ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक पुरवठा मंत्रालय
विकसनशील राष्ट्रांमध्ये छोटे डेअरी फार्म अधिक उत्पादनक्षम, शाश्वत, दर्जेदार आणि फायदेशीर बनवण्याच्या दिशेने आंतरराष्ट्रीय डेअरी फेडरेशनने (IDF)सातत्यपूर्ण प्रयत्न करावेत: पीयूष गोयल यांची सूचना
जागतिक उत्सर्जनावर शेतीचा प्रभाव कमी करण्याच्या वैश्विक प्रयत्नांचा भाग बनण्यास भारत उत्सुक: गोयल
Posted On:
15 SEP 2022 7:02PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 15 सप्टेंबर 2022
विकसनशील राष्ट्रांमधील छोटे डेअरी फार्म अधिक उत्पादक, टिकाऊ, पर्यावरणपूरक, गुणवत्तापूर्ण आणि फायदेशीर बनवण्यासाठी आंतरराष्ट्रीय डेअरी फेडरेशन (IDF) ने संबंधित, समकालीन, व्यावहारिक आणि किफायतशीर उपाय शोधण्यासाठी केंद्रित प्रयत्न करावेत, अशी सूचना केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री, पीयूष गोयल यांनी केली आहे. ते आज ग्रेटर नोएडा येथे आंतरराष्ट्रीय डेअरी फेडरेशनच्या जागतिक डेअरी संमेलन 2022 (WDS 2022) ला संबोधित करत होते.
शेती स्तरावर संशोधन, भारतातील विविध हवामान परिस्थितींचा अभ्यास करण्यासाठी तसेच, जागतिक मानके आणि जागतिक उत्सर्जनविषयक मापदंडांशी जुळवून घेण्यास मदत करणारे उपाय शोधण्यासाठी आंतरराष्ट्रीय डेअरी फेडरेशनने देशात तज्ञांची एक छोटी समिती नेमण्याची शक्यता पडताळून पाहण्याचे आवाहन गोयल यांनी केले. ‘भारताला समस्येचा नव्हे तर समाधानाचा भाग व्हायचे आहे, याची हमी मी तुम्हाला देतो’, असे ते म्हणाले.
जगातील दुग्धजन्य उत्पादनाच्या सुमारे एक चतुर्थांश उत्पादनासह, जगातील दुग्धजन्य पदार्थांचा सर्वात मोठा उत्पादक देश म्हणून भारताची स्थिती अधोरेखित करत, वाढता आंतरराष्ट्रीय सहभाग तसेच सरकार, सहकारी क्षेत्र आणि शेतकरी यांनी घेतलेल्या सशक्त पुढाकारामुळे, भारताच्या जागतिक दुग्धजन्य बाजारातील वाट्यात येत्या काही वर्षांत लक्षणीय वाढ होईल असा विश्वास गोयल यांनी व्यक्त केला. याचा भारतातील लहान आणि दुर्गम भागातील शेतकर्यांना खूप फायदा होईल. त्यांना आवश्यक असलेले पूरक उत्पन्न मिळेल तसेच त्यांच्या मुलांच्या पोषणातही योगदान मिळेल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. देशातील दुग्ध उत्पादनाचा एक तृतीयांश भाग शेतकरी त्यांच्या घरगुती वापरासाठी ठेवतात, हे आपण लक्षात घेतले पाहिजे, असेही गोयल म्हणाले.
जागतिक उत्सर्जनावरील शेतीचा प्रभाव कमी करण्याच्या वैश्विक प्रयत्नांचा भाग बनण्यास भारत उत्सुक असल्याचा पुनरुच्चार गोयल यांनी गुणवत्ता मानके आणि टिकाऊपणाबद्दल बोलताना केला. भारतात अल्प भूधारक शेतकरी मोठ्या संख्येने दुग्धव्यवसायात आहेत तर विकसित राष्ट्रांमध्ये तुलनेने कमी शेतकरी दुग्धउत्पादनात गुंतलेले आहेत, या तफावतीचे चित्र स्पष्ट करत मंत्र्यांनी दुग्ध व्यवसायाशी संबंधित सर्व हितसंबंधीयांनी छोट्या शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी समकालीन आणि संबद्ध उपाय शोधण्याचे आवाहन केले. 2047 मध्ये साजऱ्या केल्या जाणाऱ्या आपल्या स्वातंत्र्याच्या 100 व्या वर्धापन दिनापर्यंतच्या अमृत काळात, आपल्या देशातील 1.3 अब्ज लोकांपैकी प्रत्येकापर्यंत समृद्धी आणि विकासाची फळे पोहोचवण्याच्या भारताच्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार करत गोयल यांनी अल्पभूधारक शेती फायदेशीर बनविण्याच्या दिशेने केंद्रित प्रयत्न करण्याचे आवाहन केले.
R.Aghor /S.Mukhedkar/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1859647)
Visitor Counter : 185