उपराष्ट्रपती कार्यालय

‘सबका साथ, सबका विकास’ हे तत्वज्ञान गांधीवादी विचारांनी प्रेरित आहे- उपराष्ट्रपती

Posted On: 24 SEP 2022 3:50PM by PIB Mumbai

 

सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास, सबका प्रयासहा सरकारचा दृष्टीकोन गांधीवादी विचारांनी प्रेरित आहे, असे प्रतिपादन उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी केले आहे. राज्यघटनेमधील मूलभत अधिकार आणि मार्गदर्शक सिद्धांत यावर देखील गांधीवादी विचारांचा प्रभाव आहे, यावर भर देत धनखड म्हणाले की बापूंची शिकवण संपूर्ण मानवजमातीसाठी नेहमीच सार्थ राहील. नवी दिल्लीत हरिजन सेवक संघाच्या 90व्या स्थापना दिवसानिमित्त आयोजित सद्भावना संमेलनात उपराष्ट्रपती बोलत होते. या कार्यक्रमापूर्वी त्यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि आचार्य विनोबा भावे यांना पुष्पांजली अर्पण केली. गांधीजींनी हरिजन सेवक संघाची स्थापना करण्यामागे असलेल्या प्रेरणेचे स्मरण करताना उपराष्ट्रपती म्हणाले की आपली स्वातंत्र्य चळवळ केवळ राजकीय चळवळ नव्हती तर एक सामाजिक-सांस्कृतिक पुनरुत्थान होते. सामाजिक एकता आणि राजकीय स्वातंत्र्यासाठी दिलेली ती हाक होती, असे त्यांनी सांगितले.

गांधीजींनी भारतीय संस्कृतीमधील सत्य आणि अहिंसा ही  दोन सर्वोत्तम मुल्ये वास्तविक जगात बिंबवण्यासाठी प्रयत्न केले, असे धनखड यांनी गांधीजींच्या योगदानाविषयी बोलताना सांगितले. महात्मा गांधी यांच्या सिद्धांतांचा मानवतेला मोठ्या प्रमाणावर लाभ होईल. आज जगाला भेडसावत असणाऱ्या गरिबीपासून हवामान बदलापर्यंत ते युद्धापर्यंत सर्व प्रकारच्या धोक्यांवर तोडगा काढण्याची क्षमता गांधीजींच्या विचारात आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले.

रांगेतील शेवटच्या व्यक्तीचे उत्थान हीच गांधीजींच्या स्वराजची संकल्पना होती असे नमूद करून उपराष्ट्रपती म्हणाले की सरकारच्या अन्न सुरक्षा, लसीकरण, सार्वत्रिक बँकिंग या सर्व योजनांमागे गांधीवादी भावना आहे. घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान सभेमध्ये केलेल्या अखेरच्या भाषणामधील वाक्याचा दाखला देऊन उपराष्ट्रपतींनी त्यांना आदरांजली वाहिली. त्या भाषणात बाबासाहेब म्हणाले होते, सामाजिक लोकशाहीचा  पाया असल्याशिवाय राजकीय लोकशाही टिकणार नाही.

***

N.Chitale/S.Patil/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1861963) Visitor Counter : 261


Read this release in: Urdu , English , Hindi , Tamil