संरक्षण मंत्रालय

संरक्षण मंत्र्यांनी दिली अरुणाचल प्रदेशातील 3 कोरच्या सीमावर्ती भागांना भेट ; वास्तविक नियंत्रण रेषेसह देशाच्या संरक्षण सज्जतेचा घेतला आढावा

Posted On: 29 SEP 2022 5:08PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 29 सप्टेंबर 2022

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी 29 सप्टेंबर 2022 रोजी अरुणाचल प्रदेशातील दिबांग खोऱ्यातील अनिनी या गावातील 3 कोरच्या सीमावर्ती भागांना भेट दिली. राजनाथ सिंह यांनी सुरक्षेशी संबंधित सर्व पैलूंचा आढावा घेत वास्तविक नियंत्रण रेषेलगत  देशाच्या संरक्षण सज्जतेचे प्रत्यक्ष मूल्यांकन केले. लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे, जनरल ऑफिसर कमांडिंग-इन-चीफ, ईस्टर्न कमांड लेफ्टनंट जनरल आर. पी कलिता आणि भारतीय लष्कराचे इतर वरिष्ठ अधिकारी संरक्षण मंत्र्यांसमवेत उपस्थित होते. सिंह यांनी या भागात तैनात असलेल्या जवानांशी संवादही साधला.

आघाडीच्या क्षेत्राला  दिलेल्या भेटीत संरक्षण मंत्र्यांनी आसाममधील तेजपूर येथे सशस्त्र दलाच्या जवानांशी संवाद साधला. देशाचे सार्वभौमत्व, एकता आणि अखंडतेचे धैर्याने संरक्षण करत सीमेवर तैनात असलेल्या सैनिकांच्या समर्पण आणि बलिदानाची त्यांनी आपल्या भाषणात प्रशंसा केली.

राष्ट्राची ताकद आणि आत्मविश्वास यामागचे महत्त्वपूर्ण कारण म्हणजे सशस्त्र दल असल्याचे  राजनाथ सिंह म्हणाले.  2014 पासून सत्तेत आल्यापासून, भारतीय लष्करला आणखी बळकट करण्याला सरकारने सर्वोच्च प्राधान्य दिले आहे असे त्यांनी सांगितले. ‘आत्मनिर्भर’ संरक्षण उद्योगाद्वारे सशस्त्र दलांना अत्याधुनिक शस्त्रे/ उपकरणे उपलब्ध करून देऊन सुसज्जता वृद्धींगत करण्यावर सरकार भर देत आहे, असे त्यांनी सांगितले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेल्या धाडसी निर्णयांमुळे तसेच सशस्त्र दलांच्या शौर्याने भारताची आंतरराष्ट्रीय प्रतिमा पूर्णपणे बदलली आहे, याकडे राजनाथ सिंह यांनी लक्ष वेधले.

राजनाथ सिंह यांनी अथु पोपूच्या दुसऱ्या धार्मिक मोहिमेच्या सदस्यांशी संवाद साधला. ही मोहीम स्थानिक इडू मिश्मी जमातीचा वार्षिक समारोह आहे. स्थानिकांना समर्थन आणि पर्यटन विकास या उद्देशाने 2021 पासून भारतीय सैन्य या मोहिमेला प्रोत्साहन देत आहे.

 

 

 

 

 

S.Kane /S.Mukhedkar/P.Malandkar

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1863419) Visitor Counter : 203


Read this release in: English , Urdu , Hindi , Manipuri