वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
सरकारी ई-मार्केटप्लेसमध्ये नोंदणी केल्यापासून व्यवसायाचे प्रमाण वाढले आहे: 'जेम' विक्रेते
मुंबई येथे 'जेम'वरील विक्रेत्यांसोबत 'सेलर संवाद' आयोजित
'जेम' स्थानिक व्यवसाय आणि लघु आणि मध्यम उद्योगांना राष्ट्रीय बाजारपेठ मिळवून देण्यात मदत करते
'जेम'वर आतापर्यंत 3 लाख कोटी रुपयांपेक्षा अधिक सार्वजनिक खरेदी
Posted On:
19 SEP 2022 6:05PM by PIB Mumbai
मुंबई, 19 सप्टेंबर 2022
“मी 2017 पासून जेम (GeM- Government e-Marketplace) वर नोंदणी केल्यापासून माझा व्यवसाय वाढला आहे. पूर्वी, मी फक्त फोर्ट परिसरातील माझ्या दुकानाच्या परिसरात आणि फक्त मुंबईतच वस्तू पुरवू शकत होतो. आता, मी माझी उत्पादने सर्वत्र पाठवतो ! इंडिया पोस्ट आणि तीन खाजगी कुरिअर सेवा प्रदात्यांशी करार केला असून ते माझ्या दुकानात वस्तू न्यायलाही येतात आणि वेळेत त्या वितरितही करतात”, हितेश पटेल सांगत होते. जेमवर नोंदणीकृत असलेल्या मिलन स्टेशनर्स अँड प्रिंटर्स या फर्मचे ते मालक आहेत.
जोसेफ लेस्ली डायनॅमिक्स मॅन्युफॅक्चरिंग प्रा.लि. या अग्निसुरक्षा उपकरणे पुरवठादार कंपनीचे व्यवस्थापक उमेश नई सांगत होते की त्यांना जेमच्या माध्यमातून आतापर्यंत एकूण 30 कोटींच्या ऑर्डर मिळाल्या आहेत! “जेममुळे व्यवसाय करण्याच्या खर्चात लक्षणीय घट झाली आहे. विशेषत: यामुळे संभाव्य खरेदीदारांना भेटण्यासाठी प्रवासाची गरज कमी झाली आहे. आमची एमएसएमई कंपनी आहे,त्यामुळे पोर्टलद्वारे प्रदान करण्यात येणारे एमएसएमई विक्रेत्यांसाठी लाभ आमच्या कंपनीला मिळतात. जेम हे खूप चांगले व्यासपीठ आहे. आमच्यासारख्या छोट्या कंपनीसाठी अत्यंत फायदेशीर आहे.”
एमएसएमई फर्म ओंकार एंटरप्राइझचे केतन चौधरी यांनी सांगितले की जेममुळे त्यांचा व्यवसाय वाढण्यास मदत झाली. त्यांनी 2020 मध्ये जेमवर नोंदणी करून प्रिंटर आणि टोनरची विक्री सुरू केली. आता ते संगणक आणि लॅपटॉपही विकत आहेत! “जेम आमच्यासारख्या लहान व्यवसायांना विस्तार करण्यात मदत करते”, असे त्यांनी सांगितले.
सरकारी ई-मार्केटप्लेस जेम वरील अनेक विक्रेत्यांनी आज मुंबई येथे आयोजित जेम 'सेलर संवाद' (विक्रेत्यांशी संवाद)मध्ये त्यांचे अनुभव सांगितले. यात विक्रेत्यांना जेमची नवीन वैशिष्ट्ये आणि कार्यक्षमतेबद्दल जाणून घेण्याची संधी मिळाली. यामुळे त्यांना पोर्टलचा उपयोग अधिक सुलभतेने करता येतो. जेमचे महाराष्ट्र व दमण आणि दीवसाठीचे बिझनेस फॅसिलिटेटर( व्यवसाय सुलभकर्ते) निखिल पाटील यांनी माहिती दिली की जेम पोर्टल फक्त केंद्र सरकारच्या कार्यालयांपुरते मर्यादित नाही. हे केंद्र/राज्य सरकारी मंत्रालये, विभाग, संस्था आणि सार्वजनिक उपक्रमांसह सर्व सरकारी खरेदीदारांसाठी वन-स्टॉप ऑनलाइन खरेदी पोर्टल प्रदान करते.
आपल्या सादरीकरणात पाटील यांनी लघु आणि मध्यम उद्योगांना जेम पोर्टलच्या माध्यमातून व्यवसाय करण्याचे लाभ सांगितले. सूक्ष्म आणि लघुउद्योगांना विशेषत: एकच मालक असलेल्या उद्योगांना आता जेम मंचावर ऑर्डर स्वीकारण्याच्या वेळेस कर्ज मिळू शकते. व्यवसाय करणे सुलभ करण्यासाठी गेल्या 24 महिन्यांत जेमवर अंदाजे 2,000 किरकोळ आणि 460 हून अधिक कार्यावली सादर करण्यात आल्या आहेत.
या कार्यक्रमाला जेमचे राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश संचालक आणि महाराष्ट्रातील जेमचे नोडल अधिकारी निशांत दीनगवाल देखील उपस्थित होते. यावेळी पत्र सूचना कार्यालयाच्या मुंबई प्रदेश कार्यालयाचे उपसंचालक दीपजॉय मामपल्ली हेही उपस्थित होते.
गव्हर्नमेंट ई मार्केटप्लेस (जेम) :
राष्ट्रीय सार्वजनिक खरेदी पोर्टल -गव्हर्नमेंट ई मार्केटप्लेस (जेम ), ही वस्तू आणि सेवांच्या खरेदीसाठी अथपासून इतिपर्यंत सेवा पुरवणारी ऑनलाइन बाजारपेठ आहे. सार्वजनिक खरेदीची पुनर्व्याख्या प्रस्थापित करण्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेचा एक भाग म्हणून 9 ऑगस्ट 2016 रोजी या पोर्टलचा प्रारंभ करण्यात आला. जेम संपर्कविरहित, कागदविरहित आणि कॅशलेस असून कार्यक्षमता, पारदर्शकता आणि सर्वसमावेशकता या तीन स्तंभांवर उभारलेले आहे.
Social Inclusion PPT of GeM Seller Samvad
* * *
PIB Mumbai | R.Aghor/S.Kakade/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1860638)
Visitor Counter : 237