वत्र सर्वांगीण विकासाची कामे करत आहे, असे त्यांनी सांगितले. नागरिकांनी देशाच्या मुख्य प्रवाहात सामील होऊन विकासाची प्रक्रिया सक्षम करून पुढे जावे, असे आवाहन त्यांनी केले.
***
Madhuri P/Sushama K/Shraddha M/CYadav
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1865508)
Visitor Counter : 214