सुक्ष्म, लघु आणि मध्यम उदयोग मंत्रालय

महात्मा गांधी यांच्या स्वप्नातला भारत साकार करण्यासाठी देशाला आत्मनिर्भर बनवणे गरजेचे असून यासाठी औद्योगिकीकरणाशिवाय दुसरा पर्याय नाही: नारायण राणे


सेवाग्राम औद्योगिक क्षेत्राला येत्या अडीच वर्षात आधुनिकतेचा स्वरूप दिलं जाईल

सेवाग्राम आश्रम आणि वर्धा जिल्ह्याला पर्यटन केंद्र म्हणून नवीन ओळख मिळवून देणार

Posted On: 02 OCT 2022 4:43PM by PIB Mumbai

 

मुंबई -वर्धा दि. 2 ऑक्टोबर 2022

महात्मा गांधी यांच्या स्वप्नातला भारत साकार करण्यासाठी देशाला आत्मनिर्भर बनवणे गरजेचे असून यासाठी औद्योगिकीकरणाशिवाय दुसरा पर्याय नाही असे प्रतिपादन सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांनी केले. महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त राणे यांच्या हस्ते  वर्धा येथील महात्मा गांधी ग्रामीण औद्योगिकरण संस्थेच्या वतीने आयोजित सेवाग्राम औद्योगिक क्षेत्र महोत्सव या प्रदर्शन आणि कार्यशाळेचे उद्घाटन झालं, त्यावेळी ते बोलत होते.  यावेळी केंद्रीय सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयाचे राज्यमंत्री भानुप्रताप सिंह वर्मा, सचिव बी .बी. स्वैन, मंत्रालयाचे सहसचिव आणि विकास आयुक्त शैलेश कुमार सिंह व्यासपीठावर  उपस्थित होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आत्मनिर्भर भारताचा नारा दिला आहे त्या अनुषंगाने प्रत्येक घटकाने भारताला आत्मनिर्भर करण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे, भारतात उद्योग उभारले पाहिजेत, देशात रोजगार निर्माण झाले पाहिजेत, देशाचा जीडीपी वाढला पाहिजे त्याचबरोबर राज्यांचे दरडोई उत्पन्नही वाढणे गरजेचे आहे असं राणे यांनी सांगितलं. देशाच्या जीडीपीमध्ये 30 टक्के वाटा हा सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योगांचा आहे आणि निर्यातीमध्ये हा वाटा 50 टक्क्यांचा आहे, देशाचा विकास साध्य करत असताना सूक्ष्म मध्यम आणि लघु उद्योगांचा हा वाटा वाढणे गरजेचे आहे असे ते म्हणाले. महात्मा गांधींनी वर्ध्याच्या या सेवाग्राम आश्रमातूनच चला गावाकडे असा नारा दिला होता, त्यातून त्यांना गावांचा विकास अभिप्रेत होता. त्यांनी शेती, कुटीर उद्योग, ग्राम उद्योगातून रोजगार निर्मिती व्हावी यासाठी सेवाग्राम औद्योगिक क्षेत्र निर्माण केले. या औद्योगिक क्षेत्राचं आधुनिकीकरण करण्यासाठी सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयाने एक समिती स्थापन केली असून येत्या अडीच वर्षात या औद्योगिक क्षेत्राला आधुनिकतेचा स्वरूप दिलं जाईल अशी घोषणा उद्योग मंत्र्यांनी यावेळी केली.

खादी कपड्याचं महत्व जगाला पटवून देणे गरजेचे असून त्यापासून मोठे औद्योगिक क्षेत्र उभे राहू शकते असे त्यांनी सांगितले. देशात पर्यटन व्यवसायाला मोठी संधी आहे त्या अनुषंगाने सेवाग्राम आश्रम आणि वर्धा जिल्ह्याला पर्यटन केंद्र म्हणून नवीन ओळख देण्यासाठी आणखी प्रयत्नाची गरज असून यासाठी  आमचे सरकार कटीबद्ध आहे असे ते म्हणाले. केंद्र सरकार पायाभूत  सोयी सुविधा देण्यासाठी कटिबद्ध असून देशात विविध ठिकाणी मोठ्या प्रमाणावर विकासाची कामे होत आहेत, त्याचा फायदा घेऊन राज्यातल्या नागरिकांनीही उद्योगांमध्ये पुढे आले पाहिजे आणि विकासाचा लाभ घेतला पाहिजे असे ते म्हणाले.वर्धा जिल्ह्याचा विकास आणि त्याचबरोबर विदर्भाचा विकास करण्यासाठी आपले मंत्रालय कटिबद्ध असून यासाठी सर्वच क्षेत्राकडून सहकार्य मिळणं गरजेच आहे असे  राणे यांनी नमूद केले.

 

यावेळी बोलताना सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग राज्यमंत्री भानुप्रताप सिंह वर्मा म्हणाले की देशाच्या प्रगतीत सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योगांचे मोठे योगदान असून 10 मार्च 2022 रोजी सुरू करण्यात आलेल्या सूक्ष्म लघु आणि मध्यम आयडिया फंड ला मोठा प्रतिसाद मिळत असून त्याचा लाभ अनेकांना मिळत आहे . आत्तापर्यंत 287 कल्पना आणि ११९६ ट्रेडमार्क ची नोंदणी झाल्याचं वर्मा यांनी सांगितलं.

नागपूर येथील बुटीबोरी  एमआयडीसीमध्ये दोनशे कोटी रुपये खर्च करून एक तंत्रज्ञान केंद्र निर्माण करण्यात येणार आहे  आणि त्याचा मोठा फायदा इथल्या युवकांना मिळणार आहे असेही त्यांनी सांगितलं. या तंत्रज्ञान केंद्राद्वारे  पुढील पाच वर्षात  वीस हजार तरुणांना प्रशिक्षण, 2,000 उद्योगांना सहाय्य, तसेच 200 नवे स्टार्टअप  सुरू करण्याचे लक्ष ठेवण्यात आले आहे

आज आयोजित केलेली कार्यशाळा आत्मनिर्भर भारताच्या निर्मितीत ग्राम उद्योगांचे योगदान यावर आधारित असून या कार्यशाळेत विविध राष्ट्रीय स्तरावरील संस्थांचे वक्ते मार्गदर्शन करणार आहेत अशी माहिती सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयाचे सचिव बी बी. स्वैन यांनी दिली. महात्मा गांधी ग्रामीण औद्योगीकरण संस्था ही गांधीवादी दृष्टीकोनातून उभारली असून स्थानिक उद्योग, त्यांचा प्रसार आणि प्रचार यासाठी सहकार्य करत असते आणि त्याचा मोठा लाभ ग्राम उद्योगांना मिळत आहे,असे त्यांनी सांगितले.

यावेळी विविध बँकांच्या वतीने मुद्रा योजनेंतर्गत उद्योगांना अर्थसहाय्य  केल्याबाबतचे डिजिटल चेक उपस्थित  मान्यवरांच्या हस्ते वितरित करण्यात आले

तत्पूर्वी राणे यांनी आज वर्धा इथल्या सेवाग्राम आश्रमाला भेट दिली आणि महात्मा गांधी आणि कस्तुरबा गांधी यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली, त्याचबरोबर त्यांनी  स्वच्छता अभियानाला सुरुवात केली.  कोविड लसीकरण कॅम्पलाही त्यांनी भेट दिली आणि  वृक्षारोपण कार्यक्रमातही ते सहभागी झाले.

***

Jaydevi PS/VPY/P.Kor

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1864496) Visitor Counter : 243


Read this release in: English , Urdu , Hindi