आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत आज नागपूरच्या एम्स अर्थात अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेचा चौथा स्थापनादिन साजरा
या संस्थेतील उत्तमोत्तम आरोग्य सुविधांचा फायदा सर्वसामान्य गरजू रुग्णांना व्हायला हवा – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी
दुर्गम भागातील रुग्णांसाठी या संस्थेतील तज्ज्ञ डॉक्टरांनी सॅटेलाइट केंद्रांच्या माध्यमातून दूर-दृश्य प्रणालीद्वारे टेलीमेडिसिन सेवा उपलब्ध करून द्याव्यात –नितीन गडकरी
Posted On:
19 SEP 2022 2:37PM by PIB Mumbai
नागपूर/मुंबई, 19 सप्टेंबर 2022
नागपूरच्या एम्स अर्थात अखिल भारतीय वैद्यकीय विज्ञान संस्थेचा चौथा स्थापनादिन आज साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी संबोधित केले. एम्सच्या संचालक डॉ विभा दत्ता यांची याप्रसंगी उपस्थिती होती.
यावेळी उपस्थितांशी संवाद साधताना केंद्रीय मंत्री गडकरी म्हणाले, की आता आरोग्य विषयक संस्थांमध्ये रुग्णांना भरती करून घेण्याची सुविधा 24 तास उपलब्ध करण्याबाबत विचार व्हायला हवा कारण आरोग्यविषयक समस्या कुठल्याही क्षणी उद्भवत असतात. ते म्हणाले की नागपूरच्या आसपासच्या भागात मूत्रपिंड प्रत्यारोपण, विशेष करून सिकल सेल अॅनिमिया तसेच थॅलेसेमिया यांसारख्या समस्या असलेले रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळतात. भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर आणि नागपूर या भागांमधील अनुसूचित जाती तसेच अनुसूचित जमाती या दोन समुदायांमध्ये 70% प्रमाणात सिकल सेल अॅनिमिया, थॅलेसेमिया यांची समस्या दिसून येते. यावर संशोधन व्हायला हवे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. या एम्सचा उपयोग येथील लोकांना व्हावा, अवयव प्रत्यारोपणासारख्या सोयी सामान्य लोकांना उपलब्ध व्हाव्यात यासाठी प्रयत्न व्हायला हवे असे ते म्हणाले. या संस्थेत शस्त्रक्रियेसाठी उत्तम सुविधा आहेत, उत्तमोत्तम तज्ञ डॉक्टर आहेत त्यामुळे ज्या आजारांसाठी येथील गरीब रुग्णांना मुंबई, दिल्लीला जावे लागते त्यासंदर्भातील सुविधा रुग्णांना येथे उपलब्ध झाल्या तर त्यांचा मोठा फायदा होईल असे मत त्यांनी नोंदविले.
केंद्रीय मंत्री म्हणाले की, “नागपूर आज मेडिकल हब म्हणून विकसित होत आहे, मध्य प्रदेश तसेच आजूबाजूच्या भागातून उपचारासाठी गरीब रुग्ण येथे येतात. गडचिरोली हा आकांक्षी जिल्हा आहे, तेथे आरोग्य सुविधांचा अभाव आहे. त्यामुळे अशा दुर्गम भागातील गरीब, गरजू रुग्णांना सॅटेलाईट केंद्रांच्या माध्यमातून या संस्थेतील डॉक्टर्स दूर-दृश्य प्रणालीद्वारे टेलीमेडिसिन सेवा उपलब्ध करून दिल्या तर त्या सामाजिक तसेच आर्थिकदृष्ट्या मागास भागातील रुग्णांना त्याचा मोठा लाभ मिळेल.”
नागपूर हे औषध निर्माणाच्या बाबतीत देखील पुढारलेले शहर आहे. एम्स संस्थेच्या विकासासाठी आणि सर्वसामान्य लोकांना उत्तम आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी सरकारी पातळीवर जी कामे करणे किंवा निर्णय घेणे आवश्यक असेल त्याची माहिती आपल्याला द्यावी, अशी सूचना नितीन गडकरी यांनी एम्स प्रशासनाला केली.
कोविड काळात या संस्थेने उत्तम कार्य केले आहे. जसे वैद्यकीय विद्यार्थ्यांना उत्तम शिक्षण मिळणे आवश्यक आहे तसेच सामान्य रुग्णांना देखील उत्तम प्रकारच्या आरोग्य सुविधा मिळाल्या पाहिजेत, अशी अपेक्षा व्यक्त केली.
संस्थेच्या अद्ययावत इमारतीच्या कामाची केंद्रीय मंत्र्यांनी प्रशंसा केली. येणाऱ्या काळात ही संस्था जगातील सर्वोत्तम अशा प्रकारची संस्था असावी अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. एम्स संस्थेमध्ये येणारा रस्ता दुमजली पद्धतीने विकसित करण्याचे काम लवकरच सुरु होईल अशी माहिती त्यांनी दिली.
ऊर्जानिर्मितीसाठी सांडपाण्याचा वापर करून वर्षाला 300 कोटी रुपयांचा महसूल मिळविणारे नागपूर हे देशातील पहिले शहर आहे. येथे आता एम्स, आयआयएम, ट्रिपलआयआयएम, आयआयटी, सिंबायोसिस विद्यापीठ, उत्तमोत्तम अभियांत्रिकी महाविद्यालये आहेत, कायदेविषयक अशा उत्तमोत्तमशिक्षण संस्था आहेत, मिहान आहे. 11 सीटर फाल्कन जेट विमान निर्मितीचे काम या वर्षीच्या अखेरीस सुरु होईल असे त्यांनी सांगितले. येत्या 2-3 महिन्यात आंतरराष्ट्रीय विमानतळाचे काम देखील सुरु होईल. एम्स संस्थेच्या नजीक नवे रेल्वे स्थानक उभारण्यावर विचारविनिमय सुरु आहे असे त्यांनी सांगितले. हा परिसर उत्तम प्रकारे विकसित झाला आहे. या संस्थेत येण्यासाठी आवश्यक बस सेवेच्या विकासात असेलल्या समस्या लवकरच सोडविल्या जातील असे ते म्हणाले. ही संस्था देशात पहिल्या क्रमांकाची संस्था व्हावी यासाठी आपण सर्व प्रयत्न करत आहोत.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे कार्यक्रमाप्रसंगीचे संपूर्ण भाषण:
* * *
PIB Mumbai | S.Thakur/S.Chitnis/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1860542)
Visitor Counter : 225