संरक्षण मंत्रालय
चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ - CDS म्हणून लेफ्टनंट जनरल अनिल चौहान यांनी पदभार स्वीकारला, देशाच्या आशा पूर्ण करण्यासाठी आणि आव्हानांना सामोरे जाण्याची सज्ज असल्याची ग्वाही दिली
Posted On:
30 SEP 2022 5:10PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 30 सप्टेंबर 2022
चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ - CDS म्हणून लेफ्टनंट जनरल अनिल चौहान (निवृत्त) PVSM, UYSM, AVSM, SM, VSM यांनी आज, 30 सप्टेंबर 2022 रोजी पदभार स्वीकारला. तिन्ही सैन्यदलांशी संबंधित प्रकरणांबाबत संरक्षण मंत्र्यांचे प्रधान लष्करी सल्लागार तसेच लष्करी व्यवहार विभागाचे सचिव म्हणूनही ते काम करतील. त्याचबरोबर चीफ ऑफ स्टाफ कमिटीचे ते स्थायी अध्यक्ष असतील.
पदभार स्वीकारण्यापूर्वी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना जनरल चौहान म्हणाले की चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ - सीडीएस म्हणून नियुक्ती होणे, ही आपल्यासाठी अभिमानाची बाब आहे. तीन्ही सैन्यदले, सरकार आणि नागरिकांच्या नवीन सीडीएसकडून काही आशा आणि अपेक्षा आहेत, ज्या आपण आपल्या क्षमतेनुसार पूर्ण करू, असे त्यांनी सांगितले. तिन्ही सैन्यदले एकत्रितपणे देशासमोरच्या सुरक्षा आव्हानांशी दोन हात करतील, असेही ते म्हणाले.
तत्पूर्वी जनरल चौहान यांनी राष्ट्रीय युद्ध स्मारकावर पुष्पचक्र अर्पण करून हुतात्म्यांना आदरांजली वाहिली. साउथ ब्लॉक लॉन्स येथे त्यांनी हवाई दलाचे प्रमुख एअर चीफ मार्शल व्ही. आर. चौधरी, लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे, नौदल उपप्रमुख व्हाईस अॅडमिरल एस. एन. घोरमाडे आणि सशस्त्र दलातील इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत तिन्ही सैन्यदलांकडून मानवंदना स्वीकारली.
* * *
S.Kane/M.Pange/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1863813)
Visitor Counter : 289