विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय
‘विज्ञान प्रगती’ या वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेच्या लोकप्रिय विज्ञान मासिकाला मिळाला ‘राजभाषा कीर्ती पुरस्कार’
Posted On:
17 SEP 2022 8:47PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 17 सप्टेंबर 2022
सीएसआयआर अर्थात वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेच्या “विज्ञान प्रगती” या लोकप्रिय विज्ञान मासिकाने एक नवा इतिहास घडवला आहे. या मासिकाला राष्ट्रीय राजभाषा कीर्ती पुरस्कार (प्रथम स्थान) प्राप्त झाला आहे आणि हा पुरस्कार 14-15 सप्टेंबर 2022 दरम्यान सुरत येथील पंडित दीनदयाल उपाध्याय इनडोअर स्टेडियम मध्ये आयोजित दुसऱ्या अखिल भारतीय राजभाषा संमेलनात प्रदान करण्यात आला. भारत सरकारच्या गृह मंत्रालयाच्या राजभाषा विभागातर्फे आयोजित हा भव्य सोहोळा सुमारे 9000 प्रेक्षकांच्या उपस्थितीत संपन्न झाला.
सुरत राजभाषा संमेलनात, सीएसआयआर -नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स कम्युनिकेशन अँड पॉलिसी रिसर्च (CSIR-NIScPR) च्या संचालक, प्रा. रंजना अग्रवाल यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत हा प्रतिष्ठित कीर्ती पुरस्कार स्वीकारला.
‘विज्ञान प्रगती’ (हिंदीतील एक लोकप्रिय विज्ञान मासिक) हे भारतातील सर्वोत्तम लोकप्रिय विज्ञान मासिकांपैकी एक आहे. हे भारतातील तसेच जगभरातील मुले, शिक्षक, संशोधक आणि सर्वसामान्यांमध्ये लोकप्रिय आहे. वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद (CSIR) ने 1952 मध्ये हे मासिक प्रकाशित करण्यास सुरुवात केली. या मासिकाला सात दशकांचा वारसा आहे आणि इतक्या वर्षांमध्ये या मासिकाच्या वाचकांना त्यातील मजकुरातून प्रेरणा मिळाली आहे. हे हिंदी मासिक अलीकडील राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञानाशी संबंधित घडामोडी, शोध, आविष्कार, तांत्रिक प्रगतीचे माहितीपर लेख, वैशिष्ट्य, विज्ञान कथा, विज्ञान कविता, प्रश्नमंजुषा, सायंटून (विज्ञान व्यंगचित्र) आणि डॉक्युड्रामा या स्वरूपात प्रकाशित करते.
विज्ञान आणि तंत्रज्ञानविषयक माहिती जनतेला सोप्या भाषेत पुरवणे हे विज्ञान प्रगतीचे उद्दिष्ट आहे. मासिकातील मजकुराचा उद्देश तरुणांमध्ये विज्ञानाविषयी कुतूहल जागृत करणे आणि विज्ञानाचा पाठपुरावा करण्यासाठी त्यांच्यात रस निर्माण करण्याचा प्रयत्न करणे हा आहे. विविध स्पर्धा परीक्षांच्या तयारीत गुंतलेले; विज्ञान आणि तंत्रज्ञानावरील माहितीचा एक विश्वासार्ह स्रोत म्हणून या मासिकाचा वापर करतात.
वैज्ञानिक रुची, जिज्ञासा , मानवतावाद आणि सुधारणा विकसित करणे हे प्रत्येक नागरिकाचे मूलभूत कर्तव्य आहे यावर भारतीय संविधानाच्या कलम 51 A[h] मध्ये भर देण्यात आला आहे. विज्ञान मासिके सामान्य माणसांपर्यंत विज्ञान आणि तंत्रज्ञान पोहोचवण्यात आणि त्याद्वारे वैज्ञानिक वृत्ती विकसित करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात.
सीएसआयआर-नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स कम्युनिकेशन अँड पॉलिसी रिसर्च च्या संचालक प्रा. रंजना अग्रवाल यावेळी म्हणाल्या की, ‘विज्ञान प्रगती’ ला लाभलेला राजभाषा राष्ट्रीय कीर्ती पुरस्कार हा सीएसआयआर तसेच त्याच्या सर्व वाचक, लेखक आणि संपादकांचा सन्मान आहे.
* * *
N.Chitale/V.Joshi/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1860232)
Visitor Counter : 303