विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

हरित गृह वायू उत्सर्जन कमी करण्यात  शाश्वत जैवइंधन महत्त्वाची भूमिका बजावते- अमेरिकेत पिट्सबर्ग, पेनसिल्व्हेनिया येथे “जागतिक स्वच्छ ऊर्जा कृती मंच -2022” मध्ये केंद्रीय मंत्री डॉ जितेंद्र सिंह यांचे प्रतिपादन


पिट्सबर्ग येथे " स्वच्छ ऊर्जा संक्रमणाला गती देण्यासाठी आंतरराष्ट्रीय सहकार्य " या विषयावरील मुख्य कार्यक्रमाला तसेच "भारत  स्वच्छ ऊर्जा" वरील कार्यक्रमाला केंद्रीय मंत्र्यांनी केले संबोधित

Posted On: 24 SEP 2022 7:42PM by PIB Mumbai

 

अमेरिकेत पिट्सबर्ग, पेनसिल्व्हेनिया येथे जागतिक स्वच्छ ऊर्जा कृती मंच -2022 मध्ये ऊर्जा, नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालय आणि विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाच्या उच्चस्तरीय संयुक्त भारतीय मंत्रीस्तरीय शिष्टमंडळाचे   नेतृत्व करताना डॉ जितेंद्र सिंह म्हणाले,वाहतूक क्षेत्रातील हरित गृह वायू उत्सर्जन कमी करण्यात शाश्वत जैवइंधन महत्त्वाची भूमिका बजावते.  पंतप्रधान नरेंद्र मोदी सातत्याने शून्य उत्सर्जनाच्या  प्रयत्नांना प्रोत्साहन देत आहेत आणि त्याकडे  लक्ष देत  आहेत असे ते म्हणाले.

पिट्सबर्ग येथे स्वच्छ ऊर्जा संक्रमणाला गती देण्यासाठी आंतरराष्ट्रीय सहकार्य या विषयावरील मुख्य कार्यक्रमाला  संबोधित करताना, डॉ जितेंद्र सिंह  म्हणाले, जैवतंत्रज्ञान विभागाच्या माध्यमातून भारत प्रगत जैवइंधन आणि कचऱ्यापासून ऊर्जा निर्मिती  तंत्रज्ञानातील संशोधन आणि विकासाला सहाय्य करत  आहे. परिषदेत भाग घेणाऱ्या 30 देशांच्या  ऊर्जा मंत्र्यांना माहिती देताना त्यांनी सांगितले की, आधुनिक जैवतंत्रज्ञान साधनांचा वापर करून  शाश्वत जैवइंधनावर काम करणाऱ्या आंतरविद्याशाखीय पथकासह  भारताने 5 जैव ऊर्जा केंद्रे स्थापन केली आहेत.

भारताने  या वर्षी एप्रिलमध्ये  नवी दिल्लीत  एमआय वार्षिक मेळाव्याचे आयोजन केले होते. यात भारत आणि नेदरलँड्सने संयुक्तपणे मिशन इंटिग्रेटेड बायोरिफायनरीजची सुरुवात केली.  भविष्यात कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी नवीकरणीय इंधन , रसायने आणि सामग्रीमधील नाविन्यपूर्ण संशोधनाला गती देण्यासाठी प्रमुख सदस्य, आंतरराष्ट्रीय संघटना , कॉर्पोरेट क्षेत्र, शैक्षणिक संस्था आणि समाजाला एकत्र आणले.

पिट्सबर्ग येथे इंडिया क्लीन एनर्जी शोकेस वरील अन्य एका  कार्यक्रमात डॉ जितेंद्र सिंह  म्हणाले, भारत स्वच्छ ऊर्जा मंत्रीस्तरीय मंचाच्या  संस्थापक सदस्यांपैकी एक असल्यामुळे बंगळुरू इथे  2023 मध्ये होणाऱ्या सीईएम -14 चे यजमानपद भूषवणार आहे.त्याच वर्षी भारत जी -20 चे अध्यक्षपदही भूषवणार आहे.

डॉ जितेंद्र सिंह म्हणाले, भारत हा जगातील मोजक्या देशांपैकी एक आहे , ज्याने दीर्घकालीन दृष्टीकोन ठेवून (2017-18 ते 2037-38 या 20 वर्षांच्या कालावधीसाठी)  शीतकरण कृती योजना (सीएपी) तयार केली  आहे, जी विविध क्षेत्रांच्या  शीतकरणाच्या गरजा पूर्ण करते.  ते म्हणाले की  निवासी आणि व्यावसायिक इमारती, शीत साखळी इत्यादींकडून होणारी शीतकरणाची मागणी कमी करण्यासाठी संभाव्य उपाययोजना केल्या आहेत , ज्यामध्ये ऊर्जा कार्यक्षमतेशी तडजोड न करणारी  इमारतीची रचना  आणि  तंत्रज्ञान नवोन्मेष आदींचा समावेश आहे.

डॉ जितेंद्र सिंह म्हणाले, हवामान बदलाच्या जागतिक आव्हानाची दखल घेत त्यासंदर्भात पावले उचलण्यात भारत आघाडीवर आहे आणि  2005 वर्षाच्या  तुलनेत 2030 मध्ये उत्सर्जनाची तीव्रता 33-35% ने कमी करण्यासाठी राष्ट्रीय स्तरावर निर्धारीत योगदान देण्यासाठी कटिबद्ध  आहे.

भाषणाचा समारोप करताना डॉ जितेंद्र सिंह  म्हणाले की देशामध्ये आणि देशाबाहेर स्वच्छ ऊर्जा विकासातले आपले योगदान दाखवून देण्याची  एक अनोखी संधी स्वच्छ ऊर्जा मंत्रीस्तरीय मंचाने भारताला दिली आहे.  भारत ही जगातील सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था आहे आणि वेगवान आर्थिक विकास, किफायतशीर  ऊर्जा, वाढलेले औद्योगिकीकरण, पायाभूत सुविधांची निर्मिती आणि ऊर्जेचा इतर  वापर यामुळे भारतात ऊर्जेच्या खप  झपाट्याने वाढला आहे असे ते म्हणाले.

***

N.Chitale/S.Kane/P.Kor

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1861985) Visitor Counter : 213


Read this release in: English , Urdu , Hindi , Tamil