दूरसंचार आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय

“प्रसारण क्षेत्रात उदयाला येणारे कल” या विषयावर आयएमसी 2022 मध्ये ट्रायकडून चर्चासत्राचे आयोजन


प्रसारणामध्ये होणाऱ्या तंत्रज्ञानविषयक विकासासोबत विविध क्षेत्रांमध्ये नवी क्षितिजे आणि दालने खुली होऊ शकतील- अपूर्व चंद्रा

Posted On: 03 OCT 2022 10:31PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 3 ऑक्‍टोबर 2022

 

संपूर्ण देश वर्ष 2022 मध्ये स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करत असताना भारतीय दूरसंवाद नियामक प्राधिकरणाने (ट्राय) देखील आपल्या स्थापनेची 25 वर्षे पूर्ण केली. आपल्या रौप्यमहोत्सवी सोहळ्याच्या अनुषंगाने इंडिया मोबाईल काँग्रेसच्या प्रतिष्ठेच्या व्यासपीठावर ट्रायने आज “ प्रसारण क्षेत्रात उदयाला येणारे कल” या विषयावर एका चर्चासत्राचे आयोजन केले. या क्षेत्रात अलीकडेच झालेला तंत्रज्ञानाचा विकास आणि त्याचा प्रभाव यांच्या पार्श्वभूमीवर हे चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. ट्रायचे अध्यक्ष डॉ. पी डी वाघेला यांनी या चर्चासत्राचे उद्घाटन केले. 

WhatsApp Image 2022-10-03 at 8.02.36 PM.jpeg

महामारीच्या काळात प्रसारण क्षेत्राने बजावलेली भूमिका दूरसंवाद विभागाचे सचिव राजारामन यांनी अधोरेखित केली. तंत्रज्ञानाचा विकास झाल्यामुळे प्रसारण सेवांचा किफायतशीरपणा आणि समावेशकतेमध्ये आणखी सुधारणा करणे शक्य होईल यावर त्यांनी भर दिला. 

माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे सचिव अपूर्व चंद्रा यांनी प्रसारण क्षेत्रात तंत्रज्ञानाच्या विकासामुळे इतर विविध क्षेत्रात नवी क्षितिजे आणि नवी दालने खुली होणार असल्याची बाब अधोरेखित केली. शिक्षण क्षेत्रामध्ये अधिक सखोल अध्ययन, हे त्याचे उदाहरण म्हणता येईल, असे त्यांनी सांगितले. अशा नव्या विकासामुळे निर्माण होणारे धोरणविषयक मुद्दे आणि आव्हानांकडे त्यांनी लक्ष वेधले आणि या पार्श्वभूमीवर कायदेशीर आणि नियामक चौकटीच्या अद्ययावतीकरणाची गरज अधोरेखित केली. 

WhatsApp Image 2022-10-03 at 8.02.39 PM.jpeg

या चर्चासत्राच्या पार्श्वभूमीविषयी ट्रायचे अध्यक्ष पी डी वाघेला यांनी माहिती दिली. तंत्रज्ञानविषयक, आर्थिक आणि सामाजिक विकासाच्या पार्श्वभूमीवर हितधारकांच्या हितसंबंधांचे संतुलन साधण्याच्या आवश्यकतेवर त्यांनी भर दिला. त्यांनी या क्षेत्रामध्ये उदयाला येणाऱ्या काही तंत्रज्ञानांचे महत्त्व अधोरेखित केले. या पुढील टप्प्यांमध्ये नियामक चौकट अधिक शिथिल करण्याला वाव असल्याचे त्यांनी सांगितले. 

उद्योग आणि इतर हितधारकांसोबत सहकार्यामध्ये आणि तंत्रज्ञानाचा विकास आणि अंगिकार यांना अधिक प्रोत्साहन देणारी आणि त्यामध्ये कोणताही अडथळा न आणणारी नियामक चौकट सुनिश्चित करण्यामध्ये ट्रायची सक्रिय भूमिका विचारात घेऊन या चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते.      


* * *

S.Kakade/S.Patil/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1864917) Visitor Counter : 150


Read this release in: English , Urdu , Hindi