वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
जेम (GeM) पोर्टल विक्रेता संवादाचे गोव्यात आयोजन
गोव्यातील जीएसटी नोंदणीकृत व्यावसायिकांना जेमच्या माध्यमातून व्यवसायाच्या मोठया संधी: विकास गावणेकर, अतिरिक्त वित्त सचिव
गोव्यातील 9417 नोंदणीकृत विक्रेत्यांकडून जेम पोर्टलवर 231.05 कोटींचे व्यवहार
Posted On:
21 SEP 2022 5:00PM by PIB Mumbai
पणजी, 21 सप्टेंबर 2022
“जेम पोर्टलवर व्यवसाय नोंदणी केल्यानंतर आम्हाला खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. माझी सेवा क्षेत्रातील कंपनी आहे. आम्ही जेमच्या माध्यमातून मनुष्यबळ पुरवठा करतो. पेपरलेस काम असल्यामुळे व्यवसायात अतिशय सुलभता मिळाली आहे. जेमवर नोंदणी केल्यानंतर पहिली ऑर्डर 2 लाख 80 हजार रुपये होती, यात आता चांगली वृद्धी होऊन आमच्या व्यवसायाने नुकतेच 2 कोटी रुपयांचा टप्पा गाठला”, ज्योती राव रेरापल्ली आज पणजी येथे झालेल्या जेम संवादादरम्यान आपले अनुभव कथन करत होत्या.
निधी एन्टरप्रायजेसचे आशिष रंजन, यांनी आपल्या कंपनीचा जेमवरील अनुभव सांगितला. संरक्षण क्षेत्राशी त्यांची कंपनी निगडीत आहे. ते म्हणाले, “आमची कंपनी 2019 मध्ये जेम पोर्टवलर नोंदणीकृत झाली. यामुळे आम्हाला देशभरातून कामाच्या ऑर्डर येतात, यामुळे आमची व्यवसायवृद्धी झाली आहे. तसेच जास्त बोलीदार असल्यानंतर पारदर्शकताही वाढते”
आज पणजी येथे आयोजित कार्यक्रमात गोव्यातील ई-मार्केटप्लेसवरील विक्रेत्यांनी ‘जेम सेलर संवाद’ या कार्यक्रमात आपले अनुभव कथन केले. आजच्या कार्यक्रमामुळे राज्यातील GeM विक्रेत्यांना नवीन GeM वैशिष्ट्ये आणि कार्यक्षमतेची ओळख करून घेता आली, ज्यामुळे त्यांना जेम पोर्टल हाताळणी करण्यास सुलभता मिळेल.
जेम पोर्टलच्या सुरुवातीनंतर आतापर्यंत 3.02 लाख कोटी किंमतीचे 1 कोटी व्यवहार सुलभ झाले आहेत. गोव्यातील 9417 विक्रेत्यांना या पोर्टलच्या माध्यमातून आतापर्यंत 231.05 कोटी रुपये किंमतीच्या ऑर्डर प्राप्त झाल्या आहेत. आजच्या कार्यक्रमाला संबोधित करताना, गोवा सरकाच्या वित्त विभागाचे अतिरिक्त सचिव विकास गावणेकर म्हणाले, या प्रक्रियेत पूर्ण पारदर्शकता आहे. तसेच अतिशय कार्यक्षम पद्धतीने विक्रेत्यांना रक्कम प्रदान केली जाते, म्हणून सरकार जेमला प्रोत्साहन देण्याचे काम करत आहे. तसेच याप्रसंगी त्यांनी गोव्यातील जीएसटी नोंदणीकृत व्यावसायकांना जेमवर मोठ्या प्रमाणात नोंदणी करण्याचे आवाहन केले. जेम पोर्टल हे विक्रेते आणि सरकार दोघांसाठी सुलभता प्रदान करणारे आहे, असे ते म्हणाले.
निशांत दीनगवाल, जेमच्या राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांचे संचालक यांनी जेम पोर्टलच्या कार्यपद्धतीविषयी सविस्तर सादरीकरण केले. जेमचे गोव्यातील व्यवसायप्रमुख केनेथ अल्फोन्सो यांचीही याप्रसंगी उपस्थिती होती. पत्र सूचना कार्यालयाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात उपसंचालक गौतम कुमार यांनी माध्यम संवादाचे संयोजन केले.
गव्हर्नमेंट ई मार्केटप्लेस (जेम) :
राष्ट्रीय सार्वजनिक खरेदी पोर्टल -गव्हर्नमेंट ई मार्केटप्लेस (जेम ), ही वस्तू आणि सेवांच्या खरेदीसाठी अथपासून इतिपर्यंत सेवा पुरवणारी ऑनलाइन बाजारपेठ आहे. सार्वजनिक खरेदीची पुनर्व्याख्या प्रस्थापित करण्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेचा एक भाग म्हणून 9 ऑगस्ट 2016 रोजी या पोर्टलचा प्रारंभ करण्यात आला. जेम संपर्कविरहित, कागदविरहित आणि कॅशलेस असून कार्यक्षमता, पारदर्शकता आणि सर्वसमावेशकता या तीन स्तंभांवर उभारलेले आहे.
GeM च्या खरेदीदारांमध्ये केंद्र आणि राज्य सरकारचे सर्व विभाग, सहकारी संस्था आणि सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांचा समावेश आहे. 'समावेशकता' हा जेम व्यवहाराचा सर्वात मोठा आधारस्तंभ आहे. यात मोठ्या कंपन्या आणि समूहांपासून ते महिला उद्योजक, बचत गट आणि एमएसएमई विक्रेते यांचा समावेश आहे.
S.Thakur/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1861185)
Visitor Counter : 202